जगण्याचं सार्थक 

जगण्याचं सार्थक 

सकाळी लवकर उठण्यासाठी रोज रात्री तुम्ही घड्याळाला गजर लावून झोपता. आपल्यातली बरीच मंडळी दुसऱ्या दिवशीची रूपरेषासुद्धा आखून ठेवतात. दुसऱ्या दिवशी घालायचे कपडे, कामाची यादी, भेटणाऱ्यांची यादी इत्यादी रोज डोळा लागेपर्यंत मनात पिंगा घालत असतात आणि इतकं नियोजन करूनही समजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलाच नाहीत तर? ही शक्‍यता आहे काय? नक्कीच आहे. कोण किती दिवस जगणार हे कुणालाच माहीत नाही. मग तो जायचा दिवस आजची रात्रही असू शकते; पण असा विचार आपण सहसा करत नाही. आपल्या आसपास बऱ्याच घटना घडत असतात. अपघात, नैसर्गिक संकटे, दहशतवाद, आजार आणि अगदी तरुणवयातही होणारे हृदयरोग; परंतु यातलं काहीही आपल्याला कधीही होऊ शकतं, असा विचार सहसा कुणीच करीत नाही. 

पण हे होऊ शकतं आणि तुम्हाला कळलं, की उद्याचा दिवस खरंच तुमचा शेवटचा आहे, तर तुम्ही आज सकाळी उठल्यावर काय कराल? 

जीवन हे मर्यादित आहे; परंतु त्यात आनंदाची, यशाची संधी अमर्यादित आहे. त्या अमर्यादित आनंदाचा, यशाचा आस्वाद तुम्ही घेत आहात काय? आणि जर अजूनही तुम्ही तो आस्वाद घेतलेला नाही, तर मग तुम्ही कशाची वाट बघताहात? 

आपण दुसऱ्यांच्या यशाकडं बघतो आणि मनात कुठंतरी हळहळतो. त्यांच्या यशाला, आनंदाला नशिबाचं नाव देऊन मोकळे होतो; पण त्यांनी जो प्रत्येक बाबतीत उच्च स्थान गाठण्याचा निर्धार मनाशी केला आहे, त्याकडे आपण जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. कारण तितकी मेहनत करायची आपली तयारी नाही. मग आपण मध्यम प्रतीचे, सर्वसाधारण राहिलो तरी आपल्याला चालतं. 

नात्यांमध्ये गडबड असली, मुलांच्या वागणुकीत हळूहळू होणारा फरक दिसत असला, किंवा हातातल्या नोकरीत मन रमत नसेल, तरी आपण त्याबद्दल काही करीत नाही. कुठल्यातरी काल्पनिक ‘उद्या’मध्ये कुठलातरी काल्पनिक चमत्कार होऊन एक दिवस सगळं आपोआप बरोबर होईल, अशा भ्रामक आशेवर आपण सगळं टिकवून ठेवतो; पण समजा तो ‘उद्या’ आलाच नाही तर? आज सकाळचं जाग येणं किती महत्त्वाचं आहे, हे आपल्याला का जाणवत नाही? कारण प्रत्येक रात्री झोपल्यावर सकाळी जाग येणं हे सगळ्यांच्याच नशिबी नसतं. मला आज सकाळी जाग आली, हाच एक मोठा चमत्कार आहे, असं मला प्रत्येक सकाळी प्रकर्षानं जाणवलं, तर कदाचित मी प्रत्येक दिवसाला एक अनमोल संधी समजेन. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा एक अनमोल संधीचा असेल, तर मी प्रत्येक दिवशी आनंद आणि यश याबाबत कुठल्याही कारणासाठी तडजोड करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com