बाबासाहेबांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी

dr babasaheb ambedkar
dr babasaheb ambedkar

अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला.

‘इं ग्रजीपेक्षा मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण थोडे आहे हे खरे; तथापि ज्या बहिष्कृत वर्गात ते जन्मले त्या वर्गाच्या कैफियती मांडताना सर्वसामान्य साक्षर व्यक्तीलादेखील समजेल, अशी सुबोध भाषा त्यांनी वापरली आहे. जाडे पंडिती व लठ्ठ अवघड शब्द त्यात फारच थोडे आढळतात. पंडित असूनही विद्वत्तेचा अहंकार त्यांच्या भाषेत नाही. हिंदुधर्माला यापुढे तरी जगायचे असल्यास डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील हे मत बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकणारे आहे. ‘मराठी भाषेसंबंधी बोलताना जे फक्त साहित्याच्याच क्षेत्रात असतात, त्यांच्याच शैलीचा उल्लेख होतो. पण सरल प्रासादिक आणि सूत काढल्यासारख्या सुबोध मराठी भाषेत लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठी शैलीचे कौतुक झालेले आढळत नाही’’, अशी व्यथा पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात व्यक्त केली होती. त्यांचेही निरीक्षण महत्त्वाचे आहे.

बाबासाहेबांची चळवळींमागची भूमिका, पोटतिडीक, त्यांचे धगधगीत विचार या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. त्याची काही उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. बाबासाहेबांना हिंदुधर्म आपला आहे, की नाही या प्रश्‍नाचा कायम निकाल हवा होता. ‘जोपर्यंत आम्ही स्वतःला हिंदू म्हणवितो आणि तुम्ही आम्हाला हिंदू समजता तोपर्यंत देवळात जाण्याचा आमचा हक्क आहे. आम्हास एकजात निराळी देवळे नकोत’. नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी दगडमाराची, लाठ्यांची धुमश्‍चक्री उडाली, तेव्हा हा सत्याग्रह सोडून येवले मुक्कामी त्यांना धर्मांतराची घोषणा करावी लागली. त्यावर बाबासाहेब चवताळून लिहितात, ‘काही सवर्ण हिंदुंनी हिंदू समाजाच्या पोटातील वडवानळात बुद्ध खाक केला. महावीर खाक झाला. बसव खाक झाला. रामानंद खाक झाला. महानुभावांचा चक्रधर खाक झाला. नानक व कबीरांची तीच वाट लागली. राममोहन, दयानंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जोतिबा फुले, रानडे, भांडारकर, श्रद्धानंद यांचीही तीच वाट लागली.’ ते लिहितात, ‘माझी जनता अमोल मानव जातीस प्राप्त असलेले, समान हक्क मागत आहे. माणुसकीच्या व्यापक वृत्तींचा निष्पाप नागरिक होण्याचे माझे ध्येय आहे.’ बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांची संपूर्ण जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यावर वाहिली. एक पट्टीचे साक्षेपी संपादक म्हणून लौकिक मिळविला. मराठी अक्षरवाङ्‌मयाला आपल्या वृत्तपत्रीय वैचारिक लिखाणाची देणगी दिली. परंतु, एक सिद्धहस्त समर्थ पत्रकार म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. तरीपण त्यांनी आपल्या धारदार, सडेतोड व विद्वत्तापूर्ण, प्रतिभायुक्त लेखनाने समाजप्रबोधनाबरोबरच दलितांची अस्मिता व स्वाभिमानाची मशाल सतत तेजाळतच ठेवली. राजर्षी शाहू महाराजांच्या औदार्याने त्यांनी ‘मूकनायक’ सुरू केले.

दलित समाजास वृत्तपत्राची किती निकड आहे ते समजावून सांगत बाबासाहेब लिहितात, ‘आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. मुंबई इलाख्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. त्यातून अहितकारक प्रलापही निघतात. त्यात बहिष्कृतांच्या प्रश्‍नांच्या ऊहापोहासाठी पुरेशी जागा मिळणे शक्‍य नाही. त्यासाठी एक स्वतंत्र पत्र पाहिजे. ही उणीव भरून काढण्यासाठी या (मूकनायक) पत्राचा जन्म आहे. टिळकांनी २ वर्षे कैद भोगून परत आल्यानंतर ‘पुनश्‍च हरिओम्‌’ नावाचा अग्रलेख लिहून केसरीची ४ जुलै १८९९ ला पुन्हा सुरवात केली होती. बाबासाहेबांनीही मूकनायकाच्या अस्तानंतर सहा महिन्यांनी ‘पुनश्‍च हरिओम्‌’ हा अग्रलेख लिहून ३ एप्रिल १९२७ ला ‘बहिष्कृत भारत’ नामक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करून पत्रकारितेला पुन्हा सुरवात केली.

