
रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धाने अनेक समीकरणांना, त्यातून उभ्या राहिलेल्या प्रतिमांना छेद दिला आहे.
भाष्य : प्रतिमांची उलथापालथ करणारे युद्ध
रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धाने अनेक समीकरणांना, त्यातून उभ्या राहिलेल्या प्रतिमांना छेद दिला आहे. रशिया-जर्मनी मैत्री संपुष्टात आली आहे. शीतयुद्धात अमेरिकेची प्रतिमा खलनायक अशी बनवण्यात रशियाला बव्हंशी यश मिळाले होते. आता मात्र रशिया-चीनची ती ओळख बनू पाहात आहे.
सन २०२२च्या २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या संघर्षाचा लेखाजोखा घेतला तर चार महत्त्वाचे निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष असा की या संघर्षात रशियाला अपेक्षित यश मिळाले नाही. सन १९२२मध्ये सोव्हिएत संघ जन्माला आला, तो सन १९९१मध्ये उद्ध्वस्त झाला व पंधरा सार्वभौम राष्ट्रे तिथे निर्माण झाली. या राष्ट्रांपैकी रशिया हे राष्ट्र सोव्हिएत संघाचा वारसदार म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत विराजमान झाले. सन २०००च्या आसपास रशियाचे नेतृत्व व्लादिमिर पुतीन यांच्याकडे आले. पुतीन महाशयांनी सत्तेवर मांड ठोकल्यानंतर रशियात कायदा व सुव्यवस्था या क्षेत्रांकडे लक्ष दिले आणि रशियानामक राष्ट्राची घडी बसवली. परराष्ट्र धोरणातही कौतुकास्पद मुसंडी मारुन तिथेही रशियाची अजेय-अजिंक्य अशी प्रतिमा प्रस्थापित केली; पण गेल्या वर्षभरात या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दुसरे म्हणजे रशियाहून क्षेत्रफळ, लोकसंख्या व प्रतिमा अशा बाबींचा विचार करता छोट्या असलेल्या युक्रेन या राष्ट्राने मात्र रशियासमोर उभे राहाण्यात चांगलाच चिवटपणा दाखवला. रशियाचे नुकसान करण्याचा विक्रम केला व आज तर ‘रशियाने आमच्याकडून हिसकावून घेतलेला भूप्रदेशही आम्ही परत मिळवू’ अशा आशयाचा आत्मविश्वास युक्रेनचे नेतृत्व दर्शवित आहे. तात्पर्य युक्रेनची जिद्द विस्मयकारक ठरली आहे. तिसरे म्हणजे रशियाच्या निर्मितीपासून, म्हणजे सन १९९१पासून जर्मनी हा देश रशियाचा जिवश्चकंठश्च मित्र होता. गेल्या वर्षात या मैत्रीचे विसर्जन झाले आहे. जर्मनीने रशियाच्या विरोधात फळी उभी करुन युक्रेनची पाठराखण करण्याचा निर्धार व्यक्तविला आहे.
सोव्हिएत संघराज्य अस्तित्वात होते तोपर्यंत अमेरिकेशी शीतयुद्ध खेळण्यातच सर्व वर्षे खर्ची पडली. तेव्हा अमेरिका म्हणजे खलनायक आहे तर ‘आमचे सोव्हिएत युनियन जगाचा नायक आहे’, अशा आशयाचा प्रचार करण्यात सोव्हिएत नेतृत्व मग्न होते. जगातल्या कित्येक जणांना हा प्रचार भुरळ घालत होता. गेल्या वर्षभरात मात्र सोव्हिएत संघराज्याचा वारसदार रशिया जगात ‘खलनायक’ ठरला आहे. तर खलनायकाला पराभूत करण्यासाठी अमेरिका हा देश पुढे आला आहे, हा चौथा मुद्दा. सारांश एका वर्षात ऐतिहासिक व उल्लेखनीय उलथापालथ जगाने अनुभवली. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया मार्गक्रमण करु लागला आणि वर म्हटल्याप्रमाणे, रशियाने अंतर्गत अराजक मोडून काढले, दहशतवादी हल्लेखोरांची दादागिरी संपुष्टात आणली आणि भूतपूर्व सोव्हिएत भूमंडलात मॉस्कोच्या अधिकारासमोर इतर राष्ट्रे हतबल ठरावीत, या हेतूने धोरणे आखली.
