अवकाशातील अघटिताचा धडा

डॉ. प्रकाश तुपे
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतानाच, भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाणाऱ्या रशियाच्या ‘सोयुझ’ यानाला गेल्या आठवड्यात अपघात झाल्याने मानवी अवकाश मोहिमांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतानाच, भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

गेल्या आठवड्यात एका रशियन अवकाशयानाच्या उड्डाणाच्यावेळी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. सुदैवाने या यानातील दोन अंतराळवीर कुठलीही इजा न होता बचावले. मुळातच मानवी अवकाशमोहिमा अत्यंत धोकादायक असतात. मात्र, रशियाच्या ‘सोयुझ’ या अवकाशयानाने गेली २०-३० वर्षे अनेकांना सुखरूपपणे अंतराळात नेऊन परत आणले. मात्र, ‘सोयुझ’च्या या यशाला ११ ऑक्‍टोबर रोजी गालबोट लागले. कझाकस्तानच्या उड्डाणतळावरून ‘एम-१० सोयुझ’ यानाचे प्रक्षेपण होणार होते. या यानातून दोन अंतराळवीर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात काही महिन्यांच्या मुक्कामासाठी पाठविण्याचे नियोजन होते. ‘सोयुझ’ यानातून अमेरिकी ‘ॲस्ट्रॉनॉट’ निक व रशियन ‘कॉस्मॉनॉट’ अलेक्‍सी हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये वास्तव्यासाठी निघाले होते. यानाने ठरलेल्या वेळेनुसार अवकाशात झेप घेतली. अग्निबाणाच्या पहिल्या टप्प्याने व्यवस्थित काम सुरू केले. अपेक्षेप्रमाणे यानाचा वेग वाढत जाऊन ते उंच जाऊ लागले व काही सेकंदांतच दिसेनासेही झाले. अग्निबाणाचा पहिला टप्पा पूर्ण जळून जाताना बूस्टर रॉकेट गळून दुसरा टप्पा प्रज्वलित होणे अपेक्षित होते. मात्र, बूस्टर रॉकेटच्या कार्यात काहीतरी गडबड झाली व दुसरा टप्पा प्रज्वलित होऊ शकला नाही. काहीतरी विपरीत घडत असल्याचे यानातील संगणकाच्या ध्यानात आले व त्याने तत्काळ अंतराळवीर असलेली कुपी (कॅप्सुल) अग्निबाणापासून दूर फेकण्याची आज्ञा दिली. एखाद्या बंदुकीतून गोळी फेकली जावी, तशी प्रचंड वेगाने ही कुपी अग्निबाणापासून दूर होत पृथ्वीकडे फेकली गेली. काही वेळातच कुपीवरील पॅराशूट उघडले गेले व वेगाने कोसळणाऱ्या कुपीचा वेग नियंत्रित होऊन ती जमिनीवर कोसळली. रशियाच्या हेलिकॉप्टरने या कुपीचा ठावठिकाणा शोधला. तत्काळ तंत्रज्ञांनी तिकडे धाव घेतली. कुपीतून दोन्ही अंतराळवीरांना बाहेर काढले गेले, तेव्हा ते सहीसलामत असल्याचे पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

आता अमेरिकेची ‘नासा’ व रशियाची ‘रोस्कोमॉस’ या संस्था हा अपघात नक्की कशामुळे झाला, याची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत रशिया अंतराळात मानव पाठवणार नाही.आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४०० किलोमीटर उंचीवरून गेली वीस वर्षे पृथ्वीभोवती फेऱ्या मारत आहे. या स्थानकात जे प्रयोग केले जात आहेत, त्यासाठी लागणारे अंतराळवीर पृथ्वीवरून नेणे-आणण्याचे काम हल्ली रशियाची ‘सोयुझ’ याने करीत आहेत. ‘सोयुझ’च्या अपघातामुळे आता हे काम सध्यातरी बंद करावे लागेल. त्यामुळे लवकरात लवकर ‘सोयुझ’च्या अपघाताच्या कारणांचा छडा लावण्याचे आव्हान शास्त्रज्ञांपुढे आहे.

