संवादाची पथ्ये (पहाटपावलं_

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

संवाद पुढे न्यायचा असेल, तर हे प्रश्‍न विचारणे ही ऐकणाऱ्याची जबाबदारी असते. तर त्याला यथाशक्ती, प्रामाणिकपणे उत्तरे देण्याची जबाबदारी बोलणाऱ्याची असते. या उत्तरांवरही प्रश्‍न निर्माण होऊ शकतात आणि हा संवाद वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू राहतो

भाषा आपल्या सामाजिक- सांस्कृतीक व्यवहारात अनेक प्रकारची कार्ये पार पाडत असते. रोजच्या जगण्यातील माहितीच्या देवाण- घेवाणीपासून ते ज्ञानव्यवहारापर्यंत, खऱ्या खोट्या घडलेल्या गोष्टी एकमेकांना ऐकवण्यापासून ते कथा, कविता, कादंबरी, ललित- वैचारिक लेखन अशा साहित्य व्यवहारापर्यंत नाना तऱ्हांची कार्ये भाषेच्या माध्यमातूनच केली जातात. या सर्व भाषा व्यवहाराचा पाया असतो संवाद! दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकमेकांशी केलेले संभाषण! भाषेचा प्रत्यक्ष उपयोग हा व्यक्तीव्यक्तींमधील संबंधांच्या चौकटीतच होत असतो. पण या स्व संवादातही बोलणारी मी आणि ऐकणारी मी असा फरक कल्पनेच्या पातळीवर तरी करावाच लागतो. बोलणारी आणि ऐकणारी किंवा लिहिणारी आणि वाचणारी अशा व्यक्तींच्या जोडगोळीखेरीज शक्‍य होत नाही.

संवाद करण्यासाठी काय आवश्‍यक असते? फक्त शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम? नाही. अर्थपूर्ण शब्दांची व्याकरणाचे नियम पाळून तयार केलेली वाक्‍ये म्हणणे किंवा लिहणे आणि ऐकणे किंवा वाचरणे म्हणजे संवाद नसतो. संवाद घडविण्यासाठी बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने काही एक प्रकारची तत्त्वे पाळावी लागतात. त्यातील काही अगदी प्राथमिक असतात. उदाहरणार्थ, वाणी स्वच्छ, स्पष्ट असावी, अक्षर सुवाच्छ असावे, शब्दरचना काळजीपूर्वक करावी इत्यादी. पण यापेक्षाही काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. त्यातील सर्वांत मूलभूत म्हणजे जे काही संवादातून व्यक्त करायचे आहे, ते दुसऱ्या व्यक्तीला समजेल या पद्धतीने मांडायला हवे. नाहीतर संवादाचा मूळ हेतूच नष्ट होतो. ऐकणाऱ्या- वाचणाऱ्यानेही जे मांडले जाते आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन ते समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. त्याला प्रतिसाद द्यायला हवा.

या साध्यासुध्या नियमांच्याही पलीकडे जाऊन, संवाद करणारी व्यक्ती कदाचित स्वतःच्याही नकळत काही जबाबदाऱ्या स्वीकारत असते. ऐकणारा सहसा या विश्‍वासाने ऐकतो की जे बोलले जाते आहे ते खरे आहे, मनःपूर्वक सांगितले जाते आहे आणि ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे. प्रत्यक्ष संवादात अनेक वेळा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग जे सांगितले ते सत्य आहे का? ते सांगण्याची इच्छा प्रामाणिक आहे का? नीतीच्या दृष्टीने ते योग्य आहे का अशा प्रकारचे प्रश्‍न उद्‌भवतात. संवाद पुढे न्यायचा असेल, तर हे प्रश्‍न विचारणे ही ऐकणाऱ्याची जबाबदारी असते. तर त्याला यथाशक्ती, प्रामाणिकपणे उत्तरे देण्याची जबाबदारी बोलणाऱ्याची असते. या उत्तरांवरही प्रश्‍न निर्माण होऊ शकतात आणि हा संवाद वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू राहतो. बोलणारा आणि ऐकणारा आपल्या भूमिकांची गरज पडेल तशी अदलाबदल करतात आणि संवादाचा प्रवाह खळखळत राहतो. मात्र जेव्हा संवादात भाग घेणाऱ्या व्यक्ती आपल्या नैतिक जबाबदाऱ्या नाकारतात, तेव्हा खरा संवाद कुंठतो. संवादातून आकलनाकडे जाण्याऐवजी स्वार्थ साधण्यासाठी, वर्चस्व गाजविण्यासाठी संवाद केले जातात आणि त्यातून विसंवाद निर्माण होतो.

Web Title: dipti gangavane writes about dialogue