दुरितांचे तिमिर जावो... (अग्रलेख)

diwali
diwali

रोजच्या जगण्यातील नानाविध समस्यांचे भेंडोळे काही काळ मनाबाहेर करून लक्ष दिव्यांनी घर उजळून टाकण्याची ऊर्मी म्हणजे माणसाच्या सकारात्मकतेचेच एक रूप आहे. ही सकारात्मक परंपराच आपल्याला पुढील संघर्षासाठी बळ देत असते.

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्‍विन आणि कार्तिकाच्या संधिकालात गारठा नुकताच पाणवठ्यांवर रेंगाळू लागलेला असतो, तेव्हा उंबरठ्यावर दिवाळी रुणझुणत येते. तिच्या सौभाग्यशाली पावलांनी घरअंगण उजळून निघते. उंबऱ्यावरचे आतुर दिवे स्वागतशील मनाने तिला ‘ये’ म्हणतात. मग तुमच्या-आमच्या दोन खणी घरालाही बिलोरी लकाकी चढते. समस्यांचे भेंडोळे काही काळ मनाबाहेर करून लक्ष दिव्यांनी घर उजळून टाकण्याची ही ऊर्मी म्हणजे माणसाच्या सकारात्मकतेचेच एक रूप आहे. गेली कैक वर्षे हा उत्सव अव्याहत चालू आहे. परचक्रे, दुष्टचक्रे, दमनचक्रे आणि धर्मचक्रांच्या घरघराटातही दीपावलीची ही परंपरा अखंड चालू आहे. आपल्या दारासमोर दिवाळीत उजळलेली पणती एकटी नाही. इतिहासातील कोट्यवधी पणत्यांच्या रांगेचा ती वर्तमानातला दुवा म्हणून तेवत असते. अंध:कारावर नित्यनेमे मात करणाऱ्या या दीपोत्सवाचा प्रारंभ कुठे झाला? कुणी म्हणतात, उत्तर ध्रुव प्रदेशातून आलेल्या आर्यांनी भरतखंडात ही दिवाळी आणली. तिथे सहा महिने रात्र, सहा महिने दिवस. सहा महिन्यांच्या दीर्घ काळोखानंतर उजाडणारी पहिली पहाट तिथे तर साजरी होणारच; पण इथेही होऊ लागली. पुराणांतरीच्या एका कथेनुसार, बळी नावाच्या बलाढ्य राजाला पाताळात दडपण्यासाठी विष्णूच्या वामनावताराने आश्‍विन वद्य त्रयोदशीचा मुहूर्त निवडला, तीच ही दिवाळी. समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर तिने भगवान विष्णूंशी विवाह केला, तो दिवस म्हणजे ही दिवाळी. पद्म पुराणातल्या रामायणात लंकेत रावणाला गाडून श्रीरामांनी विसाव्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला, तो दिवस म्हणजे ही दिवाळी...दिवाळीच्या अशा कितीतरी सुरस कथा आणि लोककथा आहेत; पण खरी कथा हीच : दाणागोट्याचा निकाल लागल्यावर जिवाला मिळालेला थोडासा इस्वाटा म्हणजे दिवाळीचे दिवस. पेच, स्पर्धा, संकटे, व्याधी यांच्याशी झुंज घेता घेता हाताला लागलेली फुरसत म्हणजे दिवाळीचे दिवस. काळोखाच्या भुयारात हाती लागलेली दिवटी म्हणजे दिवाळीचे दिवस. कुठलाही उत्सव घ्या, त्याच्या मुळाशी ही ‘मानलेली’ का होईना, पण तृप्तीच असते.

हल्ली दिवाळी निसर्गनेमाने येण्याची शक्‍यता दुरापास्त होत चालली आहे. गारठादेखील म्हणावा तसा पडत नाही. पूर्वी या दिवसांत डोकीला लावायचे खोबरेलही थिजायचे. आता कुठे थिजते? पीकपाणी मायंदाळ होण्याचे दिवस तर आता बहुधा इतिहासजमा झाले आहेत. हाती लागले तेवढे आपले म्हणायचे एवढेच. औंदा तर पावसकाळाने चांगलीच ओढ दिल्याने दुष्काळाची लांबलचक सावली दिसू लागली आहे. हा हा म्हणता तो अवकाळ उंबरठ्यावर येऊन ठेपेल. या अवकाळाशी झुंजण्याचे सामर्थ्य दीपावलीचे दिवे देत असतात. जे शेतकऱ्यांचे, तेच चाकरमान्यांचे. खात्यात जमा झालेला पगार महिनाअखेरपर्यंत कुणाला पुरला आहे? कामाचे तास वाढले, खाणारी डोकी वाढली; पण खिशातली खुळखुळ तेवढीच आहे. तरीही या अभावपर्वात दिवाळी साजरी करणे चुकत नाही. कारण, ही सकारात्मक परंपराच आपल्याला पुढील संघर्षासाठी बळ देत असते.

त्यामुळेच बहुधा असल्या अभावकाळातही दुकाने मात्र गजबजलेली आहेत. बाजार ओसंडून वाहतो आहे. रंगीतमाळा, दिव्यांनी रस्त्यांचे पदपथ आक्रमिले आहेत. मिठायाच्या, फराळाच्या दुकानांमध्ये ऑर्डरींची गर्दी आहे. पिशव्या हलवत रस्त्यांवर हिंडणारी जोडपी, कुटुंबे, आहे तशीच आहेत. सोन्याच्या भावाने बत्तीस हजारी झेप घेतली असली तरी, पेढ्यांच्या वातानुकूलित दारांपलीकडची झुंबड चकित करणारी आहे. मोबाईल फोनच्या दुकानांमध्ये तुडुंब सवलतींचा पाऊस आहे. मोटारी आणि मोटारसायकलींची दुकाने धूमधडाक्‍यात विक्री करताना दिसताहेत. शहरगावातले मॉल तर भलतेच सजले-धजले आहेत. जणू काही कुण्या गावात धनवंताघरच्या मंगलकार्यात हौसेने सामील झालेल्या गावकऱ्यांसारखा सारा माहौल आहे. हे गोजिरे चित्र दुरून पाहिले तर कुणाला वाटेल की हा देश समृद्धीच्या महामार्गावर सुसाट निघाला आहे; पण दुष्काळाच्या गंभीर सावटाकडे किंचित डोळेझाक करून आपण हा दीपोत्सव साजरा करतो आहोत, याचे भान असलेले बरे.

अर्थात, सारेच अंधारलेले आहे असे समजण्याचे कारण नाही. अभावपर्वालाही थोडीफार रुपेरी किनार असतेच. पंधरवड्यापूर्वीपर्यंत शंभरीच्या घरात जाऊ पाहणारी इंधन दरवाढ घसरताना दिसू लागली आहे. सुगीचे दिवस असल्याने सर्वसामान्य चाकरमान्याला नाही म्हटले तरी थोडासा दिलासा मिळू लागला आहे. फटाक्‍यांवर निर्बंध आले असले तरी खळखळून हास्यावर बंदी नाही. मुख्य म्हणजे उजेडाच्या या अद्वितीय उत्सवात उत्साहाची कमतरता नाही. आणखी काय हवे? या दिवाळीच्या निमित्ताने उरलासुरला अंधारही फिटो. इडापीडा टळून बळीचे राज्य अबाधित राहो. तुम्हा-आम्हां घरी आलेल्या दीपावलीची ही रुमझुमती पैंजणे चार दिवस नव्हे, वर्षभर वाजत राहोत, या मन:पूर्वक शुभेच्छा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com