या जगण्यावर. ‘कुछ तो लोग कहेंगे... ’

People
People

माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे, ‘लोक काय म्हणतील’, इच्छा दडपून टाकणं, मन मारणं म्हणजेच समाजाच्या चौकटीत राहून जगणं, असं अजिबात नाही. समाजाचं भान राखताना मनाच्या संगोपनाकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. जीवनाच्या प्रवासात भरपूर वळणं येतात. कधी सुखाची, तर कधी दुःखाची... भरपूर अडथळे येतात... कधी परिस्थितीमुळे, तर कधी आपणच निर्माण केल्यामुळे! ‘लोक काय म्हणतील’, हा असाच एक अडथळा. एखाद्या समारंभाला जाताना, ‘माझेच कपडे जास्त उठून तर दिसणार नाहीत ना, किंवा माझे कपडे अगदीच साधे तर वाटणार नाहीत ना’, इतक्‍या क्षुल्लक बाबतीत देखील समाजाचा विचार करतो. मनाला काय आवडेल, यापेक्षा लोकांना काय आवडेल, याला आपण प्राधान्य देतो.
वृद्ध माता-पित्यांना आपल्याबरोबर एखाद्या कार्यक्रमाला नेताना, त्यांच्यामुळे ‘स्टेटस’ खराब होणार नाही ना, हा विचार नकळत मनाला स्पर्शून जातो. त्यांचा पेहराव ठरवताना, त्यांच्या ‘कम्फर्ट’पेक्षा, लोकांच्या ‘कम्फर्ट झोन’चा अधिक विचार केला जातो. लहानपणी गाढवाची गोष्ट ऐकली होती. एक बाप-लेक गाढव विकण्यासाठी बाजारात चालले होते. वडील गाढवावर बसले होते. मुलगा चालत होता. वाटेत काही लोक म्हणाले, ‘अरेरे, काय निर्दयी बाप आहे! मुलाला चालायला लावून स्वतः आरामात बसलाय’. वडिलांना लाज वाटली. त्यांनी मुलाला गाढवावर बसवले आणि स्वतः पायी चालू लागले. थोडे पुढे जातात न जातात, तोच काही लोक म्हणाले, ‘काय निर्लज्ज मुलगा आहे. बापाला चालायला लावून स्वतः आरामात बसलाय’. लोकांचं ऐकून आता दोघेही गाढवावर बसले. काही अंतर पुढे जाताच लोक म्हणाले, ‘काय माणसं आहेत. बिचाऱ्या गाढवाचा काही विचार आहे की नाही ? मरून जाईल बिचारे ओझ्याने!’ शरमेनं दोघेही खाली उतरले. गाढव ओझ्यानं खूपच थकलं होतं, म्हणून एका काठीला गाढवाचे चारी पाय बांधून आपल्या खांद्यावरून ते त्याला नेऊ लागले. पुढे जाताच काही लोक म्हणाले, ‘काय वेडी माणसं आहेत. असं कुठे गाढव नेतात होय?’
‘कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना....’  लोक दोन्ही बाजूंनी बोलणारच. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. लोकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे आपले निर्णय बदलू नका. सद्‌सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून अंतर्मनाची साद ऐका. निर्णय प्रामाणिक असेल, त्याला निर्भयतेची साथ असेल आणि आत्मविश्वास ठाम असेल, तर आपलं मन आपलं पाऊल योग्य दिशेनेच पुढे नेईल. ‘लोक काय म्हणतील’ या प्रश्नातून आपल्या पौराणिक कथा देखील सुटल्या नाहीत.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन
आपल्या निर्णयावर आपलं मनच स्वार असलं पाहिजे. मला एकच मूल हवं आहे, कारण करिअर सांभाळून एकाच मुलाचं संगोपन मी व्यवस्थित करू शकतो... मी पत्नीला घरकामात मदत करतो, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे... म्हणा खुशाल मला आईवेडा, पण मी तिला आदर्श मानतो... तिच्या निर्णयांचं अनुकरण करण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही... मी ‘कोरोना’ची लस घेतली, कारण तिच्या उपयुक्ततेबद्दल माझ्या मनाने कौल दिला... माझ्या प्रत्येक कृतीला माझ्या मनाचा पाठिंबा आहे आणि माझ्या प्रत्येक कृतीचं समर्थन करण्यासाठी मी बांधील देखील नाही.
 तुमचं व्यक्तिमत्त्व असं विकसित झालं पाहिजे की आजूबाजूच्या लोकांनी तुमचं अनुकरण करायला हवं. आपण करू ती फॅशन, आपण पाडू तो पायंडा, असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला पाहिजे. ‘लोक काय म्हणतील’ या प्रश्नातून आपली सुटका होईल, तो क्षण परमानंदाचा! आयुष्य खूप सुंदर आहे. सोनेरी क्षणांनी ते सजलं आहे. लोकलज्जेच्या काटेरी कुंपणाने त्याला आवळू नका. मनाला मोकळीक द्या. त्याच्या हाकेला प्रतिसाद द्या आणि मग जीवन कसं मोरपिसाप्रमाणं हलकं होतं, ते पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com