गढीला सुरुंग (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही जागा नसलेल्या भाजपला हिसकावून घेता आला, हे नाहीतर कशाचे लक्षण आहे? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड गेल्या दोन महिन्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट झाली होती.

पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही जागा नसलेल्या भाजपला हिसकावून घेता आला, हे नाहीतर कशाचे लक्षण आहे? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड गेल्या दोन महिन्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट झाली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकांत विलासराव देशमुख यांची सुप्रसिद्ध बाभुळगावची गढीही भाजपने काबीज करून या वाटचालीत सातत्य राखले आहे. लातूर काबीज करतानाच भाजपने चंद्रपूरही आपल्याकडे राखले. सुदैवाने परभणी महापालिका अनपेक्षितपणे हाती आल्यामुळे कॉंग्रेसला थोडाफार दिलासा जरूर मिळाला. मात्र, त्यातही एक गोम आहेच! भाजपने लातूरप्रमाणे परभणीत आपली शक्ती पणाला बिलकूलच लावलेली नव्हती. त्यामुळेच बहुधा "राष्ट्रवादी'च्या ताब्यात असलेल्या परभणीवर अखेर कॉंग्रेसचा झेंडा फडकला! चंद्रपूर "कॉंग्रेसमुक्‍त' करण्याच्या गर्जना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार करत होतेच; आता चंद्रपूूर जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकेवरही सुधीरभाऊंनी भाजपचा झेंडा रोविला! मात्र, कॉंग्रेसच्या जिव्हारी लागणारा पराभव हा लातूरमधील आहे. गेली अनेक वर्षे लातूर कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता आणि त्यास विलासरावांचे खंबीर नेतृत्व कारणीभूत होते. ते फर्डे वक्ते होते. कॉंग्रेसचे राज्यातील एक आधारस्तंभ होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कॉंग्रेसला नंतरच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांत मोठाच फटका बसला होता. आता लातूर जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकाही भाजपने खेचून घेतली. त्यामुळे कॉंग्रेसची एकूणच अवस्था "भिंत खचली; कलथून खांब गेला...' अशीच झाली आहे. 

लातूरमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या पराभवाची कहाणी ही एखाद्या मातब्बर घराण्यातील कर्ता पुरुष अकस्मात निधन पावला, की अख्खे कुटुंब कसे वाऱ्यावर जाते, याची साक्ष आहे. विलासरावांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लाखो लातूरकरांनी हा नेता कसा आपल्या घरातीलच एक कर्ता पुरुष होता, याची प्रचिती आणून दिली होती. त्यानंतर लातूरचे नेतृत्व त्यांचे चिरंजीव अमित यांच्याकडे वारसाहक्‍काने आले खरे; पण त्यांना त्याची जपणूक करता आली नाही. अमित, सिनेअभिनेता रितेश आणि धीरज, तसेच विलासरावांचे बंधू दिलीपराव यांच्यापैकी कोणीही सध्या लातूरमध्ये राहत नाही. केवळ निवडणुका आल्या, की ते लातूरमध्ये अवतरण्याच्या रिवाजामुळे लातूरच्या मातीशी असलेली त्यांