
संस्कृत भाषा महत्त्वाची भाषा आहे. तिच्यात महत्त्वाचा प्राचीन इतिहास दडलेला आहे. ती अभिजात भाषा आहे. परंतु, ती मराठी भाषेची जननी भाषा नाही. मराठीचा पहिला शिलालेख इ.स.पू. पहिल्या शतकातील आहे.
मराठीवर अन्याय का?
दहाव्या शतकात देखील मराठी भाषा दखलपात्र होती त्याचा प्रत्यय कर्नाटकच्या काही भागात हिंडताना येतो. अशाच एका प्रवासाच्या निमित्ताने नोंदवलेली निरीक्षणे.
तमिळनाडूतील वेल्लोर येथील सुप्रसिद्ध अशा ‘व्हीआयटी’ (Vellore Institute of Techonology) संस्थेत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी जाताना वाटेत दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरे येथील शहाजीराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर हळेबिडू येथील होयसाळांच्या राजधानीचे अवशेष, अर्थात होयसाळेश्वराचे मंदिर, बेलूर येथील मंदिर पाहून आम्ही श्रवणबेळगोळ येथील अखंड पाषाणात कोरलेली गोमटेश्वर तथा बाहुबलीची मूर्ती पाहिली. मूर्ती रेखीव असून ती ५८ फूट उंचीची आहे. बाहुबलीची अखंड पाषाणातील मूर्ती अत्यंत प्रभावशाली आहे. ही मूर्ती इसवी सनाच्या दहाव्या शतकातील असून ती दक्षिणेतील गंग साम्राज्याचा दिवाण चामुंडरायाने तयार करून घेतलेली आहे.
मूर्तीच्या भोवतीचे बांधकाम आणि तीर्थंकरांच्या मूर्ती होयसाळ राजाच्या दिवाणाने तयार करून घेतलेल्या आहेत. मूर्तीच्या पायाजवळ असणारे शिलालेख तत्कालीन राज्यपद्धती, संस्कृती, धार्मिक श्रद्धा, कला यांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. बाहुबलीच्या मूर्तीच्या पायावर तमीळ, मराठी आणि कन्नड भाषेत शिलालेख आहेत, ही बाबही उल्लेखनीय. बाहुबलीची मूर्ती असणारे श्रवणबेळगोळ हे ठिकाण आताच्या कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आहे. हा भाग दक्षिण कर्नाटकात येतो. याचा अर्थ त्या भागात जसा कन्नड, तमीळ भाषेचा प्रभाव होता, तसाच मराठी भाषेचा देखील प्रभाव होता, हे स्पष्ट होते. तेथील तत्कालीन राजांना तमीळ, कन्नड बरोबरीने मराठी भाषेत देखील शिलालेख कोरण्याची आवश्यकता भासण्याचे कारण म्हणजे मराठी भाषेचा प्रभाव. दहाव्या शतकातदेखील दक्षिणेत मराठी भाषा दखलपात्र होती, हे स्पष्ट होते.
‘चामुंडराये करविले, गंगराये सुत्ताले करविले’ हाच तो मराठी भाषेतील दहाव्या शतकातील शिलालेख. बाहुबलीच्या उजव्या पायावर तमीळ, डाव्या पायाच्या उजव्या बाजूला मराठी, तर डाव्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. तमीळ आणि कन्नड भाषेच्या मध्यभागी मराठी भाषेतील शिलालेख आहे. यावरून असे दिसते, की मराठी भाषा ही तमीळ आणि कन्नड भाषेची भगिनी भाषा आहे. मराठी भाषेचा भाषिक अनुबंध दक्षिण भाषेशी आहे. अशा आशयाची मांडणी नामवंत भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर, डॉ. घाटगे, डॉ. अशोक राणा यांनी केलेली आहे. त्यांच्या मतानुसार ‘मराठी भाषा ही प्राकृतपासून विकसित झालेली आहे, संस्कृतपासून नाही.’
संस्कृत भाषा महत्त्वाची भाषा आहे. तिच्यात महत्त्वाचा प्राचीन इतिहास दडलेला आहे. ती अभिजात भाषा आहे. परंतु, ती मराठी भाषेची जननी भाषा नाही. मराठीचा पहिला शिलालेख इ.स.पू. पहिल्या शतकातील आहे. तो पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाले येथे सापडलेला आहे; तर संस्कृत भाषेतील पहिला शिलालेख इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील रूद्रदामनचा गिरनार येथे सापडलेला आहे. याचा अर्थ संस्कृतच्या शिलालेखापूर्वी सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा जुना शिलालेख मराठी भाषेतील आहे. संस्कृत भाषेबद्दल आदर बाळगूनही स्पष्टपणे म्हणावे लागते की, मराठी भाषा देखील संस्कृत भाषेप्रमाणेच अभिजात भाषा आहे.
महान भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे हे मराठी भाषेचा सहसंबंध ‘द्रविडियन भाषा’ गटाशी जोडतात. खैरे यांच्या मताला भक्कम पुरावा आपणास श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर तथा बाहुबलीच्या पायाशी असणाऱ्या तमीळ, मराठी आणि कन्नड भाषेतील शिलालेखात मिळतो. दक्षिण भारतात दखल घ्यावी इतकी मराठी भाषा प्रभावशाली आहे. ती जनसामान्यांची लोकभाषा आहे. ती तमीळ, कन्नड भाषेची भगिनीभाषा आहे. मराठी भाषा सातवाहन काळात आहे. हे पाले येथील शिलालेखावरून (इ.स.पू. पहिले शतक) स्पष्ट होते. ती राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंम, शिवाजीराजे यांच्या काळातील प्रभावशाली मुख्य भाषा आहे. ती चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, चोखोबा, सावता, तुकोबा ते ज्योतिबा यांची भाषा आहे. ती लोककल्याणकारी, लोकभाषा आहे. ती अभिजात भाषा असल्याचे सुमारे दोन हजार वर्षांपासूनचे पुरावे आहेत. पाले आणि श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावरून ती अभिजात भाषा असल्याचा भक्कम पुरावा आहे.
या भाषावृद्धीसाठी जैनधर्मीयांचे मोलाचे योगदान आहे. बाहुबलीचा शिलालेख मराठी अभिजात भाषा असल्याचा दहाव्या शतकातील खणखणीत पुरावा आहे. भगिनी भाषेतील तमीळ- कन्नड भाषांना अभिजात भाषांचा दर्जा भारत सरकारकडून मिळालेला आहे. परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. हा मराठीवर अन्याय आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची उदासीनता, केंद्र सरकारचा दृष्टिकोन यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव करण्याची संधी केंद्र सरकारने दवडू नये.