डोईवरचे आकाश अन्‌ अंतरंगातील नीती

डॉ. नवनाथ रासकर
शुक्रवार, 25 मे 2018

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे एक व्याख्यान पुण्यात काही वर्षांपूर्वी ऐकले होते. त्या वेळी ते म्हणाले होते, विश्‍वात असंख्य आकाशगंगा आहेत. त्यापैकी आपली एक आकाशगंगा. तिच्यात अनेक सूर्यमाला आहेत. त्यात आपली एक सूर्यमाला. आपल्या सूर्यमालेच्या दृष्टीने पृथ्वी हा एक ग्रह. तो एखाद्या मोहरीच्या दाण्याएवढा ! या पृथ्वीचे तीन भाग पाण्याने व्यापलेत, तर बाकीचा भाग जमिनीचा. त्यात डोंगर-दऱ्या, सरोवरे, नद्या, तसेच इतर सर्व प्राणी आणि आपण माणूसप्राणी तुलनेने काहीच नाही. शून्यवत. अगदी वळवळणारा किडा, अळीच ! तरीही स्वतःला कोणीतरी मोठा समजणारा प्राणी म्हणून माणूस वागतो.

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे एक व्याख्यान पुण्यात काही वर्षांपूर्वी ऐकले होते. त्या वेळी ते म्हणाले होते, विश्‍वात असंख्य आकाशगंगा आहेत. त्यापैकी आपली एक आकाशगंगा. तिच्यात अनेक सूर्यमाला आहेत. त्यात आपली एक सूर्यमाला. आपल्या सूर्यमालेच्या दृष्टीने पृथ्वी हा एक ग्रह. तो एखाद्या मोहरीच्या दाण्याएवढा ! या पृथ्वीचे तीन भाग पाण्याने व्यापलेत, तर बाकीचा भाग जमिनीचा. त्यात डोंगर-दऱ्या, सरोवरे, नद्या, तसेच इतर सर्व प्राणी आणि आपण माणूसप्राणी तुलनेने काहीच नाही. शून्यवत. अगदी वळवळणारा किडा, अळीच ! तरीही स्वतःला कोणीतरी मोठा समजणारा प्राणी म्हणून माणूस वागतो. हा त्याचा अहंकारच त्याला घातक ठरला आहे. अर्थात, बुद्धी, विचार हे त्याचे उत्क्रांतितत्त्वाने किंवा निसर्गतःच त्याला लाभलेले हत्यार, खरे तर हे त्याचे वैभव आहे. पण त्याने त्याचा वापर हत्यार म्हणून केला. इम्यॅन्युअल कान्ट म्हणतो, ‘या जगात आणि जगाबाहेर कोठेही सत्‌संकल्पाशिवाय कोणतीच गोष्ट स्वयंमेव चांगली नाही’. सत्‌संकल्प म्हणजे चांगली इच्छा, चांगला संकल्प. बुद्धी, सौंदर्य, संपत्ती अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या स्वयंमेव चांगल्या नाहीत. त्यांचा चांगुलपणा बाहेर-अन्यत्र आहे. म्हणजे त्यांचा वापर कसा केला जातो यावर तो अवलंबून असतो. कान्टच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धी, विचार हे आपल्याला लाभलेले वैभव असले, तरी त्याचा वापर आपण नीट केला नाही हेच खरे. निसर्गापासून-विश्‍वापासून किंवा इतर प्राणी व घटकांपासून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्यासाठी आपण तिचा वापर केला आहे. आपण निसर्गातील सर्व घटकांचे मालक आहोत म्हणजे शोषक आहोत. ही आपली भूमिका निसर्गविरोधी आहे. त्याची फळे आज ‘करावं तसं भरावं’ या न्यायाने आपल्याच वाट्याला येत आहेत. मग ते हवेचे प्रदूषण असो, की ध्वनीचे प्रदूषण किंवा निसर्गातील प्राण्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणे असो, की नद्या- नाल्यांवर, वस्ती करण्याच्या हेतूने किंवा पैसा कमावण्याच्या उद्देशाने केलेले अतिक्रमण असो. यामागे आपले वागणे हेच कारण आहे. बुद्धीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने अवघे जग आपल्याला हवे तसे केले. ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ या अहंकाराने जगालाच गुलाम केले, तर विज्ञान-तंत्रज्ञान हे माणसाचे कर्तृत्वच आहे, पण त्याला विवेकाचा आधार असता तर त्याने विनाशाच्या दिशेने वाटचाल केली नसती. उलट माणसाला एक सुंदर, मंगलमय, आनंदाच्या साम्राज्यात नेले असते. दिशा चुकली की काय होते याचे हे प्रत्यंतर आहे. आज आपण दिशाहीन आहोत. आपल्याला लाभलेल्या बुद्धीचा वापर आपण नीट करत नाही. निसर्गाला समजून घेण्याच्या नादात आपला विवेक हरवला. आपले माणूसपण हरवले. हे माणूसपण विवेकाने येते, विचाराने येते. पण बुद्धीने केवळ बाह्यविश्‍व जाणण्याचा प्रयत्न केला, स्वतःला समजून घेण्याकडे मात्र काणाडोळा केला. त्यामुळे आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत आंधळे आहोत. हा आंधळेपणा जसा या बाबतीत आहे, तसाच तो आपल्या सामाजिक, राजकीय म्हणजे सर्वच व्यवहारांबाबत आहे, याची प्रचिती आपल्याला पावलोपावली येत आहे. बड्या राष्ट्रांचे प्रमुख अडेलतट्टू-आडमुठासारखे वर्तन करताना दिसतात. त्यांच्या या आडमुठेपणाने, तंत्रज्ञानाने विकसित अत्युच्च शिखरावर पोचलेल्या, अणुबाँब किंवा तत्सम आधुनिक शस्त्रांवर, संबंधित यंत्रणेवर चुकून हात पडला, तर सगळे जग संपून जाईल. होत्याचे नव्हते होईल. म्हणजे फांदीवर बसून मूर्ख माणूस तीच फांदी तोडतो आहे, तशी आपली गत होईल. म्हणूनच आपल्याला वैश्‍विक विवेकाची-नीतीची गरज आहे. याचा अर्थ कान्ट म्हणतो त्याप्रमाणे, Above me is the starry heaven, Within me is the moral Law. थोडक्‍यात, आपल्याला बाह्य जगाबरोबरच उदात्त नीतीची गरज आहे हे यातून अधोरेखित होते.

Web Title: dr navnath raskar write in editorial