स्वप्न मानवी अवकाशमोहिमेचे

dr parkash tupe
dr parkash tupe

एका छोट्याशा खेड्यातून सुरू झालेला ‘इस्रो’चा प्रवास विस्मयकारक तर आहेच; पण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. आता येत्या चार वर्षांत अवकाशात मानव पाठवून ‘इस्त्रो’ भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न पूर्ण करील, यात शंका नाही.

‘‘भा रत येत्या चार वर्षांत अंतराळात मानव पाठवेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात किंवा त्या अगोदर एखादा भारतीय युवक वा युवती तिरंगा घेऊन अंतराळात जाईल. यामुळे अंतराळात मानव पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल,’’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणात केली. या घोषणेनंतर ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे प्रमुख के. सिवन म्हणाले, ‘‘मी या घोषणेने आश्‍चर्यचकित झालो. खरं तर ‘इस्रो’ गेली दहा-पंधरा वर्षे मानवी अवकाश मोहिमेचा गंभीरपणे विचार करीत आहे. आम्ही त्या दिशेनं काही पावलंही टाकलेली आहेत. पंतप्रधानांनी भारतीयांना दाखविलेलं स्वप्न आम्ही नक्कीच वेळेत साकार करू.’’ ‘इस्रो’ने या प्रकल्पासाठी आतापर्यंत १७३ कोटी रुपये खर्च केले असून, या संपूर्ण मोहिमेसाठी सुमारे दहा हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.

अवकाश युगाचा प्रारंभ ऑक्‍टोबर १९५७ मध्ये रशियाने ‘स्पुटनिक’ हा कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवून केला. त्याची दखल घेऊन अमेरिकाही अवकाश क्षेत्रात हिरिरीने उतरली. इकडे रशियाने एप्रिल १९६१ मध्ये युरी गागारिन या वैमानिकाला अंतराळात पाठविले. पावणेदोन तासांची अंतराळ सफर करून गागारिन सुखरूप पृथ्वीवर परतला. रशियाचे हे यश पाहून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनडी यांनी २५ मे १९६१ रोजी घोषणा केली, ‘‘येत्या दहा वर्षांत अमेरिका चंद्रावर माणूस उतरवून पुन्हा सुखरूपपणे पृथ्वीवर आणेल.’’  अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संस्थेने २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग याला चंद्रावर उतरविले.

या पार्श्‍वभूमीवर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा व विक्रम साराभाई यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पाठिंब्याने १९६२ मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्राचा पाया रचला. तिरुअनंतपुरमजवळच्या तुंबा या खेड्यातील पडक्‍या चर्चमध्ये ‘इस्रो’चे काम सुरू झाले. तुटपुंजे साहित्य, पण अफाट कष्टाच्या बळावर २१ नोव्हेंबर १९६३ रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी पहिला अग्निबाण प्रक्षेपित करून डॉ. भाभा व साराभाईंनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले. सोव्हिएत रॉकेटच्या साह्याने भारताचा ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. यानंतर ‘इस्रो’ने मागे वळून पाहिलेच नाही. अग्निबाणांची ताकद वाढविणे व वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह बांधून ते प्रक्षेपित करण्याचा सपाटा ‘इस्रो’ने लावला. अवघ्या २५-३० वर्षांत ‘इस्रो’ने १५ टनाच्या अग्निबाणापासून ४०० टनांचा ‘जीएसएलव्ही’ अग्निबाण बांधण्याची क्षमता मिळविली. यामुळे २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चांद्रमोहिमेला हिरवा कंदील दाखविला. अवघ्या ३८६ कोटी रुपयांत ‘इस्रो’ने चांद्रमोहीम यशस्वीपणे राबविली. पुढे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी १५ ऑगस्ट २०१२ ला मंगळ मोहिमेची घोषणा केली. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी १५ महिन्यांत व ४५० कोटींच्या खर्चात मंगळमोहीम राबविली. पहिल्याच प्रयत्नात व अतिशय कमी खर्चात मंगळाला गवसणी घालणारा भारत हा एकमेव देश ठरला. दरम्यानच्या काळात ‘इस्रो’च्या काही शास्त्रज्ञांचे लक्ष मानवी अवकाश मोहिमांकडेच होतेच. त्यातून २००४ मध्ये मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. अंतराळात माणूस पाठविण्यासाठी महत्त्वाच्या काही टप्प्यांची पूर्वतयारी ‘इस्रो’ने काही वर्षांपासून सुरू केली होती. अंतराळात माणूस पाठविल्यावर त्याला सुखरूपपणे परत आणण्यासाठीच्या कुपीची चाचणी २०१४ मध्ये घेण्यात आली. यासाठी ‘जीएसएलव्ही मार्क-३’ अग्निबाण तयार करण्यात आला. या अग्निबाणात तीन जण बसू शकतील अशी ३.६ टन वजनाची कुपी ठेवली. हा अग्निबाण १८ डिसेंबर २०१४ रोजी प्रक्षेपित केला गेला. अग्निबाणातील वेगवेगळे टप्पे हवे तेवढ्या उंचीवर प्रज्वलित होऊन अंतराळात कुपी ८० किलोमीटर उंचीपर्यंत पोचली. तेव्हा कुपीवरचे थ्रस्टर बंद झाले व कुपी अरबी समुद्राकडे कोसळू लागली. कुपीचा वेग कमी करण्यासाठी कुपीवरचे पॅराशूट उघडले गेले व ती हळूहळू खाली येत समुद्रात पडली. या प्रयोगाच्या यशामुळे मानवी अंतराळ मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा ‘इस्रो’ने पार पाडला. आता पुढील वर्षी हाच प्रयोग हेलिकॉप्टर वापरून व अखेरीस अंतराळातून कुपी खाली ढकलून करण्याचा ‘इस्रो’चा मानस आहे.

