दिशा स्त्रीविरोधी गुन्हे रोखण्याची

महेश मुरलीधर भागवत पोलिस आयुक्त (राचकोंडा, सायबराबाद पूर्व, तेलंगण)
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

मानद संपादकीय

मानद संपादकीय

यत्र नार्यस्तू पूज्यन्ते ।
रमन्ते तत्र देवतः
जिथे नारीचा सन्मान होतो, तिथे देवता वास करते असे म्हणतात. प्राचीन काळापासून स्त्रियांना महत्त्व होते; पण हळूहळू स्त्रियांचे स्थान कमी होत गेले आणि आपली संस्कृती पुरुषप्रधान झाली. मध्ययुगीन काळात तर स्त्रियांचे महत्त्व खूपच कमी झाले. पुढे सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या नसत्या, तर तिच्या लेकी आजही चार भिंतीच्या आतच राहिल्या असत्या. जन्म होण्यापूर्वीपासून सुरू झालेला स्त्रियांचा त्रास मरेपर्यंत संपत नसे. स्त्रीभ्रूणाची हत्या आजही चालते. तेलंगणमध्ये आदिवासी समाजात मुलगी झाली, तर नवरा दुसरे लग्न करेल, या भीतीपोटी आईच मुलीचा गळा घोटते, असे काही प्रकार घडतात. आता आधुनिक काळ आला, असे आपण म्हणतो; पण या परिस्थितीत बदल नाही.

सोशल मीडिया आला; गुन्हे चालूच राहिले. फक्त प्रकार बदलले. स्मार्ट फोनवर एखाद्या मुलीचे छायाचित्र काढायचे आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायचे, असे प्रकार सुरू झाले. अशा प्रकारांना बळी पडलेल्या मुली बऱ्याचदा पोलिसांपर्यंत पोचू शकत नाहीत. अत्याचारांमुळे निर्माण झालेल्या मानसिक दबावाला बळी पडून त्या काही वेळा आत्महत्येचा मार्ग पत्करतात. "ऑनर किलिंग'चेही प्रकार घडतात. विवाहानंतर काही स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात. तिला मुलगाच व्हावा म्हणून छळ होतो. कधी विवाहितेवर नातेवाइकांकडूनच अत्याचार होतात, अशा वेळी ती स्त्री बोलू शकत नाही. स्त्री वयस्कर झाल्यानंतर संपत्तीच्या हव्यासापोटी तिचा जीव घेतला जातो.
स्त्रियांसंबंधातील कायद्याचा अभ्यास केला, तर सगळे कायदे तिच्याच बाजूचे आहेत. त्यात कठोर कारवाईची तरतूद आहे; परंतु अशा कायद्यांची अंमलबजावणी परिणामकारक होत नसल्याने स्त्रियांचा त्रास वाढतोच आहे. अनेकदा साक्षीदार समोर न येणे, फितूर होणे अशा प्रकारांमुळे अत्याचारित स्त्री न्यायापासून वंचित राहते. याचा परिणाम म्हणून आरोपींना जबर शिक्षा होत नाही. थोडक्‍यात "कार्येषू दासी, कर्णेषू मंत्री, भोजनेशू माता आणि शयनेशू रंभा' ही प्राचीन काळाची स्थिती आजही कायम आहे. स्त्रीकडे पाहण्याची समाजाची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

तेलंगणमध्ये स्त्रियांबद्दलच्या या मानसिकतेत आणि खुद्द स्त्रियांच्याही मानसिकतेत आता बदल होऊ लागला आहे. स्वतंत्र राज्य निर्मितीनंतर तेलंगणात सर्वांत प्रथम स्त्रियांच्या प्रश्‍नांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली. पुरुष आणि स्त्री अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीने वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोकांशी चर्चा केली, तेव्हा स्त्रियांच्या छेडछाडीचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांना आढळले. असा प्रकार घडल्यास तक्रार न देण्याची मुलगी किंवा तिच्या पालकांची मानसिकता हीच गुन्ह्यांची उकल होण्यातील व गुन्हे रोखण्यातील अडथळा ठरू लागली. त्यावर उपाय म्हणून सरकारने ऑक्‍टोबर 2014 मध्ये SHE TEAM तयार केली. या पथकात फौजदाराबरोबर एक-दोन महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली. सार्वजनिक ठिकाणी जिथे छेडछाड होते, तेथे हे पथक अत्याधुनिक कॅमेऱ्यासह साध्या वेशात गर्दीमध्ये मिसळते. छेडछाडीचे प्रकार कॅमेऱ्यात बंदिस्त केले जाऊ लागले. छेडछाड करणाऱ्यांना ते चित्रीकरण दाखविले जाते. आरोपी विवाहित असेल, तर त्याच्या पत्नीला आणि अविवाहित असेल, तर त्याच्या पालकांना बोलावले जाते. पहिलाच गुन्हा असेल, तर समज देऊन सोडून दिले जाते. अशा प्रकरणात तक्रारदार पुढे आला, तर कायदेशीर कारवाईही होते. तक्रारदार नसेल, तर पोलिस सुधारण्याची संधी देतात. मात्र त्याच्या बोटांचे ठसे, छायाचित्र आदींचे रेकॉर्ड ठेवले जाते. अशा गुन्हेगारांचे दर पंधरा दिवसांनी समुपदेशन केले जाते. हैदराबादमध्ये प्रथम ही टीम स्थापन झाली. गेल्या दोन वर्षांत या टीमचे काम अतिशय उत्तम चालले आहे.

"सीएसएस' या यंत्रणेने महिलांच्या सुरक्षेचा अभ्यास केला. त्यानुसार स्त्रियांसाठी सर्वाधिक सुरक्षित राज्य म्हणून सिक्कीमचा पहिला क्रमांक लागतो, तर तेलंगणाचा दुसरा. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा कल्पक वापर केला जात आहे. या टीमने व्हॉट्‌सऍपचा एक क्रमांक जाहीर केला. त्यावर अभागी मुली, महिला पोलिसांशी संपर्क साधत आहेत. पोलिसही तातडीने अशा तक्रारींची दखल घेत आहेत. तक्रार करणाऱ्या मुलीचे नाव गुप्त ठेवले जाते. खाकी वर्दीतील माणुसकी जनतेला अनुभवास येऊ लागली आहे. "गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा... गणवेशातील माणुसकी तुम्ही जाणून घ्या हो जरा...' या शांताराम नांदगावकरांच्या गीताची प्रचिती त्यामुळे येऊ लागली आहे.

Web Title: direction to curb crime against women