सन २००८मध्ये जॉर्जिया या राष्ट्रावर कुरघोडी करण्यात, जॉर्जियाला पराभूत करण्यातही रशियाने यश मिळवले. त्यानंतरचा चमत्कार म्हणजे दूरवरच्या भूमध्य समुद्रात पाय सोडून बसलेल्या सीरियानामक देशातही अमेरिकादी राष्ट्रांवर कुरघोडी करण्यात व तिथल्या बशर् अल् असद नांवाच्या कर्णधारला स्थैर्य मिळवून देण्यात पुतीन यांचा रशिया सफल झाला. पण याच रशियाला युक्रेनवर मात्र निर्णायक विजय मिळविण्यात अपयश लाभले आहे. उलटपक्षी, अशा अपयशाला थेट लेनिनपासून गोर्बाचेव्हपर्यंत जेवढे सोव्हिएत कप्तान मॉस्कोला लाभले त्यांच्या चुका जबाबदार आहेत, असा कांगावा पुतीन करीत आहेत. त्यांच्या मतानुसार युक्रेनचा सर्वसामान्य माणूस वंश, पंथ या कसोट्यांमुळे रशियाशीच संलग्न आहे, पण तिथल्या नेतृत्वाला मात्र अमेरिका व पश्चिम युरोपविषयी ममत्व वाटत आहे व या बाह्य शक्तींमुळे रशिया हतबल ठरला आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे.
युक्रेनमधला सर्वसामान्य नागरिक रशियाच्या वर्चस्वाच्या विरोधात उभा ठाकला आहे. त्याला जाणवत आहे की पुतीनसाहेबास झारकालीन रशियाच्या अवघ्या युरोपात साम्राज्य निर्माण करण्याच्या वेडाने झपाटले आहे व ''हे वेड आम्ही गाडणार'' हा वज्रनिश्चय त्यांनी केला आहे. २०१४ मध्ये रशियाने युक्रेनकडून क्रिमिया प्रांत हिसकावून घेतला. गेल्या वर्षात युक्रेनचे आणखी भूभाग पुतीनच्या सैन्याने रशियन टांचेखाली आणले. हजारो युक्रेनियन नागरिकांवर बेघर होण्याची पाळी आणली, शेंकडो युक्रेनियनांना रशियन सेनेने ठार केले; पण तरीही युक्रेनचा नागरिक हार मानण्यास तयार नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस स्टॅलिनने चर्चिल व रूझवेल्ट या नेत्यांवर कुरघोडी केली आणि क्रिमियावर ताबा मिळविला. वर्तमानात पुतीन अवघ्या युक्रेनवर ताबा मिळविण्यासाठी आसुसले आहेत. “आम्ही पुतीनचा हा डाव उधळून लावण्यास सज्ज झालो आहोत'' असे युक्रेनियन म्हणत आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तर दहासूत्री घोषणापत्र प्रसृत केले आहे. ‘रशियाने २०१४मधे जो क्रिमिया आपल्या वर्चस्वाखाली आणला, तोही कीव्हच्या ताब्यात द्या" यावर त्यात भर आहे. झेलेन्स्कींच्या नेतृत्वाखाली साहस करण्यास सिद्ध झालेल्या युक्रेनला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या १४१ सदस्यराष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे. युक्रेनच्या जिद्दीला जगाने कुर्निसात केलेला दिसतो. आज रशियाबरोबर केवळ चीन उभा आहे, तर युक्रेनला १४१ राष्ट्रांनी सहकार्य देऊ केलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९९१पर्यंत पूर्व युरोपीय राष्ट्रे मॉस्कोसमोर शरणागत होती तर वर्तमानात ही पूर्व युरोपीय राष्ट्रे मॉस्कोची मिजास जिरविण्यास कटिबद्ध झाली आहेत आणि म्हणूनच युक्रेनने रशियन साम्राज्यवाद गाडून टाकावा, या उद्दिष्टाने झपाटलेली आहेत.