मानवी अवकाश मोहिमेसाठी अजून एक महत्त्वाची चाचणी पाच जुलै रोजी घेण्यात आली. यान उड्डाणास तयार असताना अचानक काही धोका दिसल्यास उड्डाणासाठी अग्निबाणावर ठेवलेले यान त्यातील अंतराळवीरांसह सुरक्षितपणे अग्निबाणापासून दूर नेण्यासाठीच्या ‘क्रूझ एस्केप सिस्टिम’ची चाचणी श्रीहरीकोटामधील उड्डाणस्थळावर घेण्यात आली. अवघ्या साडेचार मिनिटांत अग्निबाणापासून यान सुरक्षितपणे दूर नेण्याचा प्रयोग यशस्वी झाला. अवकाशात मानव पाठविण्यासाठी सर्वांत महत्त्वाची असते, ती म्हणजे कुपी. दोन किंवा तीन अंतराळवीर यातून प्रवास करणार असल्याने या कुपीत त्यांना लागणारा प्राणवायू, अन्नपाणी, जीवनावश्‍यक वस्तू, योग्य ते वातावरण कायम राखणारी यंत्रणा, दळणवळणासाठीची यंत्रणा, अंतराळवीरांच्या सुरक्षिततेच्या यंत्रणा यासारख्या गोष्टी असलेली कुपी बांधण्याबाबत ‘इस्रो’ने काही काम केले आहे; तसेच अंतराळवीरांसाठी लागणारा पोषाख (स्पेस सूट) यावरही काही काम झाले आहे.‘इस्रो’ने या मोहिमेसाठी काही कामे केली असली तरी, अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाचे मोठे काम बाकी आहे. या प्रशिक्षणासाठीच्या सुविधा भारताकडे सध्या नसल्यामुळे येत्या चार वर्षांत ही मोहीम राबवायची असेल, तर आपल्या अंतराळवीरांना (गगनॉट) परदेशी पाठवून हे प्रशिक्षण घ्यावे लागेल. सध्या ‘इस्रो’ बंगळूरजवळ प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या तयारीत आहे. हवाई दलातील शे-दोनशे युवकांना खास शिक्षण देऊन त्यातील काहींना या मोहिमेसाठी निवडले जाईल.
पंतप्रधानांच्या घोषणेने ‘इस्रो’मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र मानवी मोहिमेसाठी चार वर्षांचा काळ हा अपुरा असल्याचे अनेकांना वाटते. या मोहिमेसाठी लागणाऱ्या अग्निबाणाच्या पुरेशा चाचण्या अजून झालेल्या नाहीत; तसेच मानवी मोहिमांमध्ये अंतराळवीरांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने अवकाशकुपी सुरक्षितपणे परत आणण्यासाठी जास्त चाचण्या आवश्‍यक आहेत; तसेच अंतराळवीरांची निवड, त्यांचे प्रशिक्षण व त्यासाठीच्या यंत्रणांचा अभाव ‘इस्रो’ला जाणवू शकतो. परदेशी मदत मिळाल्यास तीन-चार वर्षांत आपल्याला अवकाशप्रवासासाठी योग्य असे ‘गगनॉट’ मिळतील. ‘गगनयाना’च्या मोहिमेसाठी दहा-बारा हजार कोटी एवढा खर्च होणार असल्याने हा खर्च करू नये, असे काहींना वाटते. मात्र, ‘इस्रो’च्या मते या मोहिमेमुळे सुमारे १५ हजार तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध होणार असून भारतीय उद्योगांना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल. रशियाच्या गागारिननंतर ६० वर्षांनी भारत आपला अंतराळवीर अवकाशात पाठवत आहे. ही मोहीम भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एका छोट्याशा खेड्यापासून सुरू झालेला ‘इस्रो’चा प्रवास आश्‍चर्यकारक असून, येत्या चार वर्षांत ‘गगनयाना’तून भारतीय युवकाला अवकाशात पाठविण्याची क्षमता नक्कीच आपल्या शास्त्रज्ञांकडे आहे. त्यामुळे भारतीयांचे मानवी अवकाशमोहिमेचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com