खारीचा वाटा (पहाटपावलं)

shrikant chorghade
shrikant chorghade

गेली काही वर्षे कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा पावसाळा यामुळे होणारी नापिकी यामुळे बळिराजा व्यथित झाला आहे. काही गाव सोडून पोटापाण्यासाठी शहराकडे वळले आहेत, तर काहींनी स्वतःला संपवलं आहे.

ही समस्या जटिल आहे. त्यासाठी शेततळी, "पाणी अडवा, पाणी जिरवा' अशा योजनांमधून सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय आपापल्या परीने या कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या बऱ्याच संस्था व व्यक्ती आहेत. अशांपैकी नागपूरमधील दांपत्य सचिन व भाग्यश्री देशपांडे. त्यांच्या संस्थेचं नाव "विकल्प'. याच्या अंतर्गत "अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल' ही शाळा चालवली जाते. ती 2010 मध्ये सुरू झाली. भाग्यश्रीचे वडील डॉ. प्रकाश गांधी हे "वेस्टर्न कोल फिल्ड'मध्ये नोकरीला होते. तेथून निवृत्ती स्वीकारून त्यांनी शेतीच्या गावी ही शाळा सुरू केली. नागपूरपासून 40-45 किलोमीटरील त्यांचं कोची फाट्यावरचं बावनगाव. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत आसपासच्या 18 गावांतून शेतकऱ्यांची व शेतमजुरांची मुलं-मुली शिकतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची पाचव्या वर्गापर्यंत मान्यता मिळाली आहे.

या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रमाबरोबरच शेती व पर्यावरण या विषयांची माहिती वयानुसार दिली जाते. बियांची, झाडांची, कीटकांची ओळख करून दिली जाते. पाऊस कसा मोजायचा, खत कसं तयार करतात, जिवामृत कसं तयार करतात याची माहिती व प्रात्यक्षिके दाखवली जातात. शाळेत गावांमधील पदवीधर झालेली 21 मुलं येथे शिक्षक आहेत. थोड्या मोठ्या मुलांना छोटे वाफे तयार करून त्यात मेथी, पालक यांची पेरणी, निगा शिकविली जाते. चाळीस गाई असलेली गोशाळा आहे. जनावरांची, त्यांच्या खाद्याची, त्यांच्या निगराणीची शास्त्रोक्त माहिती मुलांना दिली जाते. शाळेची पटसंख्या 275 आहे.

भाग्यश्री व सचिन इंजिनिअर आहेत. भाग्यश्रीचे पणजोबा अप्पाजी गांधी हे समाजसेवक होते. त्यांचे नातू प्रकाश यांनी तो वारसा उचलला. त्यांच्याकडून भाग्यश्रीने तो वसा घेतला. तिचे यजमान सचिन त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग शेतीच्या शिक्षणासाठी करण्याचं आव्हान स्वीकारून भाग्यश्रीच्या कार्याशी स्वत:ला जोडून घेतलं. सचिनच्या कुटुंबालाही समाजसेवेचा वारसा आहे. सचिनचे आजोबा बाळासाहेब देशपांडे हे मध्य प्रदेशातील वनवासी कल्याणाश्रमाचे अध्यक्ष व सक्रिय कार्यकर्ते होते.

सजगपणे, डोळसपणे, शास्त्रीय पद्धतीने शेती करणारी सुशिक्षित, सुसंस्कृत अशी या परिसरातील शेतकऱ्यांची व शेतमजुरांची पिढी घडावी हे या दांपत्याचं स्वप्न आहे. समाजभान ठेवून वेगळ्या वाटेनं देशप्रेमाचा आविष्कार त्यांनी आपल्या कार्यातून दाखवला आहे. देश सुजलाम्‌ सुफलाम्‌ होण्यासाठी तळागाळातील मेहनती शेतकरी व शेतमजूर यांच्या उत्थानासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा न ठेवता आपला खारीचा वाटा त्यांनी समाजासाठी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com