इच्छा-स्वातंत्र्य : वास्तविक

नियतवाद असे मानतो की, जगात जे जे काही घडते ते तसेच होणार हे पूर्वनियत असते, आधीच तसे ठरलेले असते
Dipti Gangavane writes human being has freedom and desire Reality
Dipti Gangavane writes human being has freedom and desire Realitygoogle

माणूस आपल्याला हवे तसे स्वत:चे जीवन घडवू शकतो, स्वत:च्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवू शकतो आणि त्याला अनुसरून जगू शकतो, अशी सर्वसाधारण समजूत असते. यामध्ये हे गृहीत धरलेले असते की, माणसाला इच्छा-स्वातंत्र्य असते. तो जाणीवपूर्वक आपल्याला काय करायचे आहे, काय करायचे नाही याची निवड करू शकतो. पण त्याच वेळी आपण कित्येक वेळा आपल्या जीवनातील घटनांबद्दल बोलताना प्राक्तन, नशीब, नियती यांचा हवाला देतो. ‘देवाच्या इच्छेखेरीज झाडाचे पानही हलू शकत नाही’ अशी विधानेही सर्रास करत असतो. म्हणजे एकाच वेळी आपण माणूस स्वतंत्र आहे असे मानतो, पण त्याच्या जीवनावर दुसऱ्या कुणाची तरी किंवा कशाची तरी हुकूमत चालते, असेही मानतो. या दोन्हींमध्ये विसंगती आहे, हे बहुतेक वेळा आपल्या ध्यानातही येत नाही. आपले जीवन जर पूर्णपणे नियती, नशीब यांचे गुलाम असले किंवा आपल्या आयुष्यातली प्रत्येक कृतीचा ‘कर्ता-करविता’ कोणी वेगळाच असला तर आपण कठपुतळ्यांचे आयुष्य जगत आहोत, असे म्हणायला लागेल. कठपुतळ्या जे काही ‘करतात’ त्याचा सूत्रधार वेगळाच असतो. त्यांच्या कृतींना तोच जबाबदार असतो. त्यामुळे त्यांना काय करणे योग्य आणि काय अयोग्य हे सांगण्यात काहीच अर्थ नसतो.

नियतवाद असे मानतो की, जगात जे जे काही घडते ते तसेच होणार हे पूर्वनियत असते, आधीच तसे ठरलेले असते. कधी कधी ‘नियती’ नावाची कोणी अदृश्य, माणसाच्या सुख-दु:खाची पर्वा नसलेली शक्ती त्यामागे आहे, असे समजले जाते. काही जडवादी असा युक्तिवाद करतात की, सजीव-निर्जीव सृष्टीतील सर्व घडामोडी निसर्ग नियमांनुसार यांत्रिकपणे होत असतात. एकेकाळी दैवी प्रकोप मानल्या जाणाऱ्या भूकंप, वादळे, महापूर यासारख्या नैसर्गिक घटना का घडतात, याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करणे आज शक्य झाले आहे. पण सजीवांच्या, खास करून माणसाच्या आयुष्यातील घटनाक्रम असा केवळ निसर्गनियमांच्या आधारे स्पष्ट करता येणार नाही, असा बहुतेकांचा विश्वास असतो. माणूस केवळ भौतिक द्रव्यांचा बनलेला नाही, त्याच्यामध्ये त्यापलीकडचे काही असते, या समजुतीचा त्या विश्वासाला आधार असतो. वैज्ञानिक जडवादाचे मत मात्र असे आहे की, सजीवांचा जीवनक्रम गुंतागुंतीचा असला तरी, तोही निसर्ग नियमांनुसारच आकाराला येत असतो. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, उत्क्रांतीविज्ञान, मेंदूविज्ञान इत्यादी शास्त्रे हे नियम शोधून काढत असतात. या नियमांबद्दलचे आपले ज्ञान जसजसे वाढत जाईल, तसतसे माणसांसकट सगळ्या सजीवांच्या वर्तनामागचे कार्यकारण- संबंध आपल्या जास्त-जास्त लक्षात येऊ लागतील. तेव्हा कदाचित असे आढळेल की, आपल्याला इच्छा स्वातंत्र्य नसतेच, पण ते आहे असे अज्ञानामुळे आपल्याला फक्त भासते.

या उलट आपले बहुतांश सामाजिक व्यवहार; माणूस जे काही करतो त्याच्या परिणामांची जबाबदारी त्याचीच असते, या मान्यतेच्या आधारे चालतात. चुकीच्या वर्तनाला शिक्षा आणि चांगल्या कृतीला बक्षीस दिले जाण्याचा पायंडा हेच दर्शवतो. किंबहुना माणसाला समाजमान्य रीतीने वागायला शिकवण्याचा तो प्रभावी मार्ग मानला जातो. माणसाने कशा प्रकारचे जीवन जगायला हवे, याचे मार्गदर्शन सर्वच संस्कृतींमध्ये माणसांना दिले जाते. नीति, धर्म, कायदा या सगळ्यांचे ते महत्त्वाचे कार्य असते. या सगळ्यांमध्ये माणसाच्या स्वरुपाविषयी एकवाक्यता नसते. पण माणसाला इच्छा-स्वातंत्र्य आणि निवड क्षमता असते, या बाबतीत मात्र त्या सर्वांचे सहसा एकमत असते. माणसाच्या बुद्धीचा, विचारक्षमतेचा विकास ज्या प्रकारे झाला आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक क्षणी काय करावे, या संबंधीचे पर्याय उपलब्ध असतात. त्यामधून निवड करून काय करायचे याचा निर्णय तो घेऊ शकतो. त्यानुसार कृती करू शकतो, असा आपला सर्वसामान्यपणे विश्वास असतो. अनुभवाच्या पातळीवर हे खरे आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. विज्ञान भविष्यात या विश्वासाचा खरे-खोटेपणा सिद्ध करेल. मात्र नीतिचा विचार आणि व्यवहार या दोन्हीसाठी माणसाचे इच्छा-स्वातंत्र्य अनुभवाच्या आधारे गृहीत धरावे लागते हे लक्षात ठेवायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com