बदलाचा स्वीकार

dr navnath raskar
dr navnath raskar

मा णूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्‍तीबाबत कोणतेही ठाम मत बनवता येत नाही. जीवन जगण्याचा आणि घेण्याचा अनुभव आहे. तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. दुसऱ्या व्यक्‍तीने कसे वागावे, कसे बोलावे, हे प्रत्येकजण निश्‍चित करतो; पण स्वतःच्या वर्तनावर मात्र नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. आपण विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. उदा. प्रेमाची कबुली देण्यासाठी, राग व्यक्‍त करण्यासाठी गेलेली व्यक्‍ती, सगळे ठरवलेले असतानाही समोर गेल्यावर आपले वागणे कसे होईल, ते सांगू शकत नाही. आपली त्या वेळेची भूमिका ही परिस्थिती, वेळ, मानसिक संतुलन, विचार करण्याची क्षमता यांवर अवलंबून असते. यावरून हे लक्षात येते की माणूस नियमांत बांधला जाऊ शकत नाही.

लहानपणापासूनचे संस्कार, अंगीकारलेले तत्त्वज्ञान, शिक्षणातून घेतलेले विचार जगताना मार्गदर्शक ठरत असतात. माणसाच्या जीवनात या गोष्टींना किती व कसे स्थान आहे यावरून त्याची दिशा ठरत असते. पण जगणे मात्र त्याचे स्वतःचे असते. कधीकधी या सर्व गोष्टींनाही फाटा देऊन माणसाचे वर्तन घडते. बऱ्याचदा चांगले काय हे कळत असतानाही माणूस चुका करतो, तशी कबुलीही देतो. हे चुकीचे आहे हे माहीत असतानाही चूक घडते.

माणूस हा बुद्धीमुळे इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. तो विचारशील प्राणी असल्याने त्याने विचार करून वागावे व स्वतःमधील माणूसपण घडवावे यात गैर नाही. रोज अवतीभोवती होत असणारे बदल माणसालाही बदलवत असतात, ही प्रक्रिया कायम चालू असते. न बदलणारा माणूस कालबाह्य, अडगळीचा ठरतो. माणूस जगण्याची रीत, विचार आणि वर्तनाची दिशा निश्‍चित करतो, तेव्हा त्याचे जगणे थांबते. ते साचेबंद बनते. कारण बदल हा निसर्गाचा नियम असतो. त्यामुळे काळानुसार विचार, वर्तन, जगण्याची रीत याही गोष्टी बदलायला हव्यात. त्या बदलल्या नाही तर ‘जनरेशन गॅप’ ही संकल्पना उदयाला येते. ती मोडीत काढायची असेल, तर बदल स्वीकारावा लागतो. नीती आणि अनीती याबाबत पूर्वीपासून काही ठाम असे सांगितले जाते. पण ते मत आपण आजच्या काळात नवीन पिढीला लागू करू शकतो काय हा विचार करणे गरजेचे ठरते. ज्या गोष्टी निसर्गाशी संबंधित आहेत, त्यावर कोणीही विजय मिळवू शकला नाही आणि शकणार नाही. रबर ताणता येईल तेवढेच ताणणे योग्य, अन्यथा, ते तुटणार हे ज्याला कळले तो तरला, जगला! जुन्या पिढीला नवीन जगाशी जुळवून घेता आले पाहिजे. काळाने दिलेले ज्ञान जगताना वापरता आले पाहिजे. बदल माणूस सहज स्वीकारत नाही, त्यामुळे कायदे करावे लागतात आणि बदल स्वीकारण्यास भाग पाडावे लागते. त्याचा परिणाम म्हणून नाराजी, कोणीही आपले ऐकत नसल्याची भावना, सगळीकडे अराजकता असल्याचा गैरसमज अशा विचारामुळे जगण्याचा आनंद घेता येत नाही. याबाबत एक उत्तम उदाहरण सांगायचे झाले, तर लग्नाविषयी सांगता येईल. पूर्वी लग्नात धार्मिक विधींना महत्त्व होते. नंतर रजिस्टर, प्रेमविवाह होऊ लागले आणि आज ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची चलती झाली आणि तिला कायदेशीर मान्यताही मिळाली. ही काळाची मागणी होती. बदल हा स्वीकारावाच लागतो, खरे तर तो लादला जातो, त्यामुळे मानसिक त्रास होतो, चिडचिड वाढते, त्याचा शरीरावरही परिणाम होतो म्हणून तो खुल्या मनाने स्वीकारावा हेच खरे, अन्यथा न स्वीकारणाऱ्याला काळच नाकारतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com