पहाटपावलं : जिद्दी जिज्ञासा 

पहाटपावलं : जिद्दी जिज्ञासा 

जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात चित्रविचित्र घटना घडल्या होत्या. त्या घटनांनी नाउमेद न होता त्यातून नवी ऊर्जा घेऊन जिद्दीने जिज्ञासा उभी राहिली आणि समदु:खी व्यक्तींसाठी तिनं चळवळ व संस्था उभी केली. 

जिज्ञासा बी.ए.च्या द्वितीय वर्षाला असताना अठराव्या वर्षी तिची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. तिच्या आई-वडिलांनी अथक प्रयत्न केले; पण काही निष्पन्न झालं नाही. तिला "रेटीनायटीस पिगमेंर्टाझा' ही नेत्रपटलाची व्याधी झाली होती. हा दुर्धर आजार आहे व त्यासोबत आपल्याला उर्वरित आयुष्य जगायचं आहे, या सत्याचा स्वीकार करायला पाच वर्षे गेली. इतर दृष्टिहीन व्यक्ती जन्मांध असतात, आपल्याला निदान काही वर्षे जग बघता आलं, वाचन करता आलं, अभ्यास करता आला, हा सकारात्मक दृष्टिकोन तिला ऊर्जा देऊन गेला. तिची आई हेमा व वडील अरुण कुबडे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जिज्ञासाची जिद्द, आईचं मार्गदर्शन व वडिलांचा आधार यामुळे तिनं कौशल्यविकासाची कास धरली. ती कंठसंगीत व हार्मोनिअम शिकली. योगासनं शिकून योगशिक्षणाची परीक्षा दिली. बी. ए. चं शिक्षण सोडलं. पण फावल्या वेळात नागपुरातील रेखा अभ्यंकर यांनी सुरू केलेल्या मतिमंद मुलांसाठीच्या मे फ्लॉवर शाळेमध्ये तिनं सात वर्षे अध्यापन केलं. या मुलांनी तिचा आत्मविश्‍वास वाढायला मदत झाली. मधल्या काळात बाबा आमटे यांच्या "आनंदवना'तील रुग्णांना तिला ज्ञात असलेल्या उपचारांचा लाभ दिला. 

तिनं 2012मध्ये "आत्मदीप सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण, कलाशिक्षण व जगण्याची उभारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य ही संस्था करते. दृष्टिहीनांसाठी संगणकाशी निगडित अभ्यासक्रम संस्थेनं सुरू केले. तिच्या संस्थेमधून प्रशिक्षित झालेल्या अनेकांना शिक्षण क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. दृष्टिहीन व्यक्तींमधील कलागुणांना वाव देण्यासाठी "आत्मदीप सरगम' हा सांगीतिक ग्रुप तिनं तयार केला आहे. दृष्टिहीन मुलां-मुलींना संस्थेमध्ये क्रिकेट व बुद्धिबळाचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय स्वयंपाक, झाडलोट याचंही प्रशिक्षण दिलं जातं. संसारासाठी आवश्‍यक असलेल्या या कला शिकविल्यानं त्यांचा आत्मविश्‍वास वाढायला मदत होते. तिच्या गुणांची कदर करून शेतकरी कुटुंबातील योगेश्‍वर चवलढाल याने पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. त्यांच्या सक्रिय साथीमुळे जिज्ञासाचा उत्साह व कार्यक्षेत्र वाढायला मदत झाली आहे. जिज्ञासाच्या झंझावाती जीवनसंघर्षाला सलाम! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com