नियम, कायदे अन्‌ संकेत बदलणारे विज्ञान!

नियम, कायदे अन्‌ संकेत बदलणारे विज्ञान!

आपलं जीवनमान सुख-समृद्ध करावं, अशी अपेक्षा आपण विज्ञानाकडून करतो. पण एखादं तंत्रज्ञान मानवताविरहित किंवा चाली-रीतींना, संस्कृतीला धरून आहे की नाही, हे ठरवणं मुश्‍किलच आहे. विज्ञानाचा पवित्रा नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्यासाठी असतो. संस्कृतीदेखील स्थिर नसते. मानवी मनं मात्र गतकाळात रेंगाळत राहतात. परिणामी जैवतंत्रज्ञानविषयक बरी-वाईट, नैतिक-अनैतिक आणि मुख्यतः नकारात्मक माहिती सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत येऊन पोचते. 

सध्या अनेक वैज्ञानिक विषय आंतरविद्याशाखीय झाल्यामुळे विज्ञान समृद्ध होतंय. जगात वैद्यकशास्त्राचा पाया विस्तारत चाललाय. विशेषतः १९९६ मध्ये प्रो. इयान विल्मुट (युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो) यांनी प्रयोगशाळेत क्‍लोनिंगचे तंत्र वापरून डॉली मेंढीची निर्मिती केली होती. त्यांनी एका मेंढीच्या बीजांडातून केंद्रक काढून टाकले. नंतर त्या पेशीमध्ये दुसऱ्या एका मेंढीच्या पेशीमधील केंद्रक विस्थापित केला. अशा रीतीने ‘फलित’ झालेली पेशी तिसऱ्या मेंढीच्या गर्भाशयात वाढवल्यावर पाच जुलै १९९६ रोजी डॉली जन्मली. प्रयोगशाळेत जननक्षम क्‍लोनिंग करून एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी तयार करता येतो, हे सिद्ध झालं. या तंत्राने मूळपेशींची (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स) निर्मिती करता येते, हेही कळलं. या मूळपेशी नंतर यकृत, हृदय, स्वादुपिंड आदी इंद्रियांकडे जाऊन नेमून दिलेलं कार्य करतात. मूळपेशी मिळवण्याची अजून एक पद्धत आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या नाळेतील या मूळपेशी राखून ठेवता येतात. भावीकाळात पार्किंन्सन आजार, मधुमेह, चेतासंस्थांचे आजार झाल्यास मूळपेशीचे रूपांतर आवश्‍यक त्या पेशीत करून व्याधी दूर करता येते. तथापि, अशा प्रकारच्या अभिनव तंत्रामुळे जनमानसात नीती-अनीतीविषयक बरेच अपसमज पसरले. उदाहरणार्थ, दहशतवादी क्‍लोनिंग करून हिटलर-लादेन यासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या नराधमांची संख्या वाढवतील. तसेच ‘डिझायनर्स बेबी’ घडवता येतील, असं त्यांना वाटलं. पण काहींना वाटतं की एखाद्या गर्भाचे जीवन ‘पूर्वसंचिता’वरच चाललं पाहिजे. त्याचं ‘विधिलिखित’ बदलण्याचा अधिकार आपला नाही. अशा विचारसरणींचे संशोधन करण्यासाठी बायोएथिक्‍स हा नवा विषय पुढे आलाय.      

