भाष्य : निरागसपणाच्या अल्याड-पल्याड...

बालसाहित्य कूस बदलत आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा आणि कल्पकतेचा होणारा वापर स्वागतार्ह आहे. भवताल समजून घेऊन व्यक्त होण्याच्या बालकांच्या अभिव्यक्तीला भाषेतून बळ दिले पाहिजे.
Education
Educationsakal
Summary

बालसाहित्य कूस बदलत आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा आणि कल्पकतेचा होणारा वापर स्वागतार्ह आहे. भवताल समजून घेऊन व्यक्त होण्याच्या बालकांच्या अभिव्यक्तीला भाषेतून बळ दिले पाहिजे.

- डॉ. नीलिमा गुंडी

बालसाहित्य कूस बदलत आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा आणि कल्पकतेचा होणारा वापर स्वागतार्ह आहे. भवताल समजून घेऊन व्यक्त होण्याच्या बालकांच्या अभिव्यक्तीला भाषेतून बळ दिले पाहिजे. साहित्य वाचून मुले रातोरात मोठी होत नसतात, मात्र त्यांच्या मनात शब्द मुरत राहतात, त्यांना शब्द सोबत करतात.

‘सुट्टीनिमित्त वाचनालयाचा बालविभाग सुरू झाला आहे’, अशा बातम्या नुकत्याच वाचनात आल्या. त्या वाचताना ‘सुट्टी म्हणजे पुस्तकांशी गट्टी’ असे समीकरण आजही टिकवून धरण्याचा प्रयत्न होत आहे, याचे समाधान वाटले. काळ किती बदलला आहे, ते आमच्या पिढीच्या मनात घर केलेल्या पुस्तकांची फडफडणारी पाने आठवली की लक्षात येते! तरीही बदलांना तोंड देत वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे यातून दिसते.

बालसाहित्य हा शब्द आज आपण वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्यासाठी वापरत असतो. बालमनाची संवेदनशीलता केंद्रस्थानी ठेवून केलेले लेखन, इतकाच त्याचा अर्थ उरत नाही; तर बालांना उद्देशून केलेले, त्यांना मोठे होण्यासाठी शिदोरी देणारे लेखनही त्यात असते. मुळात ‘बाल’ हा शब्दही आपण शिशु, बाल, कुमार, किशोर अशा सर्वांसाठी वापरत राहतो. या टप्प्यांमध्ये खरे तर, वयाचे सूक्ष्म अंतर असतेच, शिवाय त्यात प्रतिबिंबित झालेले सांस्कृतिक जगही वेगवेगळे असते. पुन्हा मुलांसाठी काय लिहायचे, विशेषत: काय लिहायचे नाही याविषयीचे संकेतदेखील असतात! तरीही या साऱ्यातून वाट काढत अनेक लेखक लिहिताना दिसत आहेत.

कल्पकतेवर अधिक भर

आपल्याकडे ‘बालसाहित्य’ हा प्रकार स्वतंत्रपणे तसा उशिरा आला. आपल्या आधुनिक कवितेच्या पहिल्या पर्वातल्या कवींवर पालग्रेव्ह यांनी संपादित केलेल्या ‘गोल्डन ट्रेझरी’तील कवितांचा प्रभाव होता. (ते पुस्तक तेव्हा अभ्यासक्रमात असे!) त्यातल्या काही कवितांमध्ये निरागस बाल्य हे स्वर्गीय सुखाचे, चिरंतनाचे प्रतीक मानलेले असे. उदा. वर्डस्वर्थने लिहिले आहे : ‘हेवन लाईज अबाउट अस इन अवर इन्फन्सी’. याचा प्रभाव ना. वा. टिळक, बालकवी आदींच्या कवितांमध्ये दिसतो. बालसाहित्य स्वतंत्रपणे प्रकाशित होण्यापूर्वी विंदा करंदीकर यांच्याही काही बालकविता ‘स्वेदगंगा’ (१९४९) या त्यांच्या प्रौढांसाठी लिहिलेल्या कवितासंग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत! पुढे बालसाहित्य स्वतंत्रपणे बहरत गेले, आता तर त्यात खूप कल्पकता दिसते. त्यातील बोलकी चित्रे, सजावट, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे बालमन पुस्तकाकडे आकर्षित होणे शक्य होत आहे.

