कोरोना संसर्गावर एक नवीन उपचार : `एमएमआर`ची लस 

मंगळवार, 2 जून 2020

शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, एमएमआरच्या लसीतील गोवरच्या विषाणूची रचना व कोरोना विषाणूची रचना ह्यात थोड्या प्रमाणात साम्य आढळले. गोवर विषाणूचा स्पाईक व कोरोना विषाणूचा स्पाईक यात साधर्म्य आढळले.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण जगभरात लहान मुलांमध्ये कमी आहे. स्वाइन फ्लू पासून साधा फ्लू तसेच डेंगी या सर्व आजारांना नेहमीच लहान मुले बळी पडत आली आहेत. कोरोनाचा संसर्ग हा एक नवीन आजार आहे, जो लहान मुलांमध्ये फार कमी प्रमाणात आढळतो. तसे पाहता लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्या नुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला पाहिजे व तो देखील गंभीर स्वरूपात. पण तसे आढळत नाही. ह्याचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही देशांमधील संशोधनात असे आढळून आले आहे की, एमएमआर किंवा एमआरची लस दिल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. आफ्रिकेतील मादागास्कर हा अडीच कोटी लोकसंख्या असणारा देश आहे. या देशात गोवरच्या रुग्णांची संख्या मागील पाच वर्षांत वाढत गेली. ह्यावर उपाय म्हणून या देशाने ७२ लाख लोकांना एमएमआरची लस दिली. कोरोनाची साथ आल्यावर या देशात एकही मृत्यू झाला नाही. या घटनेने डॉक्टरांचे व शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. 

शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, एमएमआरच्या लसीतील गोवरच्या विषाणूची रचना व कोरोना विषाणूची रचना ह्यात थोड्या प्रमाणात साम्य आढळले. गोवर विषाणूचा स्पाईक व कोरोना विषाणूचा स्पाईक यात साधर्म्य आढळले. दोन्ही विषाणू एकाच रिसेप्टारवर आक्रमण करून आजार पसरवतात असे संशोधनाअंती आढळून आले आहे. त्यामुळे एमएमआरची लस दिलेल्या व्यक्तींना हा रोग होत नाही अन्यथा कमी प्रमाणात होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऑस्ट्रेलियाचे उदाहरण 
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांत ही लस मोठ्या व्यक्तींनाही दिली जाते. तिथला कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तेच तर प्रमाणित करतो असे वाटते. ऑस्ट्रेलियामध्ये एमएमआरची लस १९६५ नंतर जन्मलेल्या लोकांना दिली गेली. म्हणजे ० ते ५३ वर्षे. तिथे असे आढळून आले होते की, गोवर व इतर विषाणूंची प्रतिकारशक्ती ही शेवटच्या लसीनंतर १० ते १५ वर्षांच्या काळानंतर कमी होते. म्हणून त्यांनी हा वयोगट निवडला होता. जर आपण कोविड-१९च्या संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या ऑस्ट्रेलियातील आकडेवारीवर नजर टाकली तर, असे आढळून येते की तिथे पन्नाशीच्या पुढील लोकांचा प्रामुख्याने मृत्यू झाला आहे. तर साठीनंतरच्या व्यक्तीमध्ये मृत्यूदर अधिक आहे. याचा असा अर्थ निघू शकतो की एमएमआरची लस कोरोना विरुद्ध काही प्रमाणात काम करत आहे. हे सिद्ध झाले तर कोरोना विषाणूविरुद्धची लस करवयाची गरज भासणार नाही. 

मादागास्कर देशाप्रमाणे अमेरिकेच्या सामोआ प्रांतात एमएमआरची लस दिल्यामुळे कोरोनाचा रुग्ण नाही. 

न्यूझीलंडमध्ये प्रयोग 
न्यूझीलंडमध्ये देखील ही लस गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणात दिली गेली आहे. तिथेही कोविडमुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण व मृत्युदर कमी आहे. 
तसेच युगांडा व रवांडा ह्या देशांनी ही लस दिली. तिथे देखील कोविडने मृत्यू होण्याचे प्रमाण नाही किंवा अत्यल्प आहे. 

भारतातही उपयोग 
आपल्या देशात देखील ही लस १५ वर्षांखालील शालेय मुलामुलींना दिली गेली आहे. आणि आपल्या देशात देखील १५ वर्षांखालील मुलांमध्ये कोविडच्या संसर्गाचे अत्यल्प आहे. 

आपल्या देशात देखील एमआरची लस १५ वर्षांखालील शाळकरी विद्यार्थ्यांना दोन वर्षांपूर्वी दिली गेली होती. 

तसेच जगभरात ५ वर्षांपर्यंत एमएमआरच्या लसीचे तीन डोस सर्व बालकांना दिले जातात. कदाचित हेच कारण असेल त्यांना कोरोनाचा संसर्ग न होण्याचे. 

प्रयोगांची गरज 
एमएमआरची लस काही प्रमाणात कोरोना विषाणूच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करू शकते. भारतात एमआर व एमएमआर लसींचा मुबलक साठा आहे. माझे असे मत असे आहे की या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला पाहिजे. ही लस दिल्यानंतर पांढऱ्या पेशींमध्ये प्रतिकारशक्ती यायला पाच दिवसांपासून सुरुवात होते. कदाचित हा एक मास्टर स्ट्रोक होऊ शकतो. 

अमेरिका व इतर प्रगत देश हे लस तयार करण्याच्या व्यवसायात इतके गुंतले आहेत की ह्या बातमीकडे कानाडोळा करून आपला महत्वाकांक्षी प्रकल्प पुढे नेतील. पण, आपल्या देशाने डोळे उघडे ठेवून हा उपाय करून पाहिला पाहिजे. जर या लसीने कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती दिली तर या मोठ्या देशांचे कोरोना लस बनवायचे मनसुबे धुळीत मिळतील. आपल्या देशाने मुंबईमधील धारावी व पुण्यातील जनता वसाहतीत ही लस देऊन बघितले पाहिजे, कारण ही लस आपल्या देशात बनते व आत्तादेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हे प्रयोग यशस्वी झाले तर आपल्याकडील चित्र वेगळे असेल. 

महत्त्वाचे व विचार करण्यासारखे ... 
१. गोवरच्या विषाणूची रचना व कोरोना विषाणूची रचना ह्यात थोड्या प्रमाणात साम्य 
२. गोवर व कोरोनाचे विषाणू एकाच रिसेप्टारवर आक्रमण करून आजार पसरवतात 
३. गोवरची लस दिलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अत्यल्प 
४. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये मोठ्या व्यक्तिंनाही गोवरची लस दिली जाते. 
५. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युगांडा, रवांडा या देशांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी 
६. एमआरची लस भारतातही दोन वर्षांपूर्वी शालेय मुलांना दिली होती. त्यामुळे कदाचित मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी 
७. भारतात संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी एमआरच्या लसीचे प्रयोग करणे गरजेचे.