प्रत्यक्षात संशोधकांना अत्याधुनिक जैवतंत्र वापरून ‘ट्रान्सजेनिक’ (जनुकबदली) प्राण्यांमार्फत कठीण संरचनेची उपयुक्त रसायने, प्रथिने, औषधे बनवायची आहेत. या यशस्वी टप्प्यानंतर थॅलासेमिया, सिकल सेल ॲनिमिया, फायब्रॉसिस अशा अनेक व्याधींवर जनुक उपचार पद्धतीचा मागोवा घेण्यासाठी दिशा मिळाली आहे. काही जोडप्यांना बाळ होण्यात अडचण असते. अशा प्रसंगी परीक्षानळीत स्त्रीबीज आणि पुंबीज यांचा संयोग घडवून बीजांड फलित केलं जातं. याला ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’ म्हणतात. नंतर त्या गर्भाची वाढ गर्भाशयात केली जाते. त्या जोडप्यांना स्वतःच्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ची पद्धत दत्तक घेण्यापेक्षा जास्त पसंत पडली. पण जनमानसावर बालजन्माच्या ‘नॉर्मल’ पद्धतीचा जबरदस्त पगडा आहे. शिवाय या पद्धतीने गरज पडल्यास उपचारासाठी मूळपेशींचीदेखील निर्मिती करता येते. हे सारं रुढीभंग करणारं आणि अनैतिक वाटल्यामुळे त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीला सुरवातीला कडाडून विरोध केला. या प्रकारे जन्मलेल्या बालकांना ‘आत्मा’ असतो की नसतो? विचारवंतांनी याचाही ऊहापोह केलाय! पण हे तंत्र आता अनेक देशांमध्ये कायदेशीर मानलं जातंय. जगात अशा प्रकारे जन्मलेल्या ५० लाखांपेक्षाही जास्त व्यक्ती आहेत. या तंत्राचे प्रवर्तक रॉबर्ट एडवर्डस यांना २०१० मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.                   

हिमोफिलियासारख्या जन्मजात व्याधी संभाव्य बाळाला होणार असतील, तर त्या गर्भावस्थेतच दुरुस्त करून त्याला व्याधीमुक्त करण्याचे प्रयत्न वैद्यकशास्त्र करीत आहे. त्याला जनुक संपादनाच्या (जीन एडिटिंग) वेगाने वाढणाऱ्या तंत्राचा फायदा झालाय. जनुक अभियांत्रिकीचा हा एक आविष्कार आहे. सध्या उंदराच्या त्वचापेशीत बाहेरून काही जनुके कार्यान्वित करून ती ‘रिप्रोग्रॅम’ करण्याचे प्रयोग यशस्वी झालेत. या पेशींना ‘इंड्युस्ड प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स’ म्हणतात. या प्लुरिपोटेंट पेशी कोणत्याही इंद्रियांच्या पेशींचं कार्य करू शकतात. त्या स्त्रीबीज आणि पुंबीजदेखील बनवू शकतात. याला ‘इन व्हिट्रो गॅमेटोजेसेसिस’ म्हणतात. सैद्धांतिकदृष्ट्या भावीकाळात समलिंगी स्त्री किंवा पुरुष स्वतःची अशी संतती निर्माण करू शकतील.       

कोणत्याही पेशींच्या आत असलेला मायटोकाँड्रिया म्हणजे ऊर्जेसाठीचे ‘पॉवर स्टेशन’ असते. तो अतिमहत्त्वाचा घटक फक्त मातेकडूनच तिच्या संभाव्य बाळाला प्राप्त होतो. बाळंत होणाऱ्या मातेकडील मायटोकाँड्रिया सदोष असेल, तर बाळाचे ‘ऊर्जास्थान’ व जीवन धोक्‍यात येऊ शकते. यासाठी दुसऱ्या एखाद्या मातेकडील सक्षम मायटोकाँड्रिया असलेल्या पेशी वापरून नॉर्मल बाळ जन्माला घालता येते. याचा अर्थ एका बाळाला दोन आई आणि एक वडील असू शकतात. अशी जगात किमान दीडशे बालके आता सुखाने नांदत आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा जनतेला मिळालाच पाहिजे, हे लक्षात घेऊन ब्रिटनने तीन पालकांच्या बालकांना कायदेशीर बळ दिलंय. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी उसनं (भाडोत्री) मातृत्व स्वीकारणाऱ्या (सरोगसी) आणि स्वतःचे बीजांडदान करणाऱ्या भारतीय महिलांची संख्या वाढली आहे. भारतात सोयी-सुविधा चांगल्या असल्याने परदेशी दाम्पत्यांनी त्याचा फायदा घेतला. ‘सरोगसी टुरिझम’ची वार्षिक उलाढाल चाळीस कोटी डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे. तथापि, भाडोत्री मातृत्वामुळे मानसिक-सामाजिक-आणि आंतरराष्ट्रीय समस्या वाढत जातील. साहजिकच भारताच्या विधी आयोगाने या समस्यांचा अभ्यास केलाय. त्यातून नजीकच्या काळात नवीन, पण कालानुरूप नियम-कायदे अस्तित्वात येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com