प्रकाशातून जाताना मनाला अंधार चाचपतोय 

Diwali
Diwali

मातीचे दिवे, घरीच बनवलेला आकाशकंदील, फराळ नि फटाके, नवे कपडे, दारावर तोरण... भाजलेल्या रव्याचा सुवास नि करंज्यांचा परिमळ... आणि थंडीची पहिली चाहूल दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला... 

एक काळ होता, की दिवाळी दिवाळीसारखी वागायची-दिसायची. 

भारदस्त, प्रसन्न... आलमेलकरांच्या चित्रातून आत्ताच बाहेर पडलीये जणू... 'ओंजळीत दीप अन्‌ समीप मी तुझ्या पुन्हा...' 

माझी दिवाळी म्हणजे माझ्या बालपणातली. 1950-60-70 चा काळ आणि गिरगावचा परिसर. म्हणजे सॉलिड सांस्कृतिक स्फुरण-बिरण. मातीचे दिवे काय नि घरी खपून बनवलेला कंदील काय. फराळ नि फटाके, नवे कपडे, दारात तोरण-बिरण. रांगोळीच्या कळीदार ठिपक्‍यांतलं विचारमग्न कासव. किंवा चाळीस ठिपक्‍यांचा गालिचा. 

भाजलेल्या रव्याचा खमंग सुवास अफवेसारखा परिसरात सुसाट दौडत असायचा. लहानग्यांच्या अंगाला ओल्या नारळाच्या करंज्यांचा परिमळ. थंडीची हलकी हलकी कुजबूज. पहिला पाऊस सात जूनला आणि थंडीची पहिली चाहूल दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला. बंबातलं कडक तापलेलं पाणी. 

दिवाळी अंक म्हणजे बडा ख्याल. दलाल-मुळगावकरांचं, फडणीसांचं मुखपृष्ठ असेल तर 'आयसिंग ऑन द केक'. आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, पु. ल., करंदीकर, चिंत्र्यम, दुर्गाबाई, इरावतीबाई, भाऊ पाध्ये, नारायण सुर्वे असे दिग्गज लेखक-विचारवंत मराठी समूहमनाची मशागत करत होते. 
नरकासुराची काय हिंमत? 

पुढे आम्ही गिरगाव सोडून एकदम तडकाफडकी बोरीवलीला आलो. गुजराती वस्तीत घर मिळालं. तिथंच अद्याप तग धरून आहोत. बोरीवलीची दिवाळी वेगळी. गुजराती समाजात एक रिवाज आहे. म्हणजे आत्ताआत्तापर्यंत होता. दिवाळीतला पाडवा हे त्यांचं नवं वर्ष. त्या दिवशी भल्या पहाटेला एक माणूस घरोघरी मीठ वाटत फिरायचा. 'सगननूं लूण', शुभशकुनाचं मीठ. पैसे मागायचा नाही. मिठाचा पुडा तो तुमच्या हातात ठेवणार. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्याला जे काही द्यायचं. 

हल्ली दिसत नाही तो. त्याच्याशिवाय आख्खं वर्ष अळणी जातं. 
जरा जास्तच नॉस्टॅल्जिक होतंय की काय हे... 
अलीकडे असं फार होतं. खूप लोक जुन्या आठवणींनी हळवे-बिळवे होत असतात. जेमतेम तिशीच्या आतबाहेर असलेलेसुद्धा एकदम आत्मचरित्रपर बोलू लागतात. 

माणसाला भूतकाळाची आशादायक स्वप्नं पडू लागतील आणि भविष्याच्या आठवणी छळू लागतील तेव्हा त्याला इतिहास म्हणजे काय ते समजेल, असं ई. एच. कार म्हणाला होता. कोण हे कारसाहेब? गुगलवर जाऊन पाहा की. यक... सो बोरिंग. त्यापेक्षा ई-शॉपिंगची साइट बघूया ना. दिवाळी बोनान्झा असेल. 
हल्ली दिवाळी दिवाळीसारखी वागत नाहीए. 
दिवाळी एका मापाची, एकाच रंगाची झालीये. In an age that is utterly corrupt, the best policy is to do as others do. असं मार्क्विस ड सेड का म्हणाला ते लक्षात येतंय. 

