भाष्य : नवउद्योगांच्या वाढीतील तारतम्य

गेल्या काही महिन्यांत उद्योजकतेच्या विशेषतः नवउद्योग व नवउद्योजक (स्टार्ट अप) आघाडीवर काळजी उत्पन्न होईल आणि या क्षेत्रात भारताची पीछेहाट होईल का काय? अशा अनेक घटना घडत आहेत.
business
businesssakal
Summary

गेल्या काही महिन्यांत उद्योजकतेच्या विशेषतः नवउद्योग व नवउद्योजक (स्टार्ट अप) आघाडीवर काळजी उत्पन्न होईल आणि या क्षेत्रात भारताची पीछेहाट होईल का काय? अशा अनेक  घटना घडत आहेत.

- डॉ. अजित कानिटकर

कोणताही उद्योग स्थिरस्थावर होण्यासाठी विशिष्ट कालावधी देणे, त्याची विश्‍वासार्हता वाढवणे आणि कायद्याच्या चौकटीत पारदर्शक अर्थव्यवहार याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याशिवाय नवउद्योग यशस्वी होणार नाहीत. अलीकडच्या काळातील काही घटना लक्षात घेता नवउद्योजकांनी विशिष्ट बाबींची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

गेल्या काही महिन्यांत उद्योजकतेच्या विशेषतः नवउद्योग व नवउद्योजक (स्टार्ट अप) आघाडीवर काळजी उत्पन्न होईल आणि या क्षेत्रात भारताची पीछेहाट होईल का काय? अशा अनेक  घटना घडत आहेत. त्यामुळे त्या घटनांचा आढावा थोडक्यात घेऊया.  शिक्षण-तंत्र (EdTech)  क्षेत्रात काम करणाऱ्या एका मोठ्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कंपनीची गेल्या चार-पाच वर्षांत प्रचंड वाढ झाली. इतकी वाढ की, सर्वत्र मोठ्या जाहिराती दिसू लागल्या, अनेक छोट्या कंपन्यांना सामावून (का गिळंकृत) घेऊन व्यवसाय वृद्धी झपाट्याने होण्याच्या बातम्या येत होत्या.

भरपूर शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊन अनेक शिक्षकांचीही भरती झाली होती. त्यापुढे जाऊन मोठ्या-मोठ्या क्रीडा स्पर्धात भारतीय संघाचे प्रायोजक म्हणूनही या कंपनीचे नाव चमकत होते. अर्थातच बदलत्या भारताचे हे सुखद आर्थिक चित्र परदेशी भांडवल पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना न भुरळ पडेल तर त्यात नवल नाही. त्यामुळे असे अनेक देवदूत पैसे पुरवठादार  (angel investor) या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी तत्परतेने पुढे आले. मग असे एकदम काय घडले की, या चमको कंपनीवर शासकीय यंत्रणांच्या चौकशींची गदा आली असावी?  इतके दिवस सर्वांना अतिप्रिय वाटणारी ही कंपनी एकदम अविश्वासाच्या आणि आरोपांच्या भोवऱ्यात का अडकली? या उद्योगाची झालेली व सांगण्यात येणारी खरोखरच वाढ होती का सूज अथवा फुगवटा होता?

आर्थिक वर्ष संपून गेल्यावरही  या उद्योगास आपले आर्थिक व्यवहार व ताळेबंद पूर्ण करून सार्वजनिक का करता आले नाहीत? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेस येत आहेत.  आणखी दुसऱ्या मोठ्या नवोद्योजकाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये आपापसात वादावादी, आरोप-प्रत्यारोप आणि अगदी न्यायालयात जाण्याची मजल यासंबंधीची वृत्तं आहेत. 

या उद्योजकांच्या कर्तृत्वाबद्दल दोन-तीन वर्षांपूर्वी सविस्तर यशोगाथा प्रसिद्धीस येत होत्या, त्याचा एक कार्यक्रम भावी नवउद्योजक  भक्तिभावाने पाहत होते.  मग तीनच वर्षांत असे होत्याचे नव्हते का झाले? तिसऱ्या अशाच तंत्रस्नेही कंपनीने, जिची वाढ १०/२०/३०च्या पटीतील गुणाकारने होत होती, अचानक हजार दोन हजार कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ दिल्याचे वृत्त आले. अशी आणखीही काही उदाहरणे आहेत.  एकीकडे भारतामध्ये नवउद्योजकांची प्रचंड भरती असताना, तसे सकारात्मक आणि अनुकूल वातावरण तयार झाले असताना  ही ओहोटीची लाट तर येत नाही ना, याबद्दलची शंका तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पोषक वातावरणाला खीळ नको 

सुमारे पंधरा-वीस वर्षांत भारतभर उद्योजकतेचे, व्यवसाय वृद्धीसाठीचे पोषक वातावरण आहे.  ‘भलता उद्योग करू नकोस’, ‘त्या भानगडीत पडू नकोस’, ‘स्थिर नोकरी पाहा’, ‘अंथरूण पाहून पाय पसर’ या व्यापक नकारात्मक व धोके पत्करण्यास तयार नसणाऱ्या सामाजिक मानसिकतेतून अनेक युवक-युवती आणि मध्यवयातील स्त्री-पुरुष नवकल्पनांचा पाठपुरावा करत स्वतःचा स्वतंत्र उद्योग व्यवसाय व सेवा पुरवण्याची संधी म्हणून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. केवळ महानगरामध्येच नाही तर छोट्या शहरात, खेडेगावातही असे वातावरण तयार होते आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना, बँकांकडून सढळ अर्थपुरवठा, अनेक महाविद्यालयांमध्ये उद्योजकतेचे व अटल टिंकरिंग लॅब यासारखे धडपडशाळेचे आणि नवीन  करण्यास प्रोत्साहन देणारे उपक्रम, वर्तमानपत्र व एकूण साहित्यातही उद्योजक उद्योजकांविषयी येणारी सकारात्मक माहिती या पर्यावरणातील बदलामुळे आपल्या देशात काही हजार नवउद्योजक तयार होत आहेत. ‘नोकरी करणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा’, असा व्यापक संदेश समाजामध्ये पसरत आहे. या सकारात्मक चळवळीच्या बरोबरीने या उद्योगांच्या यशोगाथाही समाजासमोर येत आहेत.  या यशोगाथांमधील महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा!