जर्मनीने युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य केले आहे. मॉस्कोत जेव्हा गोर्बाचेव्ह यांची कारकीर्द सुरु होती. तेव्हाच जर्मन राष्ट्राला दुभंगणारी बर्लिनची भिंत उद्ध्वस्त करण्यात आली. परिणामतः जर्मनी अभंग झाला. मग जर्मनीनेही तद्नंतर अवतरलेल्या रशियाशी जिवलग दोस्ती केली. जर्मनीचे भारतातले विद्यमान राजदूत वॉल्टर लिन्ड्नेर यांनी मुलाखतीत व्यक्तविलेले विचार पुतीनबाबतच्या जर्मन संतापाला वाचा फोडणारे आहेत. वानगीदाखल ही उदाहरणे पाहा : १) पुतीन साम्राज्यशहा आहेत २) त्यांना खोटारडेपणा प्रिय आहे. २४ फेब्रुवारी २०२२ च्या पूर्वीपासूनच रशियाने यूक्रेनच्या सरहद्दीवर पन्नास हजार सैनिकांची पाठवणी केली, पण "ती पाठवणी म्हणजे नेहमीच्या कवायतीसाठी केलेली जमवाजमव आहे" असे पुतीन म्हणाले होते, प्रत्यक्षात याच सैनिकांनी युक्रेनची राखरांगोळी करण्यासाठी भीषण हल्ले चढविले. ३) पुतीन यांच्या नेतृत्वाखालचा रशिया युरोपातल्या राष्ट्रांना भयभीत करीत आहे. जर्मनीने फ्रान्स, नेदरलॅन्ड, पोलंड इत्यादी देशांनाही युक्रेनच्या सहाय्यासाठी प्रेरित केले आहे व बेघर झालेल्या युक्रेनियन नागरिकांना मुक्त प्रवेश दिला आहे. एव्हढेच नव्हे तर रशियाकडून विपुल खनिज तेल मिळावे, या उद्देशाने समुद्राखालून एक पाईपलाईन बांधावी ही योजना गुंडाळून ठेवली आहे. आतापर्यंत स्वीडन, फिनलँड ही राष्ट्रे ‘नाटो’गटापासून दूर राहाण्यात खुषी मानत होते. गेल्या वर्षभरात मात्र या राष्ट्रांनी या लष्करी गटात सदस्य म्हणून सहभागी होण्याचे ठरविले आहे. जर्मनीने यासंदर्भात कळीची भूमिका बजावली आहे.
गेल्या वर्षी रशियन भूमिकेचे समर्थन करण्यासाठी केवळ चीनने पुढाकार घेतला. चीनची वर्तमानकाळातली प्रतिमा ‘आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्वत:चा निरंकुश प्रभाव वाढविणारा देश’ या आशयाची झाली आहे. म्हणजे रशिया व चीन एकाच गोत्राचे सभासद आहेत, असे सार्वमत जगात रुजले आहे. या पृष्ठभूमीवर अमेरिका मात्र रशिया आणि चीन या दोन्ही देशांमुळे भयग्रस्त झालेल्या देशांचा तारणहार देश ठरला आहे. भयग्रस्त देशांनी साम्राज्यवादी सत्तांसमोर दंड थोपटून उभे राहावे, अशा उद्दिष्टांच्या पूर्तीकरितां अमेरिका कटिबद्ध आहे. १९९१मध्ये सोव्हिएत युनियनच्या नव्या अवताराने मार्क्सवादास सोडचिठ्ठी दिली. साहजिकच मार्क्सवादी परिभाषेचा वापर संपुष्टात आला आणि झारच्या कालखंडाला जागविण्याची खटपट सुरु झाली. परिणामतः वर्तमानकाळात रशिया व चीन खलनायक म्हणून जगाला ज्ञात झाले आहेत आणि अमेरिका जगाला आवश्यक दिलासा देण्यासाठी पुढे आल्याचे चित्र निर्माण होत आहे. युक्रेनच्या प्रश्नामुळे वर्षभरात केवढी उलथापालथ झाली आहे!
(लेखक रशियाचे अभ्यासक व ज्येष्ठ प्राध्यापक आहेत.)