
‘जिथे कमी तिथे आम्ही’
‘समाजाप्रती असलेले ऋण फेडण्यासाठी कुणाच्या आदेशाची गरज नसते किंवा समाजसेवेसाठी संधीची वाट पाहू नये ते तुमच्या रक्तात असेल पाहिजे ’,वडिलांच्या या शिकवणीतून जळगावातील ध्येयवेड्या डॉक्टरने समाजसेवेला जात, धर्म, प्रांत यासारख्या सीमारेषा ठेवल्या नाहीत. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या तत्त्वाने ते केवळ आरोग्य सेवा करीत नसून समाजात असलेल्या उणिवा शोधत त्यातून गरजूंसाठी धडपड करीत असतात, याचा प्रत्यय येतो तो जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या सेवाकार्यातून.
- प्रशांत कोतकर, नाशिक
डॉ. धर्मेंद्र पाटील हे मूळचे जामनेर (जि. जळगाव) येथील. त्यांचे शालेय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर (जि.जळगाव) येथून झाले. वडील सेवानिवृत्त तहसीलदार. तरीदेखील वडील सेवानिवृत्त होईपर्यंतही त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती.
जामनेरात भाड्याच्या -मातीच्या घरात त्यांनी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बी.जे. मेडिकल कॉलेज (पुणे) येथून एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतले. कॉलेजात असतानाही घरून स्वखर्चासाठी येणाऱ्या तोडक्या पैशातून ही गरजू मित्रांना मदत करण्याची सवय होती. त्यानंतर बंधपत्रित एमबीबीएस म्हणून परभणी जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. रुरल मेडिकल कॉलेज, प्रवरानगर लोणी येथून नेत्र शाखेत एम.एस.केले.
आपण गरिबीतून शिक्षण घेतले आहे, याचे भान ठेवत डॉ. पाटील यांनी आधी जळगाव जिल्ह्यात खेडोपाडी नेत्रतपासणी करून गरजू रुग्णांना अल्पदरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया केल्या. मातृभूमीचे ऋण म्हणून अजूनही दर गुरुवारी जामनेरला जाऊन गरजू रुग्णांना अल्पदरात सेवा देत आहेत.
त्यांनी मध्यप्रदेशात हरदा, बालागाव या जळगावपासून सुमारे ४५० किमी असलेल्या भागात नेत्रतपासणी शिबिरे सुरू केली. तेथील असंख्य गोरगरिबांच्या नेत्रशस्त्रक्रिया केल्या. पुढे अदिक कदम यांच्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेचे समन्वयक झाले.
त्या माध्यमातून त्यांनी थेट भारत- पाकिस्तान सीमारेषवर असलेल्या अनेक खेड्या गावांमध्ये प्रत्यक्ष जात आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरू केले. पर्यायाने काश्मिरी जनतेच्या मनात भारत देशाबद्दल प्रेम निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले.
अधिक कदम यांचे मार्गदर्शनाखाली आणि नाशिकचे मित्र ऋषिकेश परमार यांच्या मदतीने ते दर वर्षी काश्मीर खोऱ्यात कट्टरपंथीयांचा विरोध झुगारत अविरत आरोग्याचे सेवा कार्य करीत आहेत. त्यांनी काश्मिरातील पूरस्थितीत मदत पोचविली.
पद्मश्री डॉ. नटराजन यांच्या मदतीने श्रीनगर येथे पॅलेटगनने जखमी झालेल्या रुग्णांवर त्यांच्या टीमकडून शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सेवाकार्यादरम्यान त्यांना जीव धोक्यात घालून अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या या सेवा कार्याचा उद्देश म्हणजे आपण प्रेमाने इतरांना जिंकू शकतो, हा उद्देश भारतीय सैन्यदलाला देखील आवडला.
लष्करासोबत राहत असताना डॉ. पाटील यांनी त्यांची मेहनत अनुभवली. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी आर्या फाउंडेशनची स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती समाज माध्यमावर केवळ ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहिण्यापलीकडे काहीतरी केले पाहिजे, या विचाराने त्यांनी मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. त्यातून आर्या फाउंडेशनला निधी प्राप्त झाला. या निधीतून ६५ हजार रुपये या प्रमाणे प्रत्येक हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिला. त्यातून पुढे ही प्रथाच पडली.
तीस कुटुंबीयांना मदत
महाराष्ट्रातील एकूण ३० हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आर्या फाउंडेशनकडून प्रत्येकी ६५ हजार रुपये देण्यात आले आहेत. ही मदत पोस्टाने किंवा ऑनलाइन नव्हे तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा, या उद्देशाने जवानांच्या घरी जाऊन मदतीचा धनादेश दिला जातो. संस्थेचे कार्य यावरच सीमित नसून भारतात केरळ, सातारा -सांगली यासारखी कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तत्काळ जीवनावश्यक साहित्यांची मदत पोहचविण्याचे कार्य देखील करण्यात येत आहे.
एका तरुण डॉक्टरला रक्ताचा कर्करोग झाल्याचे कळताच डॉ.पाटील यांनी १२ लाख रुपयांचा निधी उभा करत मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्या फाउंडेशनद्वारा मदत केली.
आज हा तरुण डॉक्टर ठणठणीत आहे. कोरोना लाटेतही डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी प्रत्यक्षपणे जनसेवा केली. जळगाव महानगरपालिकेकडून कोरोना नियमावलीचे पालन- जनजागृती -उपचार करणेसाठी त्यांची ‘ब्रँड अँम्बेसिडर’ म्हणून नियुक्त करण्यात आली.
कोरोना योद्धा म्हणून सन्मान
कोरोना काळातील डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन (मुंबई) येथे डॉ.पाटील यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार देत सन्मानित केले. गरिबीतून आलेल्या होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी डॉ. पाटील नेहमीच पुढे धावून येत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून आर्या फाउंडेशनद्वारा विविध गरजू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते. संस्थेच्या मदतीने एक गरीब मुलगा नुकताच एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
प्रेरणादायी हातांची गाथा
माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत.
तुमच्याशेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
