अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

dr uma kulkarni
dr uma kulkarni

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा असावी. अठराव्या शतकाच्या अखेरीस सगळ्याच भारतीय भाषांमध्ये भाषांतराचं युग आलं होतं. इंग्लिश, बंगाली, संस्कृत भाषांमधून अनुवाद करून आपापल्या भाषेतलं साहित्य आणि साहित्यप्रकार साकारण्याचा तो प्रयत्न होता. स्वातंत्र्योत्तर काळात काही संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर भारतीय भाषांमधल्या आदान-प्रदानाच्या उपक्रमाला चालना दिली. भरीव कामही केलं.तरीही ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवी होती त्या प्रमाणात पोचली नाही.

ऐंशीच्या दशकात काहीशा बदलाला सुरवात झाली. सुरवातीला ‘अनुवादित साहित्याला शिळेपणाचा वास येतो...’ म्हणणारे प्रकाशक-वाचक आवर्जून अनुवादित साहित्य उचलू लागले. काही मान्यवर प्रकाशकांनी तर अनुवादावरच लक्ष केंद्रित केलं. बघता बघता अनुवादाचा प्रवाह धो धो वाहू लागला.या पुस्तकांमध्ये प्रामुख्यानं इंग्लिश पुस्तकांच्या अनुवादाची संख्या बरीच आहे. त्या तुलनेत (काही अपवाद वगळता) भारतीय भाषांमधली पुस्तके कमी आढळतात. काही प्रकाशक इंग्लिश भाषेतल्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकांचे हक्क घेऊन ते आपल्या अनुवादकांकडून अनुवादित करून घेतात आणि लगोलग प्रकाशित करतात. कदाचित इंग्लिश भाषेमुळे त्यांना तिथपर्यंत पोचणं सहज शक्‍य होतं. इतर भारतीय भाषांमधील साहित्याच्या संदर्भात ही तत्परता काम करताना दिसत नाही. हे का होत असावं? एक सरळ सरळ कारण म्हणजे त्या भाषांमध्ये काय लिहिलं जातं, याविषयी प्रकाशकच अनभिज्ञ असतात. त्यामुळे ही जबाबदारी आपसूक अनुवादकावरच येऊन पडते. भारतातल्या सर्वच प्रदेशांच्या चतु:सीमा एकमेकांना भिडलेल्या असतात. या ‘मिलन-भागा’त द्विभाषिक (सोलापूरसारख्या काही ठिकाणी तर तीन-चार भाषा जाणणारी) माणसं सहजच मिळू शकतात. यातली बरीच माणसं साहित्यप्रेमीही असतात आणि ती दोन्ही भाषांमधलं साहित्य वाचत असतात. अनुवाद करायची इच्छा असणारेही इथे बरेच असतात. ते आपापल्या परीनं लहान-मोठे अनुवाद करत असतात. देशभरातली ही सारी अनुवाद-शक्ती नीट वापरली गेली, तर कदाचित ही त्रुटी राहाणार नाही. अनुवादकांना कशाचा अनुवाद करावा हा प्रश्न पडत असतो. मग काही कमकुवतीचे लेखक त्यांच्याशी संधान बांधतात. त्या लेखकांना आपलं पुस्तक दुसऱ्या भाषेत गेल्याचा आनंद मिळतो. पण त्यामुळे साने गुरुजींना अपेक्षित असलेलं आंतरभारतीचं स्वप्न साकार होत असेल काय, हा खरा प्रश्न आहे! त्यामुळे या अनुवादकांवर परिश्रम घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं आवश्‍यक आहे. या अनुवादकांची साहित्यिक जाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

स्वत: अनुवादकानंही काही बाबतीत इतरांवर अवलंबून न राहता जागरूक राहणं जरूरीचं आहे. दोन्ही भाषांतल्या साहित्यावर अनुवादकाची नजर लागते. हे असेल तरच त्याला आपल्या भाषेत कशाची त्रुटी आहे आणि काय अनुवादित केल्यामुळे आपण ती त्रुटी भरून काढू शकू, हे समजू शकते. अनुवादक केवळ स्वत:च्या आवडी-निवडीवर किंवा विचारसरणीवर लुब्ध राहिला की तो सर्व प्रकारच्या साहित्याला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यानं स्वत:ला वैचारिकदृष्ट्या मोकळं ठेवायला पाहिजे. तरच त्याच्याकडून विविध प्रकारचं साहित्य अनुवादित होऊ शकतं. नाहीतर तो विशिष्ट विचारसरणीचाच अनुवादक होऊन राहायची भीती असते. अशा अनुवादकांचा वापर विशिष्ट विचारसरणीचे तथाकथित विचारवंत करून घेताना दिसतात आणि याला बळी पडलेला अनुवादक आपल्या हाती असलेल्या एकमेव स्वातंत्र्याचा नाश करून घेतो.

अनुवादकांची साहित्यिक जाण वाढवली पाहिजे, तसंच अनुवादाची गुणवत्ताही कस लावून तपासून घेतली पाहिजे. दोन भाषा बोलता येणं वेगळं आणि लेखन करणं वेगळं. लिखित भाषेची वेगळ्या प्रकारे मशागत करायला पाहिजे. अनुवादकाचा सुरवातीचाच एखादा अनुवाद अशा कठोर परीक्षेतून तावून-सुलाखून बाहेर पडला तर एक चांगला अनुवादक कायमसाठी तयार होतो. चांगलं साहित्य उत्तम प्रकारे अनुवादित होऊन आलं तरीही वाचकांकडून त्यांचं स्वागत कसं होईल, हा प्रश्न राहातोच. त्यासाठी प्रकाशक आणि प्रसारमाध्यमं यांनी पावलं उचलणं आवश्‍यक आहे. ‘अमूक एक महत्त्वाचं पुस्तक मराठीच्या प्रांगणात प्रवेश करत आहे,’ ही बातमी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोचली, तर उत्तम साहित्यासाठी हपापलेला सुजाण वाचक तिचा अव्हेर करत नाही. तसे झाले तरच आंतरभारतीची संकल्पना पूर्ण होऊन एकूणच भारतीय साहित्याचा आवाका लक्षात येण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com