आवेश आणि आव्हाने

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

कॉंग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते यांच्यात निर्माण झालेल्या भिंती पाडाव्या लागतील, हा राहुल गांधी यांचा निर्धार वास्तवात येणार का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तसे झाले तरच मोदी सरकारविरुद्धचा त्यांचा आवेश परिणामकारक ठरेल

मुंबईत 1985 मध्ये कॉंग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना राजीव गांधी यांनी "पक्षात सत्तेचे दलाल घुसले आहेत', असे वक्‍तव्य करून तमाम कॉंग्रेसजनांना मोठा धक्‍का दिला होता. त्याचवेळी त्यांनी पक्षातील तरुणांना लोकसभेची उमेदवारी मोठ्या प्रमाणात बहाल करून निवडूनही आणले होते. त्या घटनेची आज तीन दशकांनंतर आठवण होण्याचे प्रमुख कारण हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पदरी घेणाऱ्या राहुल गांधी यांनी दिलेला "पुनःश्‍च हरि ॐ!' हा नारा हा आहे! कॉंग्रेस महासमितीच्या 84 व्या महाअधिवेशनाचा समारोप करताना त्यांनी हा नारा देतानाच, कॉंग्रेसमधील गटबाजी मोडून काढण्याचा निर्धार व्यक्‍त केला आणि त्याचवेळी यापुढे पक्षसंघटनेत तरुणांना मोठ्या संधी दिल्या जातील, असे आश्‍वासनही दिले. यामुळे बुजुर्ग नेत्यांच्या पोटात गोळा येणे साहजिक असले तरी, राहुल यांनी त्यांना ही निवृत्तीची मात्रा साखरेच्या पाकातूनच दिली, हेही खरे! मात्र, यामुळेच कॉंग्रेसला ही भाषा वापरणे काही ठराविक कालावधीनंतर अपरिहार्य का होते, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पुढची काही वर्षे कॉंग्रेसवर नरसिंह राव यांचे राज्य होते आणि त्यांनीही पक्षातील गटबाजीचा आणि सरंजामी शक्तींच्या वर्चस्वाचा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला होता. त्यामुळेच राहुल यांनी घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्डच पुन्हा वाजवली, अशी टीका होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांनी चढवलेला तिखट हल्ला अपेक्षित होता; मात्र पक्षांतर्गत स्तराविषयी बोलताना गटबाजी, लोकांशी संपर्क साधण्यात आलेले अपयश, सुभेदारशाही आदी मुद्यांनाही त्यांनी हात घातला आणि त्याविषयी काय बदल होतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. पक्षात सुभेदार बनून पदे बळकावून बसलेले नेते आणि सच्चे कार्यकर्ते यांच्यात दुराव्याची भिंत उभी राहिली आहे, असे राहुल म्हणाले. मात्र, ही भिंत कोणी उभी होऊ दिली, या प्रश्‍नाला त्यांनी स्पर्शही केला नाही. पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या आपल्या या पहिल्या-वहिल्या महत्त्वाच्या भाषणात त्यांचा प्रांजळपणा आणि कळकळ दिसत होती आणि त्यांच्या भाषणातील ही गटबाजीवर टीका करणारी वाक्‍ये सुविचारासारखी भिंतीवर लिहून ठेवण्याजोगी होती. मात्र, गेली तीन दशके कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या या सुविचारवजा वक्‍तव्यांचा आता पक्षकार्यकर्त्यांपेक्षा देशातील जनतेलाही उबग आला आहे. जनतेला तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही आता अपेक्षा आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि अशी काही ठोस कृती वा कारवाई खरोखरच झाली, तरच राहुल यांना अपेक्षित असलेल्या सत्तापरिवर्तनाच्या प्रक्रियेस वेग आणण्याच्या दिशेने किमान एक पाऊल तरी उचलले गेल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.

अर्थात, कॉंग्रेस महासमितीचे हे अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एकंदरीत वेधक ठरले. एकीकडे राहुल व सोनिया गांधी यांनी मोदी-शहा दुकलीवर चढवलेला घणाघाती हल्ला आणि दुसऱ्या बाजूने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारच्या अर्थनीतीचे काढलेले वाभाडे, यामुळे कॉंग्रेसच्या आक्रमक रणनीतीची चुणूक पाहायला मिळाली; आता त्या आक्रमकतेला संघटनात्मक पाठबळ मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, हे निर्णायक ठरणार आहे. एकंदरीत मोदी सरकारविरोधात चहूबाजूंनी उभ्या राहत असलेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी लढाईचे रणशिंगच सोनिया, राहुल तसेच मनमोहनसिंग-चिदंबरम यांनी या अधिवेशनात फुंकले, तर अलीकडेच कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या भाजपअवतारातील वक्‍तव्यांबाबत मनमोहनसिंग यांची जाहीर माफी मागत आपणही या लढाईत सामील असल्याचे दाखवून दिले. राहुल यांनी तर कॉंग्रेस म्हणजे पांडव आहेत, असे सांगतानाच त्यांनी आगामी लढाई ही भाजपरूपी कौरवांशी असल्याचेही जाहीर केले. मोदी व शहा यांच्यावर राहुल यांचा हल्ला हा काहीसा व्यक्‍तिगत वाटला, तरी तो "प्रेम, युद्ध आणि राजकारण यांत सारे काही क्षम्य' या नीतीला धरूनच होता! आता खरा प्रश्‍न गांधी घराण्यानेच राज्याराज्यांत उभ्या केलेल्या पक्षांतर्गत सुभेदाऱ्या, तसेच गटबाजीला दिलेले प्रोत्साहन संपवण्यात राहुल यांना यश येते काय, हा आहे. त्यात ते यशस्वी झाले तरच "पुनःश्‍च हरि ॐ!' हा त्यांचा नारा प्रत्यक्षात आला, असे म्हणता येईल.

Web Title: editorial