मुलांसाठीच्या पुस्तकात मुलांनीच काढलेली सुंदर चित्रे, हा कल्पक उपक्रम डॉ. विजया वाड यांनी संपादित केलेल्या बालकविता आणि कथा या कोशांच्या खंडांमध्ये आहे. तो कौतुकास्पद आहे. आणखी वेगळे प्रयोगही होत आहेत. ‘भाषेची भिंगरी’मध्ये मी प्रत्येक गोष्टीखाली भाषेचे बारकावे लक्षात येण्यासाठी वेगळे उपक्रम देण्याचा प्रयोग केला आहे. आबा महाजन यांनी ‘मन्हा मामाना गावले जाऊ’ हा आपला कवितासंग्रह मराठी आणि अहिराणी असा द्वैभाषिक स्वरूपात प्रकाशित केला आहे. तसेच स्वत: लहान मुलांनी लिहिलेले बालसाहित्यही प्रकाशित होत आहे. त्यासाठी अगदी गावपातळीवरून शाळांमधून मुलांना आज प्रोत्साहन मिळत आहे. डॉ. सुरेश सावंत यांनी त्यांच्या ‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ या पुस्तकात अशा साहित्याचा परिचय करून दिला आहे. डॉ. भूषण केळकर व मधुरा केळकर यांनीही शालेय पातळीवर कवितास्पर्धा घेऊन त्यातील निवडक कविता ‘युवल’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. आजचे बालसाहित्य प्रकाशात आणण्यात जुन्या-नव्या नियतकालिकांचा वाटाही मोठा आहेच!

अलीकडे माधुरी पुरंदरे यांनी रुजवलेले चित्रवाचन, राजीव तांबे, स्वाती राजे यांच्या आगळ्यावेगळ्या गोष्टी, दासू वैद्य यांचा कवितांचा यशस्वी चौकार (चार कवितासंग्रह) तसेच संगीता बर्वे यांच्या बालकविता हिंदीत अनुवादित होणे, अशा बाबी प्रातिनिधिक स्वरूपात उल्लेखनीय आहेत. ‘कुल्फी’मध्ये सदानंद रेगे यांची ‘उंदीर’ ही कविता समर्पक चित्रासह समाविष्ट झाली आहे. ते पाहून असे वाटले की, अशा पूर्वसुरींच्या अनेक कविता शोधून पुन्हा प्रकाशात आणल्या पाहिजेत. जी.ए. कुलकर्णी यांचे ‘बखर बिम्मची’सारखे पुस्तक आजही मुलांपर्यंत जायला पाहिजे. काही जुन्या लेखकांचे साहित्य आज आधुनिकतेचा स्पर्श देऊन मुलांसमोर आणले पाहिजे. असे खूप काही करण्याजोगे आहे.

भवताल समजण्याची धडपड

एक तर, आपल्याकडे ‘टीन एजर्स’- पौगंडावस्थेतील मुलांसाठी स्वतंत्र साहित्यप्रकार नाही. तो असायला हवा. (जर्मन भाषेत तसा असल्याचे कळते.) वर्तमानपत्रांनीही बालसाहित्यासाठी अधिक अवकाश दिला पाहिजे. त्यांच्यासाठी ते केवळ सांस्कृतिक कर्तव्य नसून त्यांना पुढच्या पिढीतील वाचक मिळण्यासाठी आज केलेली गुंतवणूक असेल! आज आधीच आपण नव्याने मौखिक युगाकडे वळलो आहोत. वाचण्यापेक्षा अभिवाचनाकडे आज कल आहे. त्यामुळे कालचे नि आजचे महत्त्वाचे बालसाहित्य संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट अशा कलांच्या साथीने मुलांसमोर नेले पाहिजे. ‘पुस्तक नंतर वाचा, आता खेळा, नाचा’ असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात नाचासाठी देखील कवितेचे पुस्तक हवेच! त्यामुळे अशा उपक्रमांमुळे बालसाहित्याला चालना मिळू शकेल!

