कुशल मुत्सद्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

डोकलामवरून चीनबरोबर नुकत्याच झालेल्या आणि अजूनही धुमसत असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर गौतम बंबावाले यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

पाकिस्तानमधील उच्चायुक्तपदाची जबाबदारी प्रभावीपणे आणि कुशलतेने हाताळल्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर ही नवी आणि अधिक आव्हानात्मक जबाबदारी आली आहे. बंबावाले हे 1984 च्या तुकडीचे परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. पुण्यातील फर्गसन महाविद्यालय आणि गोखले इन्स्टिट्यूट अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे.

पाकिस्तानबरोबरील संबंध विकोपाला गेलेले असताना उच्चायुक्त म्हणून त्यांच्याकडील जबाबदारी अत्यंत महत्त्वाची होती. काश्‍मीरमधील संघर्ष, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या नित्याच्या घटना अशा परिस्थितीत बंबावाले यांनी पाकिस्तानमधील आपली जबाबदारी पार पाडली. आता चीनसारख्या आक्रमक आणि धूर्त देशाबरोबरील संबंध सुरळीत राहतील हे पाहण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या "वन रोड, वन बेल्ट' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केवळ भारताचाच विरोध आहे. त्याचबरोबर डोकलाममध्ये तडजोड झाल्यावरही चीनकडून तेथे रस्तेबांधणी सुरू झाल्याने हा वाद पुन्हा उद्भवू शकतो. तेव्हा अनुभव आणि मुत्सद्देगिरीचा वापर करून बंबावाले यांना भारताची चीनमधील आघाडी सांभाळावी लागेल.

अत्यंत तणावाच्या परिस्थितीतही शांतपणे सारासार विचार करण्याची आणि देशाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची बंबावाले यांच्याकडे क्षमता आहे. ते पाकिस्तानमधून त्या देशाचा सार्वकालीन मित्र असलेल्या चीनमध्ये आता जात असल्याने पाकिस्तानमधील अनुभव त्यांना उपयुक्त ठरेलच. बंबावाले यांनी चीनमध्ये यापूर्वीही काम केले असल्याने त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव आहे. चीनमध्ये भारतीय दूतावासाचे उपप्रमुख आणि वाणिज्य दूत या पदांवर त्यांनी काम केले आहे. ते चीनविषयक तज्ज्ञ मानले जातात, तसेच चिनी भाषाही त्यांना अवगत आहे. त्यांनी हॉंगकॉंगमध्येही पूर्वी काम केले आहे. 1994 ते 98 या काळात ते बर्लिनमधील भारत सांस्कृतिक केंद्राचे संचालक होते. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. बंबावाले हे 2018 मध्ये निवृत्त होणार असल्याने राजदूत म्हणून त्यांची ही अखेरची जबाबदारी असण्याची शक्‍यता आहे.

Web Title: doklam news india china border dispute gautam bambawale