राग कुणावर?

scolding
scolding

तुम्हाला राग येतो काय? वारंवार येतो की कधी कधी? थोडाच असतो की कुणालातरी मारावे इतका? छोट्या-छोट्या कारणांवरून येतो की बराच संयम ठेवल्यानंतर बांध फुटतो? आणि आला तसा लगेच जातो की डोक्‍यात बसतो? मुख्य प्रश्न हा आहे की तुम्हाला राग येतो काय? आणि येतो तर त्या रागाचे कारण काय?

थोडा विचार करा. कारण वरकरणी पाहता तुमच्या प्रत्येक वेळेच्या रागाचे कारण कुणी तरी दुसरी व्यक्ती असल्याचा तुम्हाला भास होईल. तुम्ही म्हणाल "भास कसला? मी शांत, समजूतदार आहे. लोकच असे वागतात की राग येतोच आणि राग व्यक्त केल्याशिवाय कुणाला समजतही नाही. मुलं ऐकत नाहीत, बायको वेंधळी आहे, ऑफिसात एक व्यक्ती धड काम करत नाही...' असे काहीसे तुमचेही विचार असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

आता काही प्रश्न तुमच्यासाठी. मुलांवर रागावता तेव्हा त्याचं नेमकं कारण काय असतं? मुलं अभ्यास करत नाही हे? की त्यांचे मार्क तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसतात म्हणून? की पुढे त्यांचं आयुष्य चांगलं होणार नाही ही भीती? की आपण इतकी मेहनत करून मोठी फी भरतो याची त्यांना कदर नाही? की तुमच्या भावाच्या वा मित्राच्या मुलाने चांगले मार्क मिळविले, पण तुमच्याकडे तुमच्या मुलाबद्दल वाखाणण्यासारखं काही नाही म्हणून? की दिवसभर कामावरून थकून आल्यावर रोज बायको मुलांची तक्रार करते याचं फ्रस्ट्रेशन आणि चिडचिड? की स्वतःच्या कामात तुम्ही स्वतःला "ऑर्डिनरी' समजता आणि रोज कुठलीतरी नकारात्मकता घेऊन घरात येता?

विचार करून खरंखुरं उत्तर द्या एकदा स्वतःला. कारण वरील कुठलंही कारण तुमच्या मुलाचं हित लक्षात घेऊन तुमच्या रागाचं निराकरण करीत नाही. मुलाच्या प्रगतीची आणि त्याच्या भविष्याची चिंता असेल तर तुम्ही त्याच्याजवळ बसून त्याची नेमकी काय समस्या आहे ते समजून घेऊन त्यावर उपाय कराल. अगदी आळसापोटी तो करत नाही हेसुद्धा कारण असलं तरी त्यावर उपाय आहे. स्वतः किंवा कुणा ट्यूटरला त्याच्याबरोबर रोज दोन तास बसवून त्याच्याकडून करवून घेता येईल आणि त्याला जमतच नाही हे लक्षात आलं तर तो विषय सोपा कसा करायचा किंवा त्याचा कोर्स बदलण्याचा उपाय करता येईल.

परंतु, या सर्व उपायांना वेळ, संयम आणि मेहनत लागते. त्यापेक्षा ओरडणं सोपं आहे. कारण तुम्ही मग सगळा दोष मुलांना, पत्नीला, शाळेला किंवा नशिबाला देऊन मोकळे होऊ शकता. तीच तुमची इच्छा असेल तरी हरकत नाही, पण कमीत कमी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुमच्या रागाचं कारण कुणी दुसरं नसून तुम्ही स्वतः आहात आणि म्हणून रागावल्यावर त्रासही तुम्हालाच होतो आणि नाती बिघडतात ते वेगळंच. प्रत्येकवेळी राग कमी झाल्यावर तरी आपल्या रागाचं असं विश्‍लेषण करून बघा. कालांतरानं राग आपोआप कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com