प्रमाण भाषेचा अहंगंड व ‘बोली’चा न्यूनगंड सोडावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

बोलीच्या संवर्धनासाठी...
बोली भाषेच्या संवर्धनाच्या मुद्याला स्पर्श करताना डॉ. पाटील म्हणाले, की मातृभाषेतून शिक्षण, मायबोलीतून संवाद, लोककला, लोकसाहित्य, लोकपरंपरा आदींसंदर्भात भावनिक- भाषिक भावसाक्षरता जोपासण्यासाठी बोली भाषा हे मध्यवर्ती साधन आहे. मराठी मायबोलीचा जागर करुन तिला अभिजात दर्जा प्राप्त करणे, भाषिक प्रवाहात आपली भाषिक संस्कृती जतन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ, लोककला संस्कृती विद्यापीठ, बोलीभाषा- कृषी संस्कृतीच्या अकादमी स्थापन करून शासनाने प्रयत्न करायला हवेत. त्यात साहित्य चळवळींचे योगदानही आवश्‍यक आहे. भाषा-साहित्य-संस्कृती संवर्धन हेच आपले भाषिक अस्मितांचे प्रभंजन ठरावे, अशी अपेक्षा  किसन पाटील यांनी व्यक्त केली.

बोली भाषा साहित्य संमेलन रविवारी (ता. २४) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष व खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी मुलाखतीत भाषेचा जन्म, स्वरूप, तिचे प्रकार आणि संवर्धनाच्या संदर्भात मते मांडली. बोली भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासकीय व साहित्य चळवळीच्या स्तरावरील प्रयत्नांचा आढावा घेतला.

बोली भाषेचा संबंध जन्मत: मातृभाषेशी अर्थात, मायबोलीशी आहे. बोलीभाषा ही सर्व संस्कारांचा खजिना असते. त्यामुळे माय मराठीचा जागर करताना प्रमाण भाषेचा, उच्चतेचा अहंगंड आणि बोलीभाषेचा न्यूनगंड टाकून दिला पाहिजे. तिच्या निखळ, नैसर्गिक, जीवन व्यवहारात जगायचे, ऐहिक विज्ञाननिष्ठ नवतेचा स्वीकार करणे आवश्‍यक आहे. बोलीभाषेचा संबंध जन्मत: मातृभाषा (मायबोली) म्हणून बोंबली (बेंबी) म्हणजेच नाळेशी असतो. बोंबलणे म्हणजे बोलणे आणि ‘बोंबली’मधील ‘ब’ अक्षर काढले की, ‘बोली’ हा शब्द शिल्लक राहतो. त्यामुळे मातेशी बोली भाषेचा संबंध जोडला जातो. 

व्यवहारातील संवादाचे माध्यम
मानववंशशास्त्र, लोकसांस्कृतिक कलात्मकता, ऐहिक-आध्यात्मिक, लोकज्ञान, चालीरीती, जीवनव्यवहार आणि साहित्य यांच्या जडणघडणीत मौखिक बोली (भाषा) ही ज्ञानसंवादाचे माध्यम असते. भाषा (प्रमाण) आणि बोली यांचा संबंध लिखित आणि मौखिक अशा दोन्ही स्तरांवर प्रशासन, न्याय, लेखन, वाङ्‌मय, संवाद स्वरूपातील आविष्कार पद्धतीनुसार वेगवेगळा ठरत असला तरी उद्दिष्टे आणि ज्ञानव्यवहाराची दृष्टी एकात्म अशीच असते.

मुळात, प्रमाण भाषा ही मौखिक रूपात बोलीच असते. त्यामुळे बोलीभाषेचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, किंबहुना ते अबाधित राहते. त्यामुळे बोलीतला संवाद हा गावंढळ, संस्कृतीहीन, खेडूत व असभ्य मानला जाणे हे अत्यंत चुकीचे आहे.

महाराष्ट्रात शेकडो बोली भाषा
आपल्या प्रांतातील बोलीभाषेबद्दल विचारले असता ते म्हणाले, की महाराष्ट्रात शेकडो बोलीभाषा आहेत. अहिराणी, आगरी, कोहळी, लेवा, तावडी, तडवी भिल्ल, झाडी, वऱ्हाडी, चंदगडी, पोवारी, मालवणी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्‍वरी, सातारी, कोलाम, देहवाली, गोंडी, कातकरी, ठाकरी, बेलदारी, वडारी, वारली, कैकाडी, दखनी, वैदू, घिसाडी, परधानी, मावची, कोरकू, भटक्‍या विमुक्त, करपल्लवी, बाजारातील गुप्तबोली आदी अनेक सांगता येतील. या बोलींची सांस्कृतिक जडणघडण पिढ्यान्‌पिढ्या सुरू आहे. हा बोलींचा ठेवा समाज व्यवहारातून शब्दरूपाने जिवंत राहतो, असेही ते म्हणाले. 

भाषा लोकसंस्कृतीचे प्रतीक
भाषा आणि संस्कृती म्हणजेच जिवंत लोकसंस्कृती. भाषा जगते म्हणजे एक संपूर्ण लोकसंस्कृती जिवंत राहते. भाषा मरते म्हणजे, ती संपूर्ण लोकसंस्कृती नष्ट करत असते. त्यामुळे भाषा, त्यातही बोलीभाषा जगली पाहिजे, तिचे जतन, संवर्धन आणि विकासही व्हायला हवा. 
(शब्दांकन - सचिन जोशी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr kisan patil interview