
भाष्य : भारतकेंद्री शिक्षणाची संकल्पना
‘एनसीईआरटी’ने नुकताच भारतकेंद्री शिक्षणावर भर असलेला शालेय शिक्षणाचा ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ प्रसृत केला आहे. यामागचा विचार नेमका काय आहे, हे या निमित्ताने समजून घेणे शिक्षणातील सर्वच घटकांसाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘भारतकेंद्री शिक्षण’ या संकल्पनेचा धावता आढावा.
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून इतिहास आणि विज्ञानाचा काही भाग वगळल्यामुळे प्रसारमाध्यमांत तीव्र पडसाद उमटले होते. एनसीईआरटीने नुकताच भारतकेंद्री शिक्षणावर भर असलेला शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रसृत केला आहे. लवकरच अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकेसुद्धा तयार होतील. अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर चर्चा पुन्हा जोरकसपणे सुरू होईल. या पार्श्वभूमीवर ‘भारतकेंद्री शिक्षण’ या संकल्पनेचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
भारताचा समृद्ध प्राचीन ज्ञानवारसा आणि लोकसंस्कृती यांची घटनात्मक मूल्ये आणि जागतिक पातळीवरील विकास यांच्याशी सांगड घालून भारत ज्ञानाच्या क्षेत्रातील एक नेतृत्व म्हणून तयार व्हावा, या दृष्टीने, जिच्यात भारतीय जीवनमूल्ये प्रतिबिंबित झाली असतील अशी स्वदेशी शिक्षणपद्धती म्हणजे ‘भारतकेंद्री शिक्षण’, असा अर्थ ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०’मध्ये दिलेला आहे.
प्राचीन व मध्ययुगीन काळात गणित, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, योग, व्याकरण, धातुशास्त्र, वास्तुकला, वैद्यकशास्त्र, जहाजबांधणी, नौकानयन या क्षेत्रांत भारताने खूपच प्रगती केली होती. संगीत, नृत्य, शिल्प आदी कला विकसित झाल्या होत्या.
अभिजात साहित्य, तसेच लोकसाहित्याच्या अतिशय समृद्ध परंपरा निर्माण झाल्या होत्या. धनुर्विद्या, कुस्ती, मल्लखांब, बुद्धिबळ, फाशांचे खेळ या भारताच्याच देणग्या आहेत. ब्रिटिशांच्या काळात भारतीय ज्ञानपरंपरा क्षीण होत गेली. मात्र याच काळात काही विचारवंतांनी देशाचे स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा, बहुजनांचे शिक्षण, आपल्या आध्यात्मिक विचारांवर आधारलेल्या शिक्षणाचा प्रसार अशा वेगवेगळ्या प्रेरणांतून आधुनिक ब्रिटिश शिक्षणपद्धती आणि आणि राष्ट्रीय विचार यांची सांगड घालून शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था स्थापन केल्या. या सर्व प्रयत्नांमागील भारतीयत्वाचा विचार नीट अभ्यासून तो आजच्या शिक्षणप्रवाहांशी जोडायला हवा.
नवीन शैक्षणिक धोरणात भारतकेंद्री शिक्षणाचा पुरस्कार होण्यापूर्वी ‘महाराष्ट्राच्या अभ्यासक्रम आराखडा-२०१०’ मध्येही भारताला केंद्रस्थानी ठेवून अभ्यासविषयांची संतुलित पद्धतीने मांडणी करण्याची गरज पुढील शब्दांत स्पष्टपणे प्रतिपादन करण्यात आली होती:
शालेय स्तरावरील अभ्यासक्रमाची व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना वापरण्यात येणारे संदर्भग्रंथ प्रामुख्याने पाश्चिमात्य असतात. त्यामुळे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांतील त्या त्या विषयांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महत्त्वाच्या घडामोडी, उदाहरणे, दाखले या सर्व बाबींची मांडणीसुद्धा पाश्चात्त्य संदर्भात केलेली असते. त्यावरून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानविषयक परंपरांचे व त्यातील चढउतारांचे यथार्थ दर्शन होत नाही व परिणामत: राष्ट्रीय ज्ञानपरंपरेच्या जडणघडणीचेही समग्र ज्ञान होत नाही.
शालेय स्तरापासूनच या सर्व विषयांच्या मांडणीत भारतीय ज्ञानपरंपरा काय होत्या, त्या कशा खंडित झाल्या किंवा झाल्या नाहीत, त्यातील अभ्यासण्याजोगा आणि आजही ठामपणे स्वीकारण्याजोगा भाग कोणता, याचे वस्तुनिष्ठ भान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे.” मात्र त्या दिशेने विचारमंथन आणि कृती घडली नाही.
‘प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा की आधुनिक ज्ञानशाखा?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु हा विषय दोनपैकी एकाची निवड करण्याचा नसून एकमेकांशी सांगड घालण्याचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शिक्षण आणि संस्कृती यांचे यथार्थ आकलन करून घ्यायचे असेल तर विनोबांचे ‘शिक्षण विचार’ आणि साने गुरुजींचे ‘भारतीय संस्कृती’ ही पुस्तके वाचलीच पाहिजेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक अभ्यासविषयाचा इतिहास असतो, ही भावना – ‘इतिहास साक्षरता’ शिक्षणव्यवस्थेत रुजलेली नाही. खरे तर व्यक्तिगत, सामाजिक आत्मभान इतिहास साक्षरतेतूनच आकाराला येते.
