कशासाठी? सुखासाठी!

सॉक्रेटिस आणि त्यांचे शिष्य प्लेटो यांच्याप्रमाणेच प्लेटोंचे शिष्य अॅरिस्टॉटल यांनी नीतिमीमांसेला महत्त्वाचे योगदान दिले.
Dipti Gangavane writes human original nature and natural desire for happiness
Dipti Gangavane writes human original nature and natural desire for happinessSakal
Summary

माणसासाठी कुठल्या प्रकारचे जीवन सर्वात इष्ट ठरेल, याचा विचार करताना त्यांनी नीतिचा विचार जसा केला, तसाच माणसाचे मूळ स्वरूप आणि त्याला सुख मिळवण्याची जी स्वाभाविक इच्छा असते तिचाही विचार केला.

सॉक्रेटिस आणि त्यांचे शिष्य प्लेटो यांच्याप्रमाणेच प्लेटोंचे शिष्य अॅरिस्टॉटल यांनी नीतिमीमांसेला महत्त्वाचे योगदान दिले. या परंपरेत आपल्या गुरूंबद्दल पूर्ण आदर बाळगूनही, जिथे आवश्यक वाटले तिथे त्या विचारांची कठोर चिकित्सा करायला शिष्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ अशी वृत्ती न बाळगल्याने विचारांचा प्रवाह एकाच जागी थबकून न राहता पुढे वहात राहिला. त्यामधून अभ्यास विषयाचे नवे-नवे पैलू समोर येत राहिले. अॅरिस्टॉटल यांच्या नीतिमीमांसेतही सद्गुण ही संकल्पना मध्यवर्ती आहे. पण त्यांची नीतिमीमांसा त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा वेगळी आहे. अॅरिस्टॉटल यांचे एकूण तत्त्वज्ञान प्लेटो यांच्या आदर्शवादापेक्षा सामान्य माणसाच्या व्यवहारवादाशी जास्त जवळचे आहे. माणसासाठी कुठल्या प्रकारचे जीवन सर्वात इष्ट ठरेल, याचा विचार करताना त्यांनी नीतिचा विचार जसा केला, तसाच माणसाचे मूळ स्वरूप आणि त्याला सुख मिळवण्याची जी स्वाभाविक इच्छा असते तिचाही विचार केला.

अॅरिस्टॉटल असे मत मांडतात की माणसाची प्रत्येक कृती काही ना काही मिळवण्याच्या इच्छेने केलेली असते. अनेक वेळ काही वस्तू मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. कधी घराची इच्छा तर कधी घरात वापरण्यासाठीच्या उपयोगी, दिमाखदार, आरामदायक सुखसाधनांची इच्छा. प्रवास करण्याची इच्छा किंवा महागडे वाहन घेण्याची इच्छा. त्याचबरोबर आरोग्य, संपत्ती, यश, कीर्ति, चांगले नातेसंबंध, मान-सन्मान हे सगळे मिळवण्याची इच्छा. यातली प्रत्येक गोष्ट कशासाठी हवी आहे असा विचार केला तर लक्षात येते की ती मिळाल्यावर आपल्याला सुख मिळेल अशी आपली समजूत असते. याचा अर्थ असा की जे काही हवेसे वाटते, ते मिळाल्यावर आपण सुखी होऊ असे आपल्याला वाटत असते. सुखासाठीच इतर सर्व गोष्टी हव्याशा वाटतात. पण ‘सुख कशासाठी हवे?’ असा प्रश्न मात्र निरर्थक ठरतो. कारण सुखाच्या कल्पना व्यक्तीगणिक बदलत असल्या तरी सुखाची इच्छा अत्यंत नैसर्गिक आहे. त्याचे समर्थन करण्याची गरज नसते. पण आपल्या दृष्टीने जी सुखाची साधने असतात, ती मिळाल्यावरही आपण सुखी होऊच याची खात्री देता येत नाही. म्हणूनच सुख नक्की असते कशात? या प्रश्नाचा विचार करावाच लागतो.

तत्कालीन ग्रीक संस्कृतीला अनुसरून, अॅरिस्टॉटल सुखासाठी ‘युडेमोनिया’ हा शब्द वापरतात. ते असे मानतात की ‘युडेमोनिया’ हे माणसाच्या आयुष्यातले सर्वोच्च उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. ग्रीक भाषेत ज्याला ‘युडेमोनिया’ म्हणतात, त्याचे इंग्लिशमध्ये ‘हॅपीनेस’ असे भाषांतर केले जाते. पण वस्तुत: सर्वसाधारणपणे ज्याला ‘सुख’ म्हटले जाते त्यापेक्षा ही संकल्पना खूप व्यापक आहे. त्यामध्ये सुखाबरोबरच हिताची/कल्याणाची कल्पना समाविष्ट आहे. मनुष्याच्या एकंदर व्यक्तित्वाचे सर्वांगाने बहरणे त्यात अपेक्षित आहे. अॅरिस्टॉटल यांच्या मते युडेमोनिया ही एखादी मानसिक अवस्था किंवा स्थिती नाही. त्याचप्रमाणे तो व्यक्तीचा एखादा गुणधर्म नाही. कृतीशीलता हा युडेमोनियाचा पाया आहे. याचा अर्थ असा की सुख मिळवण्यासाठी कृतिप्रवण असायला हवे. आपण ज्या कृती करायच्या ठरवतो, त्यांची निवड बुद्धीच्या आधारे करायला हवी. बुद्धी किंवा विवेकशीलता हा मनुष्यत्वाचा गाभा आहे, हे मनुष्याच्या सुखाचा विचार करताना विसरता कामा नये. निव्वळ शारीरिक सुखांचा विचार करून जगणे हे प्राणी पातळीवरचे जगणे असते. माणसाला ज्या विशेष क्षमता आहेत त्यांचा यथायोग्य वापर झाल्याखेरीज माणूस खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकणार नाही. शरीर सुखांना चांगल्या जीवनात काही स्थान नाही, असा याचा अर्थ नाही. ग्रीक संस्कृतीत एक चांगल्या, परिपूर्ण जीवनाच्या कल्पनेत देहाच्या सुखांनाही योग्य ते महत्त्व दिलेले आहे. अॅरिस्टॉटल याला अपवाद नाहीत. किंबहुना, त्यापुढे जाऊन ‘सुखी’ म्हणजे ‘युडेमोन’ व्यक्तीचे जीवन कसे असेल याचे वर्णन करताना ते चांगल्या कुटुंबात जन्म होणे, सुस्वरूप असणे, धनवान असणे, चांगला मित्रपरिवार असणे या गोष्टींचाही उल्लेख करतात. पण युडेमोनियाची त्यांच्या विवेचनातील सगळ्यात महत्त्वाची चर्चा आहे ती ‘सद्गुण’ या संकल्पनेची. तिची ओळख पुढची लेखात करून घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com