प्रेम म्हणजे?

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

त्याला मार्क कमी पडले किंवा त्याच्या हातून काही चूक झाली तर त्याला प्रेमानं जवळ घेणं, त्याला समजावणं, त्याच्या समस्या समजावून घेणं आणि त्याला प्रेरित करण्याइतका संयम आणि सहनशीलता आपल्यात नाही आणि कदाचित म्हणूनच आपल्याला मोठ्यानं सांगावं लागतं आहे की आमचं आमच्या मुलांवर प्रेम आहे

फारच गोंधळात टाकणारा काळ आहे आजचा. पूर्वी चार भिंतींच्या आड लपलेल्या "प्रेम' या शब्दाचा सध्या चारी बाजूंनी जप केला जातोय. तेरा- चौदा वर्षांची मुलं- मुली आम्ही प्रेमात पडलोय, म्हणून जगाशी भांडताहेत, तर आई-वडील "आम्ही आमच्या मुलांवर खूप प्रेम करतो,' अशी घोषणा करताहेत. "माझ्या देशावर माझं खूप प्रेम आहे' या आशयाच्या सोशल मीडिया पोस्टना उधाण आलं आहे आणि मुक्‍या जनावरांच्या प्रेमापोटी तर माणसाला मारलं जात आहे. जगात प्रेमाला जसं काही उधाण आलं आहे.

आणि तरीही आत्महत्या करणाऱ्यांची आणि दुसऱ्यांना दुखावणाऱ्यांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. अशा वेळी थोडं थांबून विचार करणं महत्त्वाचं नाही काय?

घरापासूनच सुरवात करू. आई- वडिलांचं प्रेम. प्रत्येक पालकाचं आपल्या अपत्यावर प्रेम आहे याबद्दल शंकाच नाही. परंतु, नेमकं हे प्रेम म्हणजे काय? आज सुखवस्तू पालकांना वाटतं की जगातल्या सर्व सुखसोई मुलांना देणं म्हणजे प्रेम, त्यांना सर्वात महागड्या शाळेत आणि ट्यूशनला पाठवणं म्हणजे प्रेम, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याच्या आधी त्यांना हवं त्यापेक्षा जास्त देणं हे प्रेम. परंतु, थोडावेळ रोज त्याच्या शेजारी बसून प्रेमानं त्याच्या गोष्टी ऐकायला मात्र आपल्याकडे वेळ नाही. त्याला मार्क कमी पडले किंवा त्याच्या हातून काही चूक झाली तर त्याला प्रेमानं जवळ घेणं, त्याला समजावणं, त्याच्या समस्या समजावून घेणं आणि त्याला प्रेरित करण्याइतका संयम आणि सहनशीलता आपल्यात नाही आणि कदाचित म्हणूनच आपल्याला मोठ्यानं सांगावं लागतं आहे की आमचं आमच्या मुलांवर प्रेम आहे.

आता ही मुले बघा. लहानपणापासून त्यांना कुठल्या न कुठल्या स्पर्धेत उतरविलेलं असतं. शाळेत, घरात, सोशल मीडियावर आणि मित्रांमध्येही मार्क, वस्तू, फोटोवर किती "लाइक्‍स' आहेत, घड्याळ कुठल्या ब्रॅंडचं आहे आणि मोबाईलचा कॅमेरा किती पिक्‍सेलचा आहे अशा अंत नसलेल्या स्पर्धेला ते रोज तोंड देतात. कुणी अभ्यासात चांगला असेल, तर "फेसबुक'वर मित्र नाही म्हणून, तर कुणी दिसायला आकर्षक असेल, तर मार्क नाही म्हणून... जवळपास सर्वच मुलं न्यूनगंडानं ग्रासलेली असतात. स्वतःही कुठल्यातरी न्यूनगंडानं ग्रासलेले पालक त्यांच्यात आत्मविश्वास किंवा स्वतःबद्दल प्रेम आणि आदर वाढविण्याबद्दल सजग नसतात. बाहेरच्या जगात जो कोणी त्यांच्या भावनिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करेल त्याच्याकडे ही मुले आकर्षित होतात नि त्यालाच ती प्रेम असं नाव देतात.
स्वतःवर कुणाचंच प्रेम नाही आणि खऱ्या प्रेमाला लागणारा वेळ आणि संयम कुणाकडेच नाही. म्हणून सगळे एकटे आहेत आणि वारंवार दुःख भोगताहेत. आपल्याच घरापासून आपण खऱ्याखुऱ्या प्रेमाची सुरवात करू शकतो काय?

Web Title: dr sapna sharma writes about love