नियम: गरज आणि मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipti Gangavane writes about Rules Needs and Limits of human being

प्रत्येकाने स्वत:ला हवे तसे वागायचे ठरवले तर सतत संघर्षांना तोंड द्यावे लागेल. असे संघर्ष हिंसेच्या पातळीवर पोचायला वेळ लागत नाही. हिंसाचाराने भांडणे मिटत नाहीत.

नियम: गरज आणि मर्यादा

माणूस सामाजिक प्राणी आहे. माणसाच्या वेगवेगळ्या निसर्गदत्त क्षमतांचा विकास समाजातच योग्य प्रकारे होऊ शकतो. समाज गुण्यागोविंदाने नांदायला हवा असेल तर, व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर बंधने घालावी लागतात. कारण प्रत्येकाने स्वत:ला हवे तसे वागायचे ठरवले तर सतत संघर्षांना तोंड द्यावे लागेल. असे संघर्ष हिंसेच्या पातळीवर पोचायला वेळ लागत नाही. हिंसाचाराने भांडणे मिटत नाहीत. ती काही काळासाठी दबली जातात, पण नंतर पुन्हा तोंड वर काढतात. शिवाय जो शारीरिक दृष्टीने किंवा शस्त्रबळाने जास्त ताकदवान असेल, तोच या हिंसेच्या मार्गात यशस्वी होण्याची शक्यता कितीतरी अधिक असते. टोळीने राहणाऱ्या प्राण्यांच्या जगातही असेच घडत असते.

मनुष्य हाही प्राणीच आहे हे खरेच आहे, पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणसाच्या विशिष्ट क्षमतांचा विकास ज्या प्रकारे झाला, त्यामुळे प्रत्येक वेळी हिंसेचा वापर न करताही आपले संघर्ष मिटवण्याचे मार्ग त्याला सापडले. कदाचित हिंसक समाज ना व्यक्तीच्या हिताचा असतो ना समाजाच्या, हे बुद्धीच्या बळावर लक्षात आल्यानंतर, माणसांच्या टोळ्यांची वाटचाल ‘समाज’ होण्याच्या दिशेने झाली असावी. प्रत्येक समाजात माणसा- माणसातल्या संबंधांची काही एक रचना केलेली असते. परस्परांशी कसे वागायचे याचे नियम ठरवलेले असतात. समाज रचनेत ज्या व्यक्ती किंवा गट वरच्या स्थानावर असतात, त्यांचा प्रभाव या नियमांवर असतो. साहजिकच, त्यांना जे योग्य वाटतील, त्यांचे हितसंबंध ज्यांद्वारे जोपासले जातील असे नियम तयार होतात. हे नियम जाणीवपूर्वक बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. नियम तोडले तर शिक्षा देण्याची तरतूदही केली जाते. सुरवातीला नियम पाळल्यावर मिळणाऱ्या ‘बक्षिसांचे’ अमिष आणि तोडल्यावर मिळणाऱ्या शिक्षेचा धाक एवढे नियमपालनासाठी पुरेसे असतातही, पण नंतर मात्र हेच नियम का आहेत यांचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता निर्माण होते. कारण नियम आले म्हणजे बंधने आली आणि बंधने कुणालाच मनापासून आवडत नाहीत. लहानपणी आई-‍वडि‍लांवरील विश्वासामुळे, कधी बक्षि‍सांच्या आशेने तर कधी शिक्षेच्या भीतीने त्यांच्या आज्ञा पाळणारी मुले वयात येण्याच्या सुमारास पालकांनी केलेल्या नियमांबद्दल प्रश्न विचारायला सुरवात करतात. खरे तर ही जी एक प्रकारची बंडखोरी असते, ती मुलांच्या बुद्धीचा त्या काळात जो विकास होतो त्याचे लक्षण असते. अशा वेळी, सुजाण पालक आज्ञापालनाच्या मूल्याला अवास्तव महत्त्व न देता नियम करण्यामागची कारणे मुलांना समजावून सांगतात आणि बदलता काळ, बदलत्या गरजा, बदललेली मूल्ये यांचे भान ठेवून काही नियमांमधे बदलही करतात.

तसे पाहिले तर व्यक्तीच्या आचरणाचे नियमन प्रत्येक समाजात निरनिराळ्या मार्गांनी केले जात असते. परंपरा, रूढी, धर्म, कायदा हे सर्व आपापल्या पद्धतींनी व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक वेळा बहुसंख्य लोक कसा विचार करतात, कसे आचरण करतात याचा एक दृश्य-अदृश्य दबाव अनेकांवर असतो. त्यापेक्षा वेगळा विचार किंवा आचार असला तर आपण समाजापासून वेगळे पडू अशी भीती बहुतेकांना असते. या उलट काही जण ते स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धिला अनुसरून वागतात असा दावा करतात. खरे तर वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा यांपैकी कुठलाच मार्ग परिपूर्ण नसतो, प्रत्येकाच्या काही अंगभूत मर्यादा असतात. त्यातली महत्त्वाची मर्यादा ही ज्या काळात, ज्या परिस्थितीत हे मार्ग आखले जातात त्यांची असते. त्याचप्रमाणे नियम करण्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष अधिकार ज्यांना असतो, त्यांचा वरचष्मा त्या प्रक्रियेवर असतो. त्यामुळे हे नियम समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे असतातच असे नाही, किंबहुना नसतातच. नियम करणाऱ्यांच्या ज्ञानाच्या, आकलनाच्या मर्यादाही नियमांवर पडतात. मुद्दा असा आहे की समाज धारणेसाठी नियम गरजेचे असतात हे खरेच, त्याचबरोबर त्या नियमांचे चिकित्सक परीक्षण, मूल्यमापन वेळोवेळी होणे हेही गरजेचे असते. ते कुठले निकष लावून करायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या निकषांची चर्चा तत्त्वज्ञानाच्या नीतिशास्त्र किंवा नीतिमीमांसा या शाखेत केली जाते. या शाखेची ओळख आपल्या नागरिकत्वाला अधिक सुजाण बनवेल हे निश्चित.

Web Title: Dipti Gangavane Writes About Rules Needs And Limits Of Human Being

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top