भविष्यवेध : कल्पनाविश्वाची अद्‌भुत सफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fantasy world

इंटरनेटच्या गुरुकिल्लीने जगातील ज्ञानाची कवाडे आणि माहितीचे साठे उघडण्याची संधी आपल्याला मिळाली. इंटरनेट युगातच जन्माला आलेली पिढी कर्ती होऊ लागली आहे.

भविष्यवेध : कल्पनाविश्वाची अद्‌भुत सफर

- डॉ. रवींद्र उटगीकर

इंटरनेटच्या गुरुकिल्लीने जगातील ज्ञानाची कवाडे आणि माहितीचे साठे उघडण्याची संधी आपल्याला मिळाली. इंटरनेट युगातच जन्माला आलेली पिढी कर्ती होऊ लागली आहे. आता जगाला वेध लागले आहेत पुढचे पाऊल टाकण्याचे. ‘मेटाव्हर्स’ असे या नवतंत्रज्ञानाचे नाव आहे. डिजिटल आणि शारीर जगात एकाच वेळी वावर करण्याची अनुभूती देऊ शकेल, अशा या आभासी विश्वाचा परिचय...

तुम्ही मँचेस्टर युनायटेडचे चाहते आहात आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला गोल करताना प्रत्यक्ष पाहून स्टेडियम डोक्यावर घेणाऱ्यांच्या गर्दीत तुम्हीदेखील सामील आहात...सिडनीच्या हार्बर ब्रिजवरून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातून पर्यटक जमा झाले आहेत आणि त्यांच्या बरोबर तुम्हीही त्या आतषबाजीचा मनमुराद आनंद लुटत आहात... मुलं परदेशी शिक्षण वा नोकरीनिमित्त गेल्याने तुम्हाला त्याची आठवण तीव्रतेने येत आहे आणि तत्क्षणी तुम्ही आमनेसामने बसून पत्त्यांचा डाव रंगवू लागला आहात... दिवास्वप्नेच वाटत असतील ना तुम्हाला ही सगळी? परंतु आजची स्वप्ने ही उद्याचे वास्तव असतात, असे म्हणतात. वर उल्लेख केल्यासारखी आपली अनेक स्वप्ने उद्या प्रत्यक्षात उतरणार आहेत. त्या वास्तवाचे नाव आहे मेटाव्हर्स!

नील स्टीफन्सन यांनी १९९२मध्ये;''स्नो क्रॅश’ या त्यांच्या काल्पनिक विज्ञान कादंबरीत ‘मेटाव्हर्स’ असा शब्दप्रयोग प्रथम केला होता. डिजिटल (मेटा) आणि शारीर (युनिव्हर्स) जगांना एकत्र आणणारी संकल्पना म्हणून तो शब्दप्रयोग त्यांनी केला होता. ‘ज्ञात विश्वापलीकडील’ असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. द्विमितीय इंटरनेट (वेब २.०) युगाची त्रिमितीय पुढची आवृत्ती (वेब ३.०) असे आपण याला म्हणू शकतो.

या त्रिमितिय विश्वातील आपला वावर इंटरनेटसारखा तटस्थ किंवा स्वतंत्र राहणार नाहीये. मोबाइल संच, संगणक किंवा गेमिंग कन्सोल अशी साधने वापरून आपण त्या विश्वात प्रवेश करू शकणार आहोत. जेवढे आपले कल्पनाविश्व तेवढे दरवाजे या विश्वात आपण उघडू शकू. खऱ्या जगातील प्रत्येक स्थळ आणि स्थिती तेथे आपल्यासमोर असेल. त्याची अनुभूती आभासी असली तरी त्यातील भावना वास्तविक असेल. त्याअर्थाने, हा नवा तंत्रमंच सर्व सीमा आणि अंतरे मिटवून टाकेल.