आज शालेय पातळीवर मराठीची असलेली दुय्यम अवस्था बदलण्याची धडपड करत राहणे, हे तर आपले साऱ्यांचे कर्तव्य आहेच! साहित्यलेखनासाठी केवळ साधन किंवा माध्यम असे स्थान भाषेला देणे पुरेसे नाही. भाषा म्हणजे साहित्यासाठी आशयद्रव्य असते. मात्र अशा रूपात तिचे उपयोजन करण्यासाठी तिच्यावर विलक्षण पकड असावी लागते. तिच्या सर्जनशीलतेच्या वाटा माहीत असाव्या लागतात. यासाठी मराठी भाषेचे शिक्षण पूर्ण क्षमतेने दिले गेले पाहिजे. भाषा हा केवळ पोटापाण्याचा विषय नाही, तसाच केवळ विनिमय व्यवहारापुरता विषयही नाही. त्यात स्वत:शी संवाद करण्याची निकड निर्माण व्हायला हवी. अशी आत्मसंवादाची ताकद भाषेत असते, याचा मुलांना अनुभव यायला हवा. साहित्य वाचून मुले रातोरात मोठी होत नसतात, मात्र त्यांच्या मनात शब्द मुरत राहतात, त्यांना शब्द सोबत करतात. त्यांच्या भावजीवनाला अस्तर पुरवतात. हेही विसरून चालणार नाही.

मराठी बालकविता आज शहरी वास्तव रेखाटतानाच रानशिवाराचा दरवळदेखील टिपून घेत आहे. उदा. गोविंद पाटील यांच्या ‘थुई थुई आभाळ’ या संग्रहातल्या एका कवितेत गाय व्यायल्याचे वर्णन आले आहे, ते असे : ‘हळुवार आले बाहेर मुंडके आणि पाय / आजीने जोर लावून मोकळी केली गाय’. असे वेगळे जीवनानुभव तरलपणे कवितेत येऊ शकतात. विंदा करंदीकर यांनी ‘पिशी मावशी आणि भुतावळ’ यावर कविता लिहून वेगळी वाट चोखाळली आहेच! तरीही मुलांना मृत्यू या अनुभवाविषयी कसे सांगावे, हा पेच मोठ्यांना पडत असतो. प्रत्यक्षात ‘फोटोत जाणे’ ‘चांदणी होणे’ अशा खास वाक्प्रचारातून मुलांनी तो अनुभव आपलासा करून घेतलेला असतो. भवताल समजून घेण्याची त्यांची धडपड असते आणि त्यांची अशी खास भाषाही असते. आपण ती भाषा कान देऊन ऐकायला हवी. त्यांच्या भाषेतून खरे तर बालसाहित्याला नवनवे कोंब येऊ शकतील!

अध्यापन क्षेत्रातल्या कवी श्रीधर नांदेडकर यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे :

‘मी रुजलो तिथं पक्ष्यांना

हिरव्या शब्दांनी न्हाऊ घातलं

मी शिकवलं,

त्या सगळ्या मुलांच्या स्वप्नांत

सुरवंट सोडण्याची असहाय धडपड केली’

असे शिक्षक आणि पालक मिळाले तर मुलांच्या स्वप्नातील सुरवंट नक्कीच फुलपाखरे बनतील आणि बालसाहित्यदेखील आपसूक कात टाकेल!

(लेखिका साहित्यिक व समीक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com