संवेदनांतून जुळले उजेडाशी नाते

dr bharat vatwani
dr bharat vatwani

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भारत वाटवानी यांच्या व्याख्यानाचे गुरुवारी (ता. २०) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपल्या कार्यामागची प्रेरणा कथन करणारा विशेष लेख.

प्र ख्यात मनोविश्‍लेषक आणि तत्त्वज्ञ कार्ल जंग यांचा मी निष्ठावंत अनुयायी. जंग यांचे अनेक सिद्धांत आदरणीय असून, त्यांचा एकवाक्‍यतेचा (सिंक्रोनायझेशन) सिद्धांतही त्यापैकीच एक. विश्‍वात कारणाशिवाय काहीच घडत नाही, असे हा सिद्धांत सांगतो. रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारणे हेही याच सिद्धांताचे उदाहरण असल्याचे मी मानतो. लाखो कुष्ठरुग्णांच्या दु:खी जीवनात खऱ्या अर्थाने आनंदवन फुलविणारे बाबा आमटे यांच्याशी माझी भेट २००४ मध्ये असामान्य परिस्थितीत झाली. त्यापूर्वीची तीन वर्षे वाढदिवशी मी शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत होतो. मात्र त्या वर्षी मी बाबा आमटे यांची भेट घेण्याचे ठरविले. कार्ल जंगचा एकवाक्‍यतेचा सिद्धांत त्या वेळीही अनुभवला. मी आणि माझ्या सहकाऱ्याने ‘आनंदवन’ला जाण्यासाठी रेल्वे तिकिटाचे आरक्षण केले होते. मात्र माझ्या मुलांच्या गणिताच्या शिक्षिका रश्‍मी सुर्वे यांना आमच्या दौऱ्याचा सुगावा लागला. त्यांनी आमच्याबरोबर ‘आनंदवन’ला येण्याचे जाहीर केले. त्यामुळे मी मोटारीने जाण्याचे ठरविले. सुर्वे यांच्यामुळेच हे ‘गणित’ जमले. आम्ही बाबांच्या ‘आनंदवन’ या कुष्ठरुग्णांसाठीच्या भव्य पुनर्वसन केंद्रात पोचलो. मुंबई ते नागपूर हे तब्बल एक हजार किलोमीटरचे अंतर. ‘आनंदवन’ नागपूरच्या जवळच. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांसाठी बाबांनी उभारलेल्या ‘आनंदवना’ची संपूर्ण रचना आणि भव्यता पाहून आम्ही अचंबित झालो. दुर्दैवाने, त्या वेळी बाबा तेथे नव्हते. मात्र आमच्याकडे मोटार होती. त्याबद्दल सुर्वे मॅडमचे आभारच मानायला हवेत. त्यांच्यामुळेच आमच्या या दौऱ्याला वेगळे वळण मिळाले.