आभासीकरण हा मेटाव्हर्स युगाचा मूलाधार आहे. त्यातून येणारी अनुभूती ही अधिक खिळवून ठेवणारी आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी अशी अपेक्षित आहे. डिजिटल युगातील ते ‘अस्तित्व’ आणि त्यातील आपले ‘अवतार’ प्रत्यक्षाएवढेच खरे वाटावे, असा या आभासीकरणाचा प्रयत्न आहे. शारीर आणि डिजिटल परिघांमधील वावर हा एकाच वेळी करता यावा, अशा संकरित जगाची उभारणी यानिमित्ताने होऊ घातली आहे. हे तंत्रज्ञान अनेकार्थांनी वास्तवाशी जोडलेले असले, तरी प्रत्यक्षातील जगात सर्वसामान्यांना येणाऱ्या मर्यादा आणि निसर्गनियम यांच्या चौकटी मोडण्याची ताकद त्यात आहे. या मंचावर एखादा दुकानदार आभासी मालाचे दुकान, आभासी मालमत्ता असलेल्या जागेवर थाटू शकणार आहे. परंतु, आणखी एक पर्यायी मार्ग एवढेच या मंचाचे वैशिष्ट्य मर्यादित नसेल. त्यामुळे कंपन्या त्याकडे ग्राहक-अनुभवाचे वेगळे परिमाण म्हणून पाहत आहेत. त्यामध्ये फक्त ‘मेटाव्हर्स’वर उपलब्ध असतील अशी उत्पादने उपलब्ध करणे, ग्राहकांशी संबंधित माहितीसाठा संकलित करणे, सध्या उपलब्ध उत्पादने व सेवा यांचा प्रचार करणे, नव्या मंचावरील अर्थव्यवस्थेला पूरक भूमिका बजावणे आणि या मंचाच्या संभाव्य वापरकर्त्यांसाठी हार्डवेअर आणि अॅप्लिकेशन तयार करणे अशा संधी म्हणून कंपन्या पाहत आहेत. या मंचाची उभारणी सध्या ज्या टप्प्यावर आहे, ती तंत्रप्रगती आपल्या व्यवसायात सामावून घेण्यासाठी रिटेल विक्री, बँकिंग, वित्तसेवा या क्षेत्रांतील कंपन्या पुढे येत आहेत. गेमिंग, समाजमाध्यमे, डिजिटल मार्केटिंग, मनोरंजन आणि इ-व्यापार या स्वाभाविक लाभक्षेत्रांखेरीज शिक्षण, तंदुरुस्ती, क्रीडा, फॅशन, कला आदी क्षेत्रांतील व्यवसायालाही या आभासी माध्यमामुळे वेगळे परिमाण लाभेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

आभासी विश्वाचा भाग

या नवतंत्राची पूर्ण व्याप्ती अजून कोणी जाणून घेऊ किंवा देऊ शकले नसले, तरी त्याची चुणूक दाखवणारे तंत्रमंच सध्याही अस्तित्वात आणि काही तर विकासाच्या प्रगत टप्प्यावरही आहेत. क्लाउड कम्प्युटिंग हा यांपैकी एक. माहितीसाठा आणि प्रक्रिया या दोन्हींचा वास्तविक आणि गुंतवून ठेवणारा अनुभव या तंत्रज्ञानामुळे आपण घेऊ शकत आहोत. ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) ही वास्तवसीमेच्या दोन बाजूंना उपलब्ध असलेली तंत्रज्ञाने. त्यांपैकी पहिल्यात आपण ग्राफिक्सची जोड अनुभवताना वास्तवामध्ये वावरतो, तर दुसऱ्यात आपण आभासी विश्वात प्रवेश करताना जणू त्याचाच भाग होतो. एक्स्ट्रिम रिअॅलिटी (एक्सआर) हे त्याचे आणखी एक पुढचे रूप. त्यामध्ये वास्तविक आणि आभासी विश्व यांना संगणक / माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि विअरेबल्स यांनी एकत्र आणले जाते. यांपैकी ऑगमेंटेड रिअॅलिटीचे तंत्रज्ञान आपण मोबाइल संचांवर आजही अनुभवतो. युजर इंटरफेस (यूआय) आणि युजर एक्स्पीरिअन्स (यूएक्स) या शब्दावलीही आपण बरेचदा ऐकतो. त्यांपैकी एकातून डिजिटल पटलाचा संदर्भ दिला जातो, तर दुसऱ्यातून त्या पटलावरून होणाऱ्या अनुभूतीचा.