संबंधित विषयाचा समग्र इतिहास जाणून घेतला तरच विषयाचे यथार्थ आकलन होऊ शकते. आंधळा गौरव किंवा आंधळा विरोध या दोन्ही टोकाच्या भूमिका टाळून संतुलित इतिहास साक्षरता निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्या ज्ञानपरंपरांचा अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण त्या खंडित किंवा क्षीण का झाल्या, कोणत्या क्षेत्रात त्या पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे आणि असल्यास कशा रीतीने करायच्या, हा अभ्याससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे.
छद्मविज्ञानाचे उदात्तीकरण घातक
भारतकेंद्री शिक्षणपद्धती रुजवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. सर्वांत मोठे आव्हान भारतीय ज्ञानपरंपरेच्या अतिउत्साही समर्थकांचेच आहे. या अतिउत्साही लोकांच्या भारतकेंद्री शिक्षणाला विशिष्ट विचारसरणी, चमत्कार, अतिशयोक्तिपूर्ण घटना यांच्याशी जोडण्याच्या अभिनिवेशपूर्ण प्रयत्नांमुळे छद्मविज्ञानाला पाठबळ मिळते. प्राचीन साहित्यातील श्रद्धा/अंधश्रद्धा, इष्ट/अनिष्ट परंपरा, कल्पनाविलास/ज्यांची सत्यता पडताळून पाहता येईल अशा बाबी, राज्यघटनेशी सुसंगत/विसंगत बाबी, हे भेद कसे ओळखायचे हे शिकवले जायला पाहिजे.
छापील आणि ऑनलाइन साहित्य अचूकतेच्या दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कसोटीवर तपासून पाहण्याची, तसेच नैतिक चिकित्सा करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. पूर्वीच्या कोणत्या गोष्टी स्वीकारार्ह आहेत आणि कोणत्या त्याज्य ठरतात याचा निर्णय शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना करता आला पाहिजे.
प्राचीन शिक्षणपद्धतीबद्दलचे अज्ञान आणि पूर्वग्रह यांतून होणारा टोकाचा विरोध हे दुसरे महत्त्वाचे आव्हान आहे. प्राचीन शिक्षणपद्धतीत केवळ ठराविक गोष्टींचे पाठांतर आणि चिकित्सेचा पूर्णपणे अभाव असायचा असे काहींना वाटते. तसे असते तर विविध क्षेत्रांतील प्रगत संशोधन आणि भौतिक प्रगती या गोष्टी शक्य झाल्या असत्या का? वादविद्या, वादसभा रुजल्या असत्या का? महाराष्ट्रात जाणते-अजाणतेपणाने संस्कृत भाषेची खूपच उपेक्षा झाली आहे.
पूर्वीच्या काळात संस्कृत मूठभर अभिजनांची भाषा होती, बहुजन तिचा वापर करायचे नाहीत. अशी भाषा शिकायची तरी का? असा युक्तिवाद काहीजण करतात. परंतु ही भाषा आज सर्वांना शिकणे शक्य असूनही ज्यांना ती लवकर शिकायची इच्छा आहे, त्यांना संधी का नाकारायची? प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील विविध विषयांचे साहित्य संस्कृतमध्ये असल्यामुळे ते समजून घेण्यासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यक आहे. संस्कृत एक ऐच्छिक विषय म्हणून सहावीपासून तरी शिकवला जावा.
गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांतील प्राचीन आणि अर्वाचीन भारतीय संशोधनाला आणि संशोधकांना अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांत ठिगळकामासारखे स्थान न देता आणखी व्यवस्थित स्थान द्यायला हवे. या क्षेत्रांतील कर्तबगार भारतीय व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारी पुस्तके शालेय ग्रंथालयांत उपलब्ध करून द्यायला हवीत. शालेय अभ्यासक्रमात प्राचीन आणि विशेषत: मध्ययुगीन इतिहास शिकवताना उत्तरेकडील इतिहासालाच महत्त्वाचे स्थान मिळते. या संदर्भात समतोल राखण्याची गरज आहे.
देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांतील लोककला, शेती आणि वने, पर्यावरण या क्षेत्रांतील पारंपरिक ज्ञान, भारतीय खेळ, साक्षीभाव, मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा यांच्याबरोबरच इतर भारतीय भाषा आणि महाराष्ट्रातील बोलीभाषांचा परिचय यांचा समावेश अभ्यासक्रमात हवा. विज्ञान आणि गणित विषयांच्या अध्यापनात द्वैभाषिक अध्यापनपद्धतीला प्रोत्साहन द्यायला हवे. भाषांतर आणि लिप्यंतर यांवर आधारित उपक्रम शाळांमध्ये आणि शाळांच्या बाहेरही आयोजित करायला हवेत. विनोबांनी सांगितलेली ‘योग, उद्योग, सहयोग’ ही त्रिसूत्री या शिक्षणपद्धतीत खूप महत्त्वाची आहे.
भारतीय शिक्षणपद्धतीबाबत शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक, पालक आणि साहित्यनिर्मिती करणारे तज्ज्ञ यांचे उद्बोधन आणि प्रशिक्षण यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करावे लागेल. केंद्र आणि राज्यांच्या सरकारांचा अंमलबजावणीच्या सर्वच टप्प्यांवर सक्रिय सहभाग आणि भरीव आर्थिक मदत आवश्यक असेल.
(लेखक माजी शिक्षण संचालक आहेत.)