भूकंप!

भूकंप!
भूकंप!

बेटा : (विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (खुर्चीत बसून पेपर वाचत) हं!
बेटा : (चटकन दरवाजाची चौकट पकडत) जमीन थर्थरतेय! तुला जाणवतंय?
मम्मामॅडम : (अजूनही निर्विकार) मी खुर्चीत बसलेय!
बेटा : (सावध चेहऱ्यानं) खुर्ची डगमगतेय?
मम्मामॅडम : (निर्विकारपणा कंटिन्यू...) माझी खुर्ची अशी डगमगत नाही कशानं!!
बेटा : (मान हलवत) नक्‍की जमीन थर्थरतेय!! मला जाणवतंय! भूकंप होतोय, भूकंप!!
मम्मामॅडम : (वर्तमानपत्राचं पान उलटत) कशावरून?
बेटा : (दरवाजा घट्‌ट पकडत) मी तोंड उघडलं नाऽऽ..!
मम्मामॅडम : (निर्विकारपणे पेपर वाचत) हं! टेबलावर पास्ता ठेवलाय, तो खाऊन घे! पण त्याआधी-
बेटा : (निषेधाच्या सुरात) मी अंघोळ केली आहे!! पुन्हा करणार न्नाही!!
मम्मामॅडम : (चमकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहात) आणि हे काय? कपाळावर कसला टॅटू काढलायस?
बेटा : (गालातल्या गालात हसत) तो टॅटू नाही!! माझा तिसरा डोळा आहे!! हा बघ... कसाय?
मम्मामॅडम : (निरखून बघत) लालच दिसतोय जरा!! औषध घाल बरं!!
बेटा : (वैतागून) कमॉन मम्मा!! इंडियन मायथॉलजीनुसार तिसरा डोळा हा पर्मनंट लालच असतो!!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) इश्‍श!! मग तो असा काय दिसतोय?
बेटा : (खुलासा करत) तो मिटलेला आहे ना! उघडला की खल्लास!! सबकुछ भस्म हो जाएगा!!
मम्मामॅडम : (विषण्णपणाने) तिसरा डोळा उघडण्यापेक्षा त्याखालचे दोन डोळे उघडे ठेव! आपल्या लोकशाहीसाठी तेच योग्य आहे!!
बेटा : (निर्वाणीचा इशारा देत) भगवान करे और मेरे उप्पर तिसरा डोळा उघडने की नौबत ना आए! मेरे अंदर के शैतान कू मत जगाओ, वरना...
मम्मामॅडम : (कौतुकाश्‍चर्यानं) गालावरच्या खळीसाठी फेमस आहेस तू! तिसऱ्या डोळ्यासाठी नाही!! पार्लमेंटमध्ये तुला डुलकी लागली होती, तेव्हा लोकांनी तुझ्या बंद डोळ्यांचे किती फोटो छापले होते आठवतंय ना?
बेटा : (खुलासा करत) तो गैरसमज होता!! ऍक्‍चुअली मी तिसरा डोळा मिटायच्या भानगडीत उरलेले दोन्ही डोळे मिटले होते तेव्हा!!
मम्मामॅडम : (विषय संपवत) जाऊ दे! उघडतील डोळे तुझे एक दिवस!! सध्या बोलायचं कसं आणि किती ह्याचा सराव ठेव!!
बेटा : (थरथर कापत) मी तोंड उघडलं नाऽऽ... तरी भूकंप येईल, भूकंप!! किमान दहा रिश्‍टर स्केलचा!! सगळं भूमंडळ थरकापेल!! जमिनीला तडे जातील!! हाहाकार होईल, हाहाकार!!
मम्मामॅडम : (काही न उमजून) पण आत्ता तर तू डोळ्याबद्दल बोलत होतास! एकदम हे तोंड उघडण्याचं कुठून आलं?
बेटा : (जाणीव करून देत) मी नुसतं तोंड उघडलं तर इतकं होईल, मग तिसरा डोळा उघडला तर काय होईल, जस्ट इमॅजिन!!
मम्मामॅडम : (अजिबात सीरियसली न घेता) इश्‍श!! तू तोंड उघडलंस तर जास्तीत जास्त पास्ता मागशील, असंच मला वाटतं! तिसऱ्या डोळ्याचं तर काही सांगूच नकोस!!
बेटा : (पोक्‍त मुद्रा धारण करत) देखो भय्या, यही फर्क है हम में और उन में... हम गरीब किसान और मजदूरों के वास्ते तिसरा डोळा उघडते हैं, और वो अमीरों के लिए बार बार कपडे बदलते रहते है!! हमारे डोळे में लाली है, उनके डोळे में आंसू टपकते है!!
मम्मामॅडम : (तुच्छतेने) हुं:!! त्यांच्या असल्या मगरीच्या अश्रूंना कोण किंमत देतं!! जातात तिथं रडतात!! रडून काय होणारेय म्हणावं? इथं तुमच्यामुळे जनतेवर रडायची वेळ आलीये!!
बेटा : (तळहातावर ठामपणे मूठ हापटत) मी तिसरा डोळा उघडणं कोणाला परवडणार नाही, हे मान्य!! पण मला तोंड तरी उघडू द्या!! हे लोक मला तोंडच उघडू देत नाहीत!!
मम्मामॅडम : (थंडपणाने) तूच म्हणालास ना, की तू तोंड उघडलंस तर भूकंप होईल म्हणून!! कोण बघेल ती विषाची परीक्षा? आपण आतल्या आत काय ते बोलून घ्यावं!!
बेटा : (मान हलवत) तुझा आतला आवाज भूकंप घडवतो, माझा बाह्य आवाज!! यही फर्क है, बस्स!!
मम्मामॅडम : (चर्चा गुंडाळत) माझ्या आतल्या आवाजाचा विषय इथं नको!
बेटा : (डोकं खाजवत)... हा एक घोळच झालाय!!! तोंड उघडलं की काय होईल, हे मी आधीच जाहीर करून बसलो, हे चुकलंच!!
मम्मामॅडम : (खुर्चीत बसल्याबसल्या) आपले डावपेच असे कधी जाहीर करायचे नसतात!
बेटा : (संभ्रमात पडून) अब क्‍या करें?
मम्मामॅडम : (शांतपणे) पास्ता खा आणि गप्प बस देवासारखा!!
बेटा : (चुटकी वाजवत) आयडिया!! मी पुन्हा विपश्‍यनेला जाऊ का?


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com