याखेरीज, ब्लॉकचेन ही तंत्रनोंदयंत्रणा आणि गेमिंग हे आभासी मनोरंजनाचे दालन यांचा परिचयही आपल्याला बहुधा असेलच. यांखेरीज, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) हे तर आपल्या आयुष्याशी सेन्सर, कॅमेरे, स्वचलित वाहने अशा रूपात जोडलेही जात आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सध्याच्या युगात सेमीकंडक्टरना मागणी वाढत आहे. तंत्रविकासामुळे त्यांचा आकारही कमी होत चालला आहे. त्यामुळे अधिकाधिक क्षेत्रांतील उपकरणे व साधने इटेक्ट्रॉनिक रूपात येत आहेत. कोणत्याही डिजिटल अनुभूतीसाठी हे सेमीकंडक्टर गरजेचे ठरतात. त्यात क्लाउड तंत्रज्ञान आले की डिजिटल कर्बोत्सर्ग आणि त्यातून उद्भवणारे प्रदूषण यांच्या समस्यांत भर पडणे स्वाभाविक ठरते. शिवाय, त्यासाठीची पायाभूत रचना म्हणून फायबर ऑप्टिक तारांची गरज वाढणार आहे. प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे मेटाव्हर्सचाही दुरुपयोग कसा होऊ शकतो, याविषयी आतापासून चिंता व्यक्त होत आहेत. त्या संभाव्य गैरवापरामुळे समाजापुढे उभी राहणारी आव्हाने गंभीर स्वरूपाची असतील, असे मानण्यास ठोस कारणेही आहेत. तंत्रज्ञानाचे असे गैरवापर सध्याही होतात. उदाहरण द्यायचे तर ब्लॉकचेनचा वापर ओळख लपवून अमली पदार्थांच्या व्यापारासाठी केला जातो. समाजमाध्यमांतील एन्क्रिप्शनचा उपयोग जसा सुरक्षित आणि खासगी संवादासाठी होतो, तसाच तो वापर संघटित गुन्हेगारीसाठीही केला जातो.

मेटाव्हर्सचा वापर कोण व कसा करेल, ते कोण व कसे नियंत्रित करू शकेल आणि त्यावर देखरेख कोणाची राहील, असे काही कळीचे प्रश्न आहेत. मेटाव्हर्सची बाजारपेठ २०३०पर्यंत आठ ते तेरा हजार अब्ज डॉलरची असेल, व पाच अब्ज लोक या तंत्रमंचाचा वापर करत असतील असा अंदाज ''मेटाव्हर्स अँड मनी : डिक्रिप्टिंग द फ्युचर’ या अहवालात सिटीबँकेने व्यक्त केला आहे. हे आकडे पाहिले, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात सध्या आघाडीवर असलेली प्रत्येक कंपनी या नव्या तंत्रमंचामध्ये का रस घेत आहे, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते. ‘मामा’ या लघुरूपाने परिचित असलेल्या मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, अॅपल, मेटा (फेसबुक) आणि अल्फाबेट (गुगल) या सर्वांना यात आपले भविष्य दिसत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय कंपन्याही बाजारपेठेतील संधी पडताळून पाहत आहेत.

या हालचाली पाहता, ‘मेटाव्हर्स’ फार दूरची बात राहिलेली नाही, असे म्हणता येईल. त्यामुळे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपले जिवलग आपल्यापासून दूर गेले असतील किंवा ‘आयुष्यात एकदा तरी’ च्या यादीतील संकल्प, भौगोलिक अंतर आणि आर्थिक उडी मारण्याच्या मर्यादांमुळे पूर्ण होत नसतील तर थोडी वाट पहा. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज होत आहे एक कल्पनेपलीकडची दुनिया.. मेटाव्हर्स!

(लेखक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Dr Ravindra Utagikar Writes Fantasy World Internet Metaverse Digital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..