इथं दिवे, तिथं दिवे; जगण्याला सूर नवे... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

अंधकाराचा निरास करण्यासाठी समाजमन एक झालं पाहिजे, भेदाभेदांचं अमंगल दूर झालं पाहिजे, हाच दीपोत्सवाचा संदेश असतो. दिवा-दिवा प्रज्वलित करताना आपण तो लक्षात घ्यावयास हवा. 

अंधकाराचा निरास करण्यासाठी समाजमन एक झालं पाहिजे, भेदाभेदांचं अमंगल दूर झालं पाहिजे, हाच दीपोत्सवाचा संदेश असतो. दिवा-दिवा प्रज्वलित करताना आपण तो लक्षात घ्यावयास हवा. 

आकाशातील तारकादळं हातांत हात गुंफून धरतीवर उतरावीत आणि त्यांच्या सुवर्णमयी किरणांनी चौफेर झगमगाट व्हावा, तसं वातावरण दीपोत्सवाच्या निमित्तानं आपण सारेच सध्या अनुभवीत आहोत. दिवाळी तीच असली, तरी दर वर्षी नव्या-वेगळ्या रूपात ती अवतरत असते. पावसाचे वत्सल आशीर्वाद यंदा बव्हंशी भागांत पोचले आहेत. त्याची समृद्ध प्रसादचिन्हं शिवारांत डोलत आहेत. सलगच्या दुष्काळांनी ओढलेल्या काजळरेषा पुसून टाकण्यासाठी माणसं एकवटली, नदी-नाल्यांच्या, विहिरी-तळ्यांच्या गाळभरल्या शुष्क ओंजळी भगीरथप्रयत्नांनी त्यांनी रिकाम्या केल्या आणि पाऊसथेंबांनी भरलेले मोती त्यात काठोकाठ तुडुंब झाले. एका बाजूनं हे चित्र असलं, तरी काही भागांत शेतजमिनींचे तृषार्त चातक अजूनही सरींच्या प्रतीक्षेत आहेत; पण तिथली माणसं ही दुष्काळजड लढाई हरलेली नाहीत. दिवेलागण करूनच अंधकार हटतो, या दीपोत्सवी संस्कारावर श्रद्धा ठेवून हे समाजसमूह जलभरणाच्या कामांत मग्न आहेत. संकटभरल्या वाटांवर माणसं रचनात्मक कामांचे दीप उजळवीत आहेत. दिवाळीची अशी आनंदयात्रा सुरू झाली आहे. माणसामाणसांच्या खांद्यांवर उत्साहाच्या पताका आहेत. समाजबांधणीच्या प्रयत्नांतून आकाराला येणाऱ्या कलात्मकतेच्या अब्दागिरी त्यांनी उंचावल्या आहेत. धरणीच्या भाळावर निसर्गसौंदर्याच्या गंधरेषा हसत आहेत. सकारात्मकतेच्या ऊर्जेतून निर्माण झालेले अभंगशब्द वातावरणाचे पावित्र्य वृद्धिंगत करीत आहेत. प्रबोधनाच्या विचारांची प्रकाशपालखी घेऊन अनेक जनसमूह या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

दर वर्षीच्या दिवाळीला कितीतरी संदर्भ जोडलेले असतात. वर्षभरातील भल्याबुऱ्या घटना-घडामोडींचे, विचारमंथनांचे, आव्हानांचे आणि त्यावर उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नांचे चढ-उतार, ऊन-पाऊस या संदर्भात मिसळलेले असतात. आनंदाच्या ओंजळी भरून घेताना काजळलेल्या प्रसंगांचे-क्षणांचे थेंबही उचलून घ्यावेच लागतात. त्यांना बाजूला ठेवून ओंजळ भरून घेता येत नाही. 'भुकेलेल्याला आधी घास द्या आणि मगच तुम्ही अन्नग्रहण करा' असं आपली संस्कृती सांगते. त्याचा अर्थ, आनंदातही दुःखितांची आठवण जागी ठेवा, असा आहे. एकेकट्यानं घ्यावयाचा आनंद कधीच परिपूर्ण नसतो. सर्व प्रवाह त्यात सामावून घेतल्यावरच त्यावर पूर्णत्वाचं नक्षत्र उगवून येतं. दिशा उजळत असतानाही कुठं कुठं अंधारकडा डोकावत असतातच. ते कोपरे उजळविण्यासाठी प्रकाशाला तिथपर्यंत पोचावं लागतं. आजही अशा अंधारकडा आजूबाजूला जाणवत आहेत. देशाच्या सीमा तापत आहेत. रोज तिथं काही ना काही कुरबुरींचे ओरखडे उमटत आहेत. समाजाची उतरंडही ढवळून निघते आहे. अन्यायाच्या-अत्याचारांच्या जखमांची दुःखं काळीज चिरीत आहेत. सत्तेच्या सारीपाटावर कुरघोडींचे डाव-प्रतिडाव सुरू आहेत. दिवाळीचा आनंद या साऱ्यांसह सामोरा आला आहे. अशा आंबटगोड आनंदाला सोबतीला घेऊनच ही यात्रा वाटचाल करीत असते; विश्रामस्थळं आणि मुक्कामाच्या रात्री पार करीत असते. 