धीर धरी...!

इतक्या छोट्या काळामध्ये अमुक एका व्यक्तीने एकावर अनेक शून्य या पद्धतीने त्याच्या/तिच्या व्यवसायाची वृद्धी केली हे आकडेही न लपवता अभिमानाने प्रसृत केले जात आहेत.  इंग्रजीतील युनिकॉर्न हा शब्दही आता अनेकांच्या शब्दकोशात आला आहे. स्वेदभांडवल (sweat equity), मूल्यांकन आणि केवळ चित्रपटगृहात लाल अक्षरात पाहिलेला निकास exit, असेही शब्द आजची युवा पिढी आत्मसात करते आहे. हे सर्व विधायक आणि सकारात्मक बदल होत असताना सुरुवातीस उल्लेखलेल्या घटना मात्र या सगळ्या वातावरणाला कलुषित करणाऱ्या आहेत. अशा घटनांपासून काय बोध घेता येईल?

नवउद्योजकतेसाठीचे आणि त्याला प्रोत्साहन देणारे पर्यावरण सकारात्मक राहण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील.  उद्योजकाची  प्रेरणा या विषयावर मी गेले अनेक वर्षे अभ्यास करत आहे. या क्षेत्रातील संशोधनाने हे सतत मांडले आहे की, उद्योजकांसाठी बक्खळ पैसे मिळवणे ही मूळ प्रेरणा  नसून नवनिर्मितीची आस, सिद्धी प्रेरणा, वेगळे काहीतरी करून दाखवीन, श्रेष्ठ गुणवत्ता, प्रश्न सोडवण्याची तळमळ असे अनेक प्रेरणास्रोत आहेत.   ‘पैसा मिळविणे म्हणजे काही पाप करणे आहे. या मूल्यांकडून भरपूर पैसा, कमीत कमी श्रमात आणि ताबडतोब मिळाला पाहिजे’, ही लंबकाच्या दुसऱ्या टोकाकडे जाणारी भूमिका संयमित करावी लागेल.

नवोद्योजकतेला सुगीचे दिवस आले म्हणजे मुळापासून खणून खाण्याची वृत्ती धोकादायक आहे, हे उद्योजकांना पुरवठा करणाऱ्या विशेषतः अर्थसहाय्यकांनी लक्षात ठेवावे लागेल. ‘धीर धरी’ हे कवन या प्रसंगी लक्षात ठेवावे लागेल.  रोपट्याचे मोठे झाड होण्यासाठी काही किमान वर्षे जावी लागतात,  तशी उद्योगाची कल्पना तग धरून त्याची पाळेमुळे खोल जाऊन, त्याला कीर्ती आणि पैसा याची फळे लागण्यासाठीसुद्धा सहा, आठ, दहा वर्षांचा कालखंड लागतो, हे या उद्योजकांनी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे लागेल.  कमी वर्षात कागदावर आणि आता एक्सेल शीटवर ‘क्ष’च्या गुणाकाराचा (x X) हिशोब फक्त कागदावर राहून त्यातून फुगा फुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.  अनेक नवउद्योजकांमध्ये ‘मी या उद्योग परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर काय?’ अशी भीती असते. अशी भीती असणे स्वाभाविक आहे.

ज्या अमेरिकेचे आपण गुणगान करतो, तेथेही शंभरातील नव्वद टक्के नवउद्योजक तोट्यात जातात, प्रसंगी बंदही पडतात. दिवाळीखोरही ठरतात, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. या धडपडीतूनच उरलेले आठ-दहा जण मात्र जगप्रसिद्ध होऊन अब्जावधीची संपत्ती आणि हजारो रोजगार निर्माण करतात.  या उदाहरणातील अपयशाच्या संख्येकडेही लक्ष ठेवून उमद्या मनोवृत्तीने सर्व समाजानेच नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आज  अनेक क्षेत्रात fail fast and learn faster असा गुरुमंत्र आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या सर्व नवोद्योजकांची आर्थिक गणिते स्पष्टपणे समोर आली पाहिजेत. पर्यावरण, सामाजिक योगदान आणि सुशासन हे ‘ईएसजी’ (ESG) औद्योगिक क्षेत्रातील सध्याचा परवलीचा शब्द आहे. 

नवउद्योजकांनाही सुशासनातून सूट नाही.  त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार हे देशातील सर्व कायद्यांच्या मर्यादेत आणि लक्ष्मणरेषेच्या आतमध्येच आहेत, याची त्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्या पर्यावरणातील सर्व घटकांनी काळजी घेतली पाहिजे.  अशी काळजी घेतल्यानेच समाजाचा अशा उद्योगांच्या यशावर आणि कर्तृत्वावर वाढता विश्वास राहील.  ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ हा सुविचार केवळ शाळेच्या फळ्यावर न राहता सर्व समाजासाठीच धडा आहे.

(लेखक सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील धोरण अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com