नाते : भाषा आणि संस्कृतीचे (पहाटपावलं)

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण आज आहोत, त्यात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जग जवळ येण्याच्या या काळात वेगवेगळ्या संस्कृतीची सरमिसळ होत आहे. म्हणजेच वेगवेगळ्या भाषांचीही जवळीक वाढते आहे. भाषांचे आणि संस्कृतीचे हे वैविध्य हे आपल्या परंपरेचे एक वैभवशाली वैशिष्ट्य आहे

आपण फार सुदैवी आहोत. कारण आपल्या देशाला भाषिक संपन्नता लाभलेली आहे. आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या मातृभाषेखेरीज इंग्रजी आणि हिंदी या भाषाही येतात. अगदी औपचारिक शिक्षण न मिळालेल्यांनाही मराठीव्यतिरिक्त थोडेबहुत हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषा येतात. हे आपले सुदैव यासाठी की जितक्‍या जास्त भाषा आपल्याला अवगत असतात, तितके आपले भावविश्‍व, विचारविश्‍व अधिक समृद्ध आणि परिपक्व होत जाते. बहुभाषिकत्व मिळवण्यासाठी परदेशी व्यक्तींना जी धडपड करावी लागते, ती करायला न लागताच सहजपणे आपण बहुभाषिक होतो आणि जगाकडे बघण्याची अनेक कवाडे आपल्यासाठी खुली होतात.

प्रत्येक भाषा विश्‍वाकडे, माणसाकडे, माणसांचे विश्‍वाशी, इतर सजीवांशी आणि स्वतःशीही जे नाते असते त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला देत असते. हा दृष्टिकोन अर्थातच ज्या संस्कृतीचा ती भाषा एक अविभाज्य भाग असते, त्या संस्कृतीमधून निर्माण झालेला असतो. भाषा आणि संस्कृती यांचे नाते अनेक पदरी असते. या नात्याचा विचार करताना खूप विस्तार असणऱ्या अनेक पाखरांना आपल्या फांद्या फांद्यावर बागडू देणाऱ्या अनेकांना आपल्या सावलीत विसावू देणाऱ्या एखाद्या भव्य वटवृक्षाची प्रतिमा डोळ्यांपुढे येते. पारंब्या रुजवत जाणारा, विस्तारत जाणारा, काही शाखा, काही पारंब्या नष्ट झाल्या, तरी नव्या शाखा-पारंब्यानिशी वाढत राहणारा वटवृक्ष म्हणजे भाषा आणि या वृक्षांचे भरण-पोषण करणारी माती म्हणजे संस्कृती. असे काहीसे रुपक माझ्या मनात येते. वृक्षांचा विस्तार तोलून धरणारी माती भुसभुसीत झाली, तर वृक्ष उन्मळून पडायची शक्‍यता असते. माती निकस झाली, तर वृक्षांचे आरोग्य धोक्‍यात येते. पाने, फळे निःसत्त्व होतात. त्याचप्रमाणे संस्कृतीची वीण उसवत गेली, तिची ऊर्जा ओसरली, तर भाषा आपली संपन्नता, आपली ताकद हरवून बसते. पण गंमत पाहा, माती भुसभुशीत होऊ नये, वाहून जाऊ नये यासाठी झाडांच्या मुळांनी माती धरून ठेवावी लागते. आपली पाने, फुले, फळे, बिया हे सगळे परत मातीत मिसळून तिचे देणे अनेक पटींनी फेडावे लागते. माती आणि वृक्षांप्रमाणे संस्कृती आणि भाषा एकमेकांवर अवलंबून असतात. एकमेकांना समृद्ध करत असतात. माती आणि वृक्ष दोन्ही मिळून जीवसृष्टीचे पोषण करतात; तर संस्कृती आणि भाषा मिळून भावसृष्टीचे, विचारविश्‍वाचे पोषण करतात.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण आज आहोत, त्यात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जग जवळ येण्याच्या या काळात वेगवेगळ्या संस्कृतीची सरमिसळ होत आहे. म्हणजेच वेगवेगळ्या भाषांचीही जवळीक वाढते आहे. भाषांचे आणि संस्कृतीचे हे वैविध्य हे आपल्या परंपरेचे एक वैभवशाली वैशिष्ट्य आहे. त्याचाच अधिक मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर अनुभव घेतानाच आपल्या वैभवाचीही जपणूक करूया.

Web Title: dipti gangavane writes about language and culture