वर्दीवरचा डाग ..(अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सांगलीतील दोन पोलिसांच्या समर्थक गुंडांच्या टोळीतील हाणामारीच्या प्रकारामुळे वर्दीची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. यानिमित्ताने कठोर उपाययोजनांचा विचार व्हावा.

गॅंगवॉर, राडा, चाकू-तलवारीसह हाणामारी, अपहरण, पाठलाग हे शब्द आले, की एखाद्या खतरनाक गुंडांच्या टोळीच्या कारवायांशी ते संबंधित असावेत, असे सहजपणे वाटून जाते; पण सांगलीत सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या प्रकारात खाकी वर्दीतले दोन पोलिसच या सर्व राड्यात थेट सहभागी झाले. या घटनेने केवळ सांगली पोलिसांचीच नव्हे, तर एकूणच खाकी वर्दीची प्रतिमा मलिन झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि त्यासाठी प्रसंगी कठोरपणे कारवाई करणे, हा पोलिसांच्या कामाचा प्रमुख भाग आहे; पण हल्ली आजूबाजूला अशा अनेक घटना वाढताहेत, की ज्यामुळे पोलिसांच्याच अब्रूची लक्तरे वेशीवर येताहेत. पोलिसांनीच राडा करण्याचे केलेले धारिष्ट्य आणि त्यासाठी त्यांच्या गुंड साथीदारांची त्यांना लाभलेली साथ हा अतिशय गंभीर विषय आहे. समाजावर ज्यांनी धाक बसवायचा त्या यंत्रणेतील घटकच जेव्हा स्वतः गुंडगिरीचा आश्रय घेतात, तेव्हा सहनशीलतेच्या सर्व मर्यादा संपतात. अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी झाल्या प्रकाराची तातडीने दखल घेऊन अशी काही कठोर कारवाई झाली पाहिजे, की यापुढे असे करणाऱ्यांना त्याची जरब बसली पाहिजे. संबंधित पोलिसांना अटक झाली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली आहे. यथावकाश बडतर्फीही होऊ शकेल; पण काळाच्या ओघात अशा कारवाया विरून जातात व पुढे त्या विस्मरणातही जातात, म्हणूनच "त्या' दोन पोलिसांची दखल कठोर कारवाईसाठी दिशादर्शक म्हणून घ्यावी, अशी परिस्थिती आहे. 

दिल्लीतील "निर्भया' बलात्कार प्रकरणानंतर देश ढवळून निघाला. त्यानंतर कायद्यातही कठोर बदल केले गेले. केवळ एक स्थानिक घटना या दृष्टिकोनातून न पाहता सांगलीतील घटनेनंतरही अशाच प्रकारे व्यापक उपाययोजनांची गरज आहे. वर्दीचा धाक राखण्यासाठी आणि सन्मान उंचावण्यासाठी हे करणे आवश्‍यक आहे. या संपूर्ण घटनेच्या पार्श्‍वभूमीवर थोडीशी नजर टाकली तरी खूप काही समजून जाते. किरण पुजारी व संतोष पाटील अशी संबंधित दोन पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यात पूर्ववैमनस्य होते. सातत्याने वादविवाद होत. तीन महिन्यांपूर्वी पुजारीची स्कॉर्पिओ मोटार पेटवून देण्यात आली होती. ती संतोष व त्याच्या साथीदारांनी पेटवल्याचा पुजारीला संशय होता. त्यातून वाद धुमसत राहिला. सोमवारी रात्री दोघांचे गट परस्परांना भिडले. हाणामारीत तलवारी, चाकूचा वापर झाला. दोन्ही पोलिसांसह त्यांचे साथीदार जखमी झाले. दोन्ही पोलिसांवर मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हेगारापेक्षाही वरचढ ठरावे असे पोलिसांचेच हे कृत्य चव्हाट्यावर आल्यामुळे वर्दीची नाचक्की झाली आहे. त्या दोन पोलिसांचे काही साथीदार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचा तपशील पुढे आला आहे. वर्दीवाल्यांचे असे धारिष्ट्य होऊच कसे शकते, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे. 

मुळात पोलिस आणि त्यांची प्रतिमा हा सर्वसाधारणपणे एक गहन प्रश्‍न आहे. वर्दीला असलेल्या अधिकाराचा योग्य वापर होण्याऐवजी अयोग्य वापर झाल्याच्याच घटना मोठ्या प्रमाणात पुढे येत असतात. लाचखोरीत पोलिस आणि महसूल खाते अग्रेसर असल्याची आकडेवारीसह उदाहरणे अनेकदा प्रसिद्धही झालेली आहेत. पोलिस व गुंड-गुन्हेगार यांचे साटेलोटे, राजकारण्यांकडे हुजरेगिरी, वर्दीचा रुबाब वापरून दमबाजी, उर्मट, उद्धट वर्तन, अशा प्रकारांमुळे पोलिसांविषयी समाजमनात राग असतो. हप्तेबाजी, मटका, दारू यांसह अवैध व्यवसायांकडे कानाडोळा याही बाबीही जगजाहीर आहेत. या साऱ्या परिस्थितीत मग सरसकट पोलिस यंत्रणेलाच त्याचा रोष सहन करावा लागतो. वस्तुतः संपूर्ण पोलिस यंत्रणा दोषी, कुचकामी आहे, असे कोणी म्हणणार नाही. या खात्यातही अनेक कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयवादी आणि जीव तोडून सेवा बजावणारे आहेत. मुंबईतील ""26-11'' च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी कर्तृत्वाचे-शौर्याचे शिखर गाठणारी कामगिरी केल्याचे आपणास माहीत आहे; पण पोलिसांचा मोठेपणा, चांगुलपणा झाकोळला जावा अशा घटना मात्र वारंवार पुढे येतात. त्यातून खात्याच्या प्रतिमेला गालबोट लागते. वस्तुतः पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. रात्रंदिवस करावी लागणारी ड्यूटी, मेहनत यातून त्यांचे आरोग्य, कुटुंब याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांच्या स्वतःच्याही अशा आणखी खूप व्यथा आहेत. त्याही समजून घेतल्या पाहिजेत. असे असले तरी वर्दीआडून केली जाणारी काळी कृत्ये, त्यांना पाठबळ देणारे यांचे कधीच समर्थन करता येणार नाही. सांगलीतील दोन पोलिसांच्या हाणामारीच्या निमित्ताने कठोरात कठोर कारवाई तातडीने करून स्वतः पोलिस यंत्रणेनेही आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करणे तर क्रमप्राप्तच आहे. सांगली जिल्ह्यात एरवीही गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यात आता पोलिसांनीच कायदा हातात घेण्याचा प्रकार केल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ती हाताबाहेर जाण्यापूर्वीच जालीम उपाय करायला हवेत. 

 

Web Title: editorial