‘पुनश्‍च हरिओम’ या अग्रलेखात बाबासाहेब लिहितात; सहा वर्षांपूर्वी ‘मूकनायक’ पत्रास सुरवात केली तेव्हा राजकीय सुधारणांचा कायदा यावयाचा होता. आता इंग्रजांच्या हातची सत्ता वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे... अस्पृश्‍यांची स्थिती आज जास्त शोचनीय आहे. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून, अन्याय व जुलुमापासून त्यांचा बचाव करण्यासाठी वृत्तपत्राची जरुरी आज अधिक तीव्र आहे.’’ नियतकालिक पाक्षिक, मासिक चालविणे लोखंडाचे चणे खाण्यासारखे कठीण काम आहे. येणाऱ्या संकटांचे व अडचणींचे वर्णन करीत बाबासाहेब लिहितात, ‘बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची संपादकी स्थिती नव्हती. संपादकीय खात्यात बिनमोली संपादकी काम करणारा स्वार्थत्यागी अस्पृश्‍यातील माणूसही लाभला नाही. अशा अवस्थेत बहिष्कृत भारताचे २४-२४ रकाने लिहून काढण्याची जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली. प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ स्वार्थत्याग करणे शक्‍य होते तेवढा केला आहे. देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होणाऱ्या शिव्याशापांचा भडिमार तो सोशित आहे. ‘बहिष्कृत भारता’द्वारे लोकजागृतीचे काम करताना त्याने आपल्या प्रकृती व सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्याच्या वाती केल्या. माता रमाईबद्दल ते लिहितात, ‘‘प्रस्तुत’ लेखक परदेशी असताना रात्रंदिवस जिने (रमाईने) प्रपंचाची काळजी वाहिली व अजूनही वाहतच आहे व तो स्वदेशी परत आल्यावर त्याच्या विपन्नावस्थेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्‍यावर आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही. अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासांतून अर्धा तासही त्याला घालविता येत नाही.....’’  हे वाचताना डोळे पाणावल्याशिवाय कसे राहतील?

 समाजोत्थानाचे साधन असलेल्या ‘बहिष्कृत भारता’साठी त्यांनी सर्वसामान्यांना कळकळीने आवाहन केले होते. ‘बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिकऋण नव्हे काय?’ हा अग्रलेख बाबासाहेबांनी लिहिला. त्यात  लोकांना विनंती करताना लिहिले, ‘तुमचे भांडण भांडणाऱ्या पत्रास तुम्हीच मदत केली पाहिजे. जास्त नाही तरी आपल्या गावातर्फे दहा रुपयांची मदत केल्याशिवाय राहू नका.’ परदेशात जाताना बाबासाहेबांनी जहाजावरून लिहिले होते, ‘गरज पडली तर माझे ‘राजगृह’ घर विका. परंतु, ‘बहिष्कृत भारत’ वर्तमानपत्र बंद पडू देऊ नका. केवढा अतुलनीय व महान त्याग! लो. टिळकांचे सुपुत्र श्रीधर बळवंत टिळक हे बाबासाहेबांच्या समाजसमता संघाचे विधायक कार्यकर्ते होते. बाबासाहेबांनी ‘समता’ नावाचे मुखपत्र २९-६-१९२८ ला सुरू केले होते. त्या ‘समता’च्या पहिल्या अंकात, २५-५-१९२८ ला आत्महत्या करणाऱ्या श्रीधर बळवंत टिळकांनी बाबासाहेबांना लिहिलेले पत्र छापले होते. त्यात श्रीधर यांनी ‘माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे,’ असे लिहिले होते.

वृत्तपत्रसृष्टीचे मूल्यांकन करीत बाबासाहेब म्हणतात, ‘जाहिरातीशिवाय वर्तमानपत्र चालू शकत नाहीत, ही बाब सत्य आहे. तरीसुद्धा वर्तमानपत्रांनी जाहिरातींच्या जाळ्यात फसावे काय आणि कुठवर फसावे? आर्थिक सशक्तीकरणासाठी जाहिरात आवश्‍यक आहे, तरीही जाहिरात प्रकाशित करताना संहितेचे पालन केले पाहिजे.’ वर्तमानपत्राचे महत्त्व विशद करीत बाबासाहेब लिहितात, ‘आधुनिक प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये वर्तमानपत्र उत्तम शासनाचा मूलभूत आधार आहे. ते जनतेला शिक्षित करण्याचे साधन आहे. (मात्र) काही वर्तमानपत्र अज्ञानी लोकांना मूर्ख बनवण्याचे कारखाने बनले आहेत.’ संकुचितपणा, आत्मप्रौढी, तळागाळातील लोकांविषयीची तुच्छता आदी दोषांनी इथली वृत्तपत्रसृष्टी डागाळली होती. बाबासाहेबांनी अशा प्रवृत्तींवर घणाघाती टीका केली आहे. वर्तमानपत्राने समजदारीने, जबाबदारीने सत्याधारित लेखन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निःपक्ष वार्ता देणे वृत्तपत्रांचे सर्वप्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी वेळोवेळी करून दिलेली दिसते. पत्रपंडित बाबासाहेब आंबेडकरांचे या क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com