प्रार्थनेचं बळ

डॉ. अरुण मांडे
शुक्रवार, 24 मार्च 2017

मी  ‘मिरॅकल’ नावाची एकांकिका लिहीत होतो. या एकांकिकेमधली तरुणी अपघातामुळं अंध होते. ती ख्रिस्ती असते. तिचा प्रभू येशूंवर प्रचंड विश्‍वास असतो. ती वडिलांना गोव्याला घेऊन जाते. तिथं चर्चमधील धर्मगुरुला, ‘मला दृष्टी येण्यासाठी प्रार्थना करा,’ अशी विनंती करते. धर्मगुरू तिच्यासाठी प्रार्थना करतात. इथं मी अडलो. एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी येशूंपाशी प्रार्थना कशी करतात, हे मला माहीत नव्हतं. माझी एक पेशंट ख्रिस्ती आहे.

मी  ‘मिरॅकल’ नावाची एकांकिका लिहीत होतो. या एकांकिकेमधली तरुणी अपघातामुळं अंध होते. ती ख्रिस्ती असते. तिचा प्रभू येशूंवर प्रचंड विश्‍वास असतो. ती वडिलांना गोव्याला घेऊन जाते. तिथं चर्चमधील धर्मगुरुला, ‘मला दृष्टी येण्यासाठी प्रार्थना करा,’ अशी विनंती करते. धर्मगुरू तिच्यासाठी प्रार्थना करतात. इथं मी अडलो. एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी येशूंपाशी प्रार्थना कशी करतात, हे मला माहीत नव्हतं. माझी एक पेशंट ख्रिस्ती आहे. मी तिला फोन करून बोलावलं आणि सांगितलं, ‘मी एकांकिका लिहितोय, त्यासाठी प्रार्थना कशी करतात ते मला सांग.’ ती म्हणाली, ‘असं सांगण्यापेक्षा मी तुमच्या एकांकिकेसाठीच प्रार्थना करते.’ मला गंमत वाटली. मी म्हणालो, ‘कर.’ तिनं माझ्या दवाखान्यातच गुडघे टेकून प्रार्थना केली. ती मी जशीच्या तशी लिहून काढली आणि एकांकिकेत वापरली.

आणखी एक अडचण होती. या एकांकिकेत धर्मगुरू प्रार्थना करतो आणि चमत्कार घडतो. त्या अंध तरुणीची दृष्टी येते. आपल्यासमोर असा काही चमत्कार घडेल, असं त्या धर्मगुरूला वाटलं नव्हतं. त्यामुळे त्याला इतका धक्का बसतो, की त्याच्या मुखातून बायबलमधली वचनं आपोआप बाहेर पडतात. त्या धर्मगुरूच्या तोंडी आंधळेपण आणि दृष्टी यांचे संदर्भ असलेली बायबलमधली वचनं वापरायची होती. ती कोणती हे मला माहीत नव्हतं. ही अडचणसुद्धा माझ्या पेशंटनं सोडवली. तिनं एक बायबल आणून दिलं. ती म्हणाली, ‘यात तुम्हाला वचनं सापडतील.’ ते पाचशे पानांचं बायबल बघून मी म्हणालो, ‘अशी वचनं शोधायची म्हणजे सगळं बायबल वाचावं लागेल. तेवढा वेळ माझ्यापाशी नाही. मला एकांकिका लवकरात लवकर लिहायचीय. कारण ती स्पर्धेत सादर करायचीय आणि स्पर्धेची तारीख जवळ आलीय.’

ती म्हणाली, ‘काळजी करू नका. बायबलमधलं कोणतंही पान उघडा. तुम्हाला हवं असलेलं वचन सापडेल.’ तिच्या बोलण्यावर माझा विश्‍वास बसला नाही हे तिला दिसत होतं; ती म्हणाली, ‘माझ्यावर विश्‍वास ठेवा. करून तर बघा.’

ती गेल्यानंतर बायबल हातात घेतलं आणि अंदाजानं उघडलं. तुमचा कदाचित विश्‍वास बसणार नाही, आजही ते कसं घडलं सांगता येणार नाही, त्या उघडलेल्या पानावर एकांकिकेसाठी हवं असलेलं वचन दिसलं. ते मी लिहून काढलं. हा केवळ योगायोग आहे, असं मानून मी पुन्हा बायबल उघडलं, तर खरोखर आणखी एक वचन सापडलं; मग आणखी एक. आणखी एक. मी अशी दहा वचनं लिहून काढली आणि त्यातली निवडक एकांकिकेत वापरली. त्या एकांकिकेमधल्या अंध मुलीला दृष्टी येते याचा आधार घेऊन मी विज्ञान आणि धर्म यांचा सनातन संघर्ष त्यात रंगवला होता. या एकांकिकेचे खूप प्रयोग झाले. ती खूप गाजली; मग ती आम्ही ‘नाट्यदर्पण’च्या स्पर्धेत सादर केली. मला लेखनासाठी ‘नाट्यदर्पण’चा पुरस्कार मिळाला. त्या पेशंटनं एकांकिकेसाठी केलेली प्रार्थना परमेश्‍वरानं ऐकली होती. प्रार्थनेमध्ये किती बळ असतं याची मला प्रचिती आली.

Web Title: Dr arun mande article