असं म्हणतात की सण बदलतात. कारण माणसं बदलतात. माणसं बदलतात कारण काळ बदलतो. कारण परिस्थिती बदलते. कारण माणसाची नियत बदलते, कारण... कारण... 

भारताची जमीन कारणांसाठी सुपीक. 

रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. तर त्यावर महापालिकेचं एक कारण असतं. ते महापालिकेपुरतं खरं असतं. नगरसेवकांचं एक कारण. ते त्यांच्यापुरतं बरोबर. कॉन्ट्रॅक्‍टर मंडळींनी स्वबचावासाठी एक कारण शोधून ठेवलेलं असतंच. कारणांतून कारणं. फटाक्‍यांची माळ. 

अंतिम सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, हा प्राचीन काळातला विचार. सत्याकडे न जाण्याची अनेक कारणं आहेत, हे पोस्ट-ग्लोबलायजेशनचं सुभाषित. 
मीडियाला रोजचा कल्ला चालवायचा असतो. सत्य त्यांना परवडत नाही. मग काय? तर India wants to know. 

बत्तीस लाख क्रेडिट-डेबिट कार्डांचं फसवणूक प्रकरण. त्याची काही कारणं आहेतच. ती facts या सदरात मोडतात. सत्य मात्र एकच आहे. भेदक नि भेसूर. की आपलं अध्यात्माचं पितळ उघडं पडलंय. 'ठेविले अनंते तैसेची राहावे' म्हणता म्हणता आपण सगळीकडे स्वार्थाचा चिखल करून ठेवला. मुळातच चित्ती समाधान नव्हतं. 
लोभ नामक राक्षसाचा संहार करणारी दिवाळी कोणत्या सुपरमार्केटात मिळते? ओल्या करंज्यांचा सुवास कुठल्या डिस्काऊंट स्कीममध्ये मिळतो? 

खरं तर पैशाची चाह असणं ही चांगली गोष्ट. चार्वाक नव्हता का म्हणाला, की प्रसंगी कर्ज काढा, पण तूप ओरपा. त्या चार्वाकाचं मन:पूर्वक ऐकलं असतं, तर भारतात त्याच काळात रेनसां आला असता; आणि कष्ट, साहस आणि जिद्द, धैर्य, नियोजन कौशल्य या गुणांवर पैसा जरूर मिळवला पाहिजे (आणि हो, तो शहाणपणानं खर्चला पाहिजे.) ही शिकवण आपल्या अंगवळणी पडली असती. 

आपल्याकडे लक्ष्मीपूजनाचा झगमगाट आहे, क्रिएशन ऑफ वेल्थचा संस्कार नाही. संपत्तीचा मूलभूत विचार नाही. म्हणून तर व्हाइट कॉलर क्राइमचा टक्का वाढतोय. अन्‌ बहुतेक धनवानांचे आर्थिक गैरव्यवहार धडाधड रोज बाहेर पडताहेत. बेईमानीच्या पैशाबरोबर बाकीचं लटांबरही येतंच. खंडणी, हिंसा, कौटुंबिक कलह, कोर्टात खटले. 
माझ्यापुरतं सांगतो. माझी दिवाळी आणि मी हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. दिवाळी मी माझ्या पद्धतीनं साजरी करतो. आणि हो, माझ्यासारखे कैक जण असतात ना कुठं कुठं. सुटे सुटे ठिपके आम्ही. आमचाही चाळीस ठिपक्‍यांचा गालिचा तयार होतो. 

आमची दिवाळी बळिराजाची. लक्ष्मीपूजनवाल्यांची दिवाळी त्यांच्यापाशी. दुर्गाबाई भागवत नेहमी म्हणायच्या, की 'आपण आपल्या धोरणानुसार जगावं. इतरांना त्यांचं त्यांचं करू द्यावं.' हा काळ शिकवण्याचा नाही. जगणं जगून दाखवण्याचा आहे. त्यासाठी 'अंतरीचा दिवा' सतत जागा ठेवायचा. 

असो. हॅपी दिवाली. शुभेच्छा लिहून कळवतोय हे किती चांगलं. हल्ली एसएमएस पाठवण्याची पद्धत आहे. माझ्याकडे मोबाईल नाही. म्हणजे शुभेच्छुकांच्या यादीत माझा नंबर नसणार. हुश्‍श. सुटलो...! 

आता 'मैं और मेरी दिवाली... हम अक्‍सर बातें करते हैं...' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com