दऱ्याखोऱ्यांतून पराक्रमाचे पोवाडे गाणाऱ्या महाराष्ट्रभूमीनं अंधारानं कोलमडून पडण्याचं खचलेपण कधीच स्वीकारलं नाही; किंबहुना या भूमीत ते कधी रुजूही शकणार नाही. महाराष्ट्रभूमी पराक्रमी वीरांची, लढवय्यांची आणि जेत्यांची आहे; तशीच ती काळानुरूप केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रयोगशील प्रयत्नांचीही आहे. महाराष्ट्रानं संकटं कधी कुरवाळली नाहीत; तर दर वेळी त्यांची उत्तरंच शोधली आहेत. शेती, पाणी, पायाभूत सुविधा, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा किती तरी क्षेत्रांत नवनव्या प्रयोगशीलतेचे दीप तेजाळत आहेत. तरुणांची मोठी फळी उद्योगशीलतेचा स्वीकार करून राष्ट्रनिर्माणाच्या सफलकार्यासाठी कटिबद्ध होते आहे. या नवनिर्माणाच्या वातींना बळ द्यावयास हवं; त्या वाती अधिक मोठ्या व लख्ख प्रकाशमान करावयास हव्यात. जेव्हा जेव्हा अंधार दाट होत गेला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रभूमीत प्रबोधनाचे पलिते प्रज्वलित केले गेले. त्या तेजानं त्या त्या वेळचा अंधकार तर दूर झालाच; पण पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यातून प्रकाशाचे राजमार्ग आकाराला आले. जिथं अंधार आहे, संकट आहे, दैन्य आहे, तिथं सकारात्मकतेच्या उजेडाची पेरणी केली पाहिजे, हा महाराष्ट्रभूमीत रुजलेला प्राचीन संस्कार आहे. या संस्कारकथांनी इतिहासाची पानं लखलखली आहेत; आणि आजही त्याच प्रकाशज्योती अनेक ठिकाणी फुलून येत आहेत. अंधकाराचा निरास करण्यासाठी समाजमन एक झालं पाहिजे, भेदाभेदांचं अमंगल दूर झालं पाहिजे, हाच दीपोत्सवाचा संदेश असतो. दिवा-दिवा प्रज्वलित करताना आपण तो लक्षात घ्यावयास हवा. दीपावली म्हणजे परिपूर्ण होत जाण्याचा उत्सव असतो. व्यापारी पेढ्यांत वहीपूजन करताना 'शुभलाभा'च्या अक्षरांबरोबरच समृद्धीचं प्रतीक असलेलं कुंकुममंडित स्वस्तिक रेखाटण्याची प्रथा आहे. प्रारंभक्षणांच्या या पूजनात यशाचे जयघोष भरलेले असतात. 'इथं दिवे, तिथं दिवे; जगण्याला सूर नवे' अशा दीपोत्सवी वातावरणाचं तेज आपण सारे ओंजळीत भरून घेऊ. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी, सर्वमांगल्याच्या प्रस्थापनेसाठी आणि सकारात्मकतेची ज्योत अधिकाधिक प्रकाशमान करण्यासाठी सर्वांना दीपोत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा! 

Web Title: Diwali celebrations all over India