बाबा तेव्हा हेमलकसामध्ये होते. त्यामुळे, आम्ही तेथून ३५० किलोमीटर अंतरावरील हेमलकसाला जाण्याचे ठरविले. हेमलकसाच्या साधारण १०० किलोमीटर अलीकडे आम्हाला रस्त्याच्या कडेला हाता-पायांत बेड्या ठोकलेला मनोरुग्ण दिसला. हिंसक वृत्तीमुळे स्किझोफ्रेनियाच्या या रुग्णाच्या हाता-पायांत बेड्या ठोकलेल्या होत्या. माझ्या सहकाऱ्याने त्याला सोबत येण्याविषयी विचारणा केली. त्याने नकार दिला. त्याला आमच्यासोबत घ्यावे की नाही, या द्विधा मनःस्थितीत मी १५ ते २० किलोमीटर गेलो. मात्र अखेर माझ्या सदसद्विवेकबुद्धीनेच हा तिढा सोडवला. अंतरात्म्याचा आवाज ऐकत मी परत फिरलो. तो मनोरुग्ण घाणेरडा दिसत होता. आम्ही त्याच्या शरीराभोवती चादर गुंडाळली व त्याला मोटारीत बसवले. तोपर्यंत बाबा किंवा प्रकाश आमटेंबरोबर आमची भेटही झाली नव्हती. अशा परिस्थितीत त्यांची प्रतिक्रिया काय असेल, या विचाराने मी थोडासा निराश झालो. हेमलकसाला पोचल्यावर मी त्यांना आमच्या कार्याची कल्पना दिली. त्याचप्रमाणे, हेमलकसाच्या वाटेवर विचित्र परिस्थितीत सापडलेल्या या निराधार मनोरुग्णाबद्दलही सांगितले. मी प्रकाश आमटेंना मनोरुग्णाच्या हाता-पायांतील बेड्या काढण्याची विनंती केली. त्यानंतर, ‘ओपीडी’मध्ये अनेक रुग्ण तपासून थकलेल्या प्रकाश यांनी अत्यंत विनम्रतेने छिन्नी आणि हातोडा घेऊन हळूवारपणे बेड्या काढून त्याची मुक्तता केली. त्यांना बेडी तोडण्यास दोन तास लागले. पहिल्यांदाच भेटत असलेल्या या मानवतादूताच्या महानतेपुढे मी नतमस्तक झालो. शेजारच्याच पलंगावर पहुडलेले बाबा शांतपणे या मुक्तीच्या संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करत होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो. पाहिले तर बाबा अश्रू ढाळत होते. एखादी व्यक्ती हाता-पायांत बेड्या ठोकल्यावर चालू कशी शकते, या विचाराने आपण रात्रभर झोपलो नसल्याचे त्यांनी सांगितले. बाबांनी तुटलेल्या बेड्या पायांत घालून चालण्याचाही प्रयत्न केला होता. असह्य वेदनांनी चालणे शक्‍य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाबांची संवेदनशीलता इतक्‍या पराकोटीची होती. त्यामुळेच मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. माझ्या कार्याबद्दल समजल्यावर बाबाही माझ्याकडे खेचले गेले. आमच्यातील नाते भावनिकरीत्या अतिशय दृढ होते. एकीकडे माझ्या कामाचे कौतुक करतानाच दुसरीकडे आणखी काम करण्यासाठी ते अधिकाराने रागवायचे. त्यानंतर मलाही अल्पसंतुष्ट न राहता अधिकाधिक काम करण्याची जाणीव व्हायची. आपण मानसिक आजारांना जवळून पाहिल्याचे बाबा सांगायचे. मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे अधुरे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. मी माझ्या सर्व विश्‍वस्तांशी चर्चा केली. माझ्यातील प्रचंड प्रेरणास्रोत पाहून त्यांनी मनोरुग्णांसाठीच्या कार्याचे विस्तारपूर्वक नियोजन करण्याचे ठरविले. त्यातूनच कर्जतला जमिनीची खरेदी करून प्रकल्प उभा केला. या काळात मी बाबा आमटेंच्या संपर्कात असायचो. प्रकल्पाच्या कामावरून ते अनेकदा रागवायचेही. त्यांनी स्वतःवर निवृत्ती लादून घेतली असली, तरी आमच्या प्रकल्पाच्या उद्‌घाटनाला येण्याच्या कल्पनेने ते आनंदी व्हायचे. दुर्दैवाने प्रकृती ढासळल्याने त्यांना त्या कार्यक्रमाला येता आले नाही. त्याऐवजी त्यांनी प्रकाश आमटेंना पाठविले.

