
प्रत्येक तत्त्वज्ञ त्याच्या काळाचे अपत्य असतो. त्या काळाच्या सामाजिक आणि वैचारिक इतिहासाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झालेला असतो. कितीही प्रतिभाशाली विचारवंतालाही काळाची स्वाभाविक मर्यादा असते. प्लेटोही याला अपवाद नाहीत.
प्लेटो यांची ‘न्याय’ संकल्पना
प्रत्येक तत्त्वज्ञ त्याच्या काळाचे अपत्य असतो. त्या काळाच्या सामाजिक आणि वैचारिक इतिहासाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झालेला असतो. कितीही प्रतिभाशाली विचारवंतालाही काळाची स्वाभाविक मर्यादा असते. प्लेटोही याला अपवाद नाहीत. सॉक्रेटिस यांचा उत्साही, मर्मग्राही तरुण विद्यार्थी ते स्वतंत्र प्रज्ञेचा तत्त्वज्ञ असा जो दीर्घ प्रवास झाला, त्यात प्लेटो यांचे तत्त्वचिंतन विकसित होत गेले आहे. प्लेटो यांची नीतिमीमांसा आदर्शवादी आणि बुद्धीवर आधारित होती. पण त्यांच्या काळात प्रत्यक्ष व्यवहारात उतरवल्या जाणाऱ्या स्वार्थावर आधारित नीतिची त्यांना कल्पना नव्हती असे नाही. किंबहुना या नीतीचे समाजावर केवढ्या मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत आहेत, याच्या अस्वस्थ करणाऱ्या जाणीवेमुळेच नीतीशी निगडित संकल्पनांची चिकित्सक चर्चा करण्याची आवश्यकता त्यांना वाटली असावी. या दृष्टिकोनातून त्यांच्या ‘रिपब्लिक’ या सुप्रसिद्ध संवादातील ‘न्याय’ संकल्पनेचे विवरण बघायला हवे.
या संवादात ‘न्याय’ संकल्पनेची चर्चा आहे. न्याय या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छ्टा आहेत. माणसाचा अकाली मृत्यू ‘देवाघरचा हा कुठला न्याय?’ असा प्रश्न उत्पन्न करतो. ताकदवान प्राण्याने भूक लागल्यावर अशक्त प्राण्याची शिकार करून खाणे हा ‘निसर्गाचा न्याय’ असतो. जातिभेद पाळणे हे ‘सामाजिक न्याया’चे उल्लंघन असते. न्यायालयात ‘न्याय’ मिळवण्यासाठी कायद्याच्या लढाया लढल्या जातात. ग्रीक संस्कृतीत न्याय हा एक सद्गुण मानला जाई. या मान्यतेनुसार प्लेटो ‘न्याय’ या सद्गुणाचे विवेचन करतात. सोफिस्ट या मताचे होते की साधारणपणे ज्याला न्याय समजले जाते, त्याची गरज सर्वसामान्यांना असते. बलिष्ठांनी न्याय-अन्यायाची पर्वा करायची जरूर नाही, खरा न्याय म्हणजे बलिष्ठांचे हक्क असे असे सोफिस्ट मानत. प्लेटो असे मानतात, की व्यक्ती आणि समाज यांच्या निरोगी आणि संतुलित जीवनासाठी न्यायाची आवश्यकता असते. न्यायाचे विवेचन ते व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या संदर्भात करतात. व्यक्ती नश्वर शरीर आणि अविनाशी आत्मा यांची मिळून झालेली असते. आत्मा जणू त्रिदली- तीन भागांचा मिळून बनलेला असतो. त्याचे एक दल असते विवेकाचे अथवा बुद्धीचे, एक दल असते मान-सन्मान, कीर्ती मिळवण्याच्या इच्छांचे, तर तिसरे दल असते मूलभूत वासनांचे. आत्म्याच्या या तिन्ही अंशांमधे सुसंवाद असेल तरच व्यक्तीची सर्व कार्ये सुरळीत चालतात. आपले जीवन संतुलित राहते. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी प्लेटो रथाचे रुपक वापरतात. इच्छा आणि वासना ह्या रथाला जोडलेले दोन घोडे आहेत. इच्छेचा घोडा समजूतदार, काबूत ठेवायला तुलनेने सोपा असा आहे. दुसरा वासनेचा नाठाळ घोडा नियंत्रणात आणणे सहज शक्य नाही. या घोड्यांचे लगाम सारथी असलेल्या विवेकाच्या हातात आहेत. रथ व्यवस्थित चालण्यासाठी ज्याप्रमाणे घोडे सारथ्याच्या ताब्यात असावे लागतात, त्याचप्रमाणे संतुलित जीवन जगण्यासाठी आपल्या इच्छा, वासना यांच्यावर विवेकाचे नियंत्रण असावे लागते.
व्यक्तीच्या संदर्भात न्याय म्हणजे विवेकी बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली इच्छा आणि वासना यांचे कार्य होणे. कारण या स्थितीत आत्म्याचे प्रत्येक अंग, आपापले कार्य एकंदरीत व्यक्तीला हितकारक ठरेल, अशा पद्धतीने करत असते. कुठल्याच भागाचे दमन करावे लागत नाही, तसेच कुठलाच भाग अनिर्बंध, अनियंत्रित नसतो. कुठलाच मानव स्वयंपूर्ण नसल्यामुळे त्याला इतर माणसांवर अवलंबून राहावे लागते. पण सर्व माणसांच्या क्षमता एकसारख्या नसतात. प्लेटो असे मानतात, की समाजात कष्टकरी-कारागीर, सैनिक आणि मार्गदर्शक नेते अशा तीन प्रकारचे लोक असतात. समाजाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मूलभूत गरजांची पूर्ती, संरक्षण आणि नेतृत्व ही तीन कार्ये सुरळीत व्हावी लागतात. ती पार पाडण्याची जबाबदारी या तीन वर्गांवर असते. प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार काम करायला मिळणे, हा या पातळीवर न्यायाचा अर्थ असतो. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे प्लेटो यांच्या विवेचनाला तत्कालीन सामाजिक, वैचारिक परिस्थितीच्या मर्यादा आहेत. त्यावर गंभीर आक्षेपही घेतले गेले आहेत. तरीही विविध घटकांमधील सुसंवाद, हा न्यायाचा गाभा आहे, हा त्यांचा विचार दुर्लक्षणीय नक्कीच नाही.
Web Title: Dipti Gangavane Writes Pleto Concept Of Justice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..