अवकाशयुगाचा प्रारंभ होऊन साठ वर्षे लोटली आहेत. या काळात जवळच्या ग्रहांना गवसणी घालण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. मात्र, दूरदूरच्या ग्रह-गोलांकडे जाण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान निर्माण करणे आणि या प्रवासाच्या दीर्घ काळात मानवी शरीराला कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात एखादे स्थानक उभारावे असे रशिया व अमेरिकेला वाटत होते. रशियाने प्रथम ‘सल्यूत’ हे छोटे स्थानक अंतराळात पाठवून, त्यात काही काळ ‘कॉस्मॉनॉट’ला राहावयास ठेवलेदेखील. अमेरिकेने ‘स्कायलॅब’ हे स्थानक १९७३ मध्ये अंतराळात पाठवून ‘ॲस्ट्रॉनॉट’ला तेथे काही काळ ठेवून प्रयोग केले. रशियाने १९८६ मध्ये ‘मीर’ हे  स्थानक आकाशात नेऊन १५ वर्षे पृथ्वीभोवती फिरवत ठेवून मोलाची माहिती मिळविली. त्यानंतर अमेरिकेने रशियासह अकरा देशांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक बांधण्याचे ठरविले. फुटबॉलच्या मैदानाएवढ्या आकाराच्या या स्थानकाची जोडणी अंतराळातच करण्याचे ठरले. सुमारे ४६० टनी वजनाच्या स्थानकाचे मोठे सुमारे साठ भाग व छोटे कोट्यवधी भाग अंतराळात नेऊन त्यांची जोडणी करण्यासाठी अमेरिकेच्या ‘स्पेस शटल’ व रशियाच्या ‘प्रोग्रेस’ व ‘सोयुझ’ यानांची मदत घेण्यात आली. या यानांनी नेलेल्या अंतराळवीरांनी स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास नेले. मध्यंतरी अमेरिकेने ‘स्पेस शटल’ कार्यक्रम थांबविला आणि त्यामुळे स्थानकासाठी अंतराळवीर नेण्या-आणण्याचे काम ‘सोयुझ’वर पडले. ‘सोयुझ’ने नव्वद फेऱ्या मारून स्थानकात पन्नासावर अंतराळवीर नेले. या कामगिरीचा भाग म्हणून ‘सोयुझ’च्या १३९ व्या मोहिमेत दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्थानकात पोचविण्याची जबाबदारी ‘एम-१० सोयुझ’ यान पार पाडणार होते.

मानवी अवकाश मोहिमांच्यावेळी अपघात होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. अंतराळवीर होण्यासाठी सुमारे ५६० लोकांनी प्रयत्न केले व त्यात ३१ जणांना प्राण गमवावे लागले. सर्वांत जास्त मृत्यू अमेरिकेच्या अवकाश मोहिमांदरम्यान झाले आहेत. चांद्रमोहिमांसाठी बनविलेल्या ‘अपोलो-१’ मोहिमेच्या कुपीत, रंगीत तालीम करताना, तीन अमेरिकी अंतराळवीर १९६७ मध्ये प्राणास मुकले. त्याच वर्षी अवकाशकुपी पृथ्वीवर उतरताना पॅराशूट न उघडल्यामुळे कुपी जमिनीवर आदळून रशियन अंतराळवीर मृत्युमुखी पडला. कुपीतील हवा निघून गेल्याने तीन रशियन अंतराळवीरांनी जून १९७१ मध्ये प्राण गमावले. ‘नासा’चे चॅलेंजर अवकाशयान उड्डाण होताना बूस्टर रॉकेटचा स्फोट होऊन सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. २००३ मध्ये अमेरिकेचे ‘कोलंबिया’ यान पृथ्वीवर उतरताना फुटलेल्या उष्णताविरोधक टाइलमधून यानात उष्णता जाऊन ‘कोलंबिया’ पेटून त्याचे तुकडे झाले. या अपघातात सात अंतराळवीर मृत्यमुखी पडले. त्यात भारतीय वंशाची कल्पना चावला होती.
 रशियाच्या ‘सोयुझ’ने १३९ वेळा मानव अंतराळात नेला व त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,  जमिनीवर उतरताना दोनदा ‘सोयुझ’ अपघातग्रस्त झाले व त्यात जीवितहानी झाली. आताच्या दुर्घटनेमुळे रशियाने मानवी मोहिमा स्थगित ठेवल्याने काही काळ  आंतरराष्ट्रीय स्थानकाकडे एकाही मानवाला पाठविता येणार नाही. कारण, अमेरिकेकडेही त्यासाठीचे यान नाही. पुढील वर्षी अमेरिकेतील दोन खासगी कंपन्या या प्रकारची याने प्रक्षेपित करणार आहेत. अर्थात, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील तीन अंतराळवीरांना सध्या तरी धोका नाही. कारण, त्यांच्याकडे सात-आठ महिने पुरेल एवढा अन्नधान्य, पाणी व इतर आवश्‍यक साधनसामग्रीचा साठा आहे. असे असले तरी या अपघातामुळे मानवी अवकाश मोहिमांविषयी मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. मानव अंतराळात पाठविण्यासाठी लागणारे प्रचंड मोठे अग्निबाण प्रत्येक वेळी ठीक काम करतील याची शंभर टक्के खात्री कोणीच देऊ शकत नाही. अंतराळातून उतरतानाही अंतराळवीरांच्या जिवाला विविध कारणांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. भारत येत्या काही वर्षांत मानवी अंतराळ मोहीम राबविणार असल्याने ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना अंतराळात झालेल्या विविध दुर्घटनांचा सखोल अभ्यास करूनच या मोहिमेची आखणी करावी लागेल. थोडक्‍यात, ‘सोयुझ’च्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून, भारतीय शास्त्रज्ञांना मानवी अवकाश मोहिमांची तयारी करावी लागेल.

Web Title: dr prakash tupe write soyuz rocket article in editorial