माझ्यासाठी प्रकल्पाची सुरवात आणि तो स्वावलंबी करण्याचा काही वर्षांचा काळ आयुष्यातील सर्वांत कठीण होता. खरे तर, माझ्यासारख्या शहरी व्यक्तीला मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर कर्जतसारख्या दुर्गम भागात मनोरुग्णांसाठी असा प्रकल्प उभा करणे अवघड होते. प्रकल्प उभारणीतील प्रस्तावित अडथळ्यांमुळे मी ओक्‍साबोक्‍शी रडायचो. दर दोन-तीन महिन्यांनी बाबांना भेटण्यासाठी ‘आनंदवना’त धाव घ्यायचो. या भेटीत मी बाबांकडून प्रेरणा व नवसंजीवनी घेऊन परतायचो. प्रकल्प उभारणीच्या या निराश करणाऱ्या, अंधारलेल्या वाटेवर एकमेव मार्गदर्शक प्रकाश होता, तो म्हणजे बाबा आमटे. बाबांचा पुढे जात राहण्याचा मंत्र आता आमचाही मंत्र बनला होता. दर पंधरा दिवसांनी प्रकल्पाच्या प्रगतीविषयी त्यांचा फोन येत असे. त्यातून त्यांच्यातील संवेदनशीलता, नम्रता आणि काळजीचेच दर्शन घडे.आभाळाएवढी उंची गाठलेल्या बाबांचा सहवास आणि नम्र आणि हृदयस्पर्शी देहबोली मला आयुष्यात इतर कोणाकडूनही लाभली नाही. मी ऐन तारुण्यात वडिलांना गमावले. या तीव्र धक्‍क्‍यातून मला नैराश्‍य आले आणि मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. मी भेटलेल्या सर्व ज्येष्ठांमध्ये वडिलांना शोधत होतो. बाबा आमटे भेटले आणि हा शोध संपला. समाजातील तळागाळातील लोकांबद्दलच्या अतीव दयेमुळे बाबा इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कित्येक वर्षांनंतरही कुष्ठरुग्णांची दयनीय अवस्था वर्णन करताना त्यांना रडू फुटत असे. ‘आनंदवना’च्या एका भेटीदरम्यान माझ्या पत्नीने मी दीर्घकाळापासून नैराश्‍यात असल्याचे बाबांना सांगितले. चेहऱ्यावर मार्मिक हास्यरेषा उमटवत बाबांनी मी कधीच निराश नसल्याचे नमूद केले. याउलट, आपला हा शिष्य अस्वस्थ असून, अंतर्शोध संपेपर्यंत ही अस्वस्थता त्याच्यासाठी चांगलीच असल्याचा दिलासा त्यांनी पत्नीला दिला. बाबांबरोबरच्या सततच्या भेटीगाठींमुळे माझ्या नैराश्‍याला उतार पडला. त्यानंतर मी इतस्ततः भटकणाऱ्या मानसिक रुग्णांच्या वेदनांशी समरस झालो. इतरांच्या वेदनांची जाणीव, हा बाबा आणि माझ्यातील समान दुवा ठरला.

‘आनंदवना’त श्रद्धावन (आमच्या स्वयंसेवी संस्थेचे नाव ‘श्रद्धा’ आहे.) येथे बाबा आणि साधनाताईंची समाधी आहे. आज बाबा या जगात नाहीत. गेल्या चौदा वर्षांच्या काळातील आमच्या कार्याने मनोरुग्णांच्या अवस्थेत कितपत फरक पडला, हे मला ठाऊक नाही. मात्र आमचा प्रयत्न निश्‍चितच प्रामाणिक होता. हाच प्रामाणिकपणा आणि निष्ठापूर्वक केलेले प्रयत्न आम्ही बाबांना अर्पण करतो.  बाबांच्या अंत्यसंस्कारावेळी कुष्ठरुग्ण, अंध, दिव्यांग, कर्णबधिर धाय मोकलून रडत होते. मीही त्यांच्यातील एक होतो. खरे तर, काही रक्ताबाहेरची नाती आयुष्याला अर्थ देतात. बाबा माझे खरे वडील नव्हते, तरीही आमचे नाते त्यापलीकडचे होते. आमचे अस्तित्वही त्यासाठीच होते.

लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेली एकवाक्‍यता म्हणजे तरी नेमके काय? मी गेल्या काही वर्षांतील रॅमन मॅगसेसे पुरस्कारार्थींची यादी पाहिली. बाबा आमटेंचे गुरू विनोबा भावे यांना १९५८मध्ये हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर, बाबांना १९८५मध्ये हा पुरस्कार प्रदान झाला. काही वर्षांनी थोर पित्याचा वारसा समर्थपणे चालविणारे प्रकाश आमटे यांचाही या पुरस्काराने गौरव झाला. त्यानंतर माझ्या रूपाने बाबांचा हा दत्तक मुलगाही पुरस्कारार्थी ठरला. मानवी आयुष्य हे अशा प्रकारे एकमेकांशी जोडले जायला हवेच. मॅगसेसे यांचे आमच्यापैकी कुणाशीच रक्ताचे नाते नव्हते. तरीही त्यांनी आम्हा सर्वांनाच एखाद्या माळेप्रमाणे एकत्र गुंफले. ‘विश्‍वात कारणाशिवाय काहीच घडत नाही. आपल्या आयुष्यातील सर्वच प्रसंग, घटना एकमेकांशी जोडलेल्या, पूर्वनियोजित असतातच,’ हा कार्ल जंगचा सिद्धांत या उदाहरणातूनच सिद्ध होतो.
अनुवाद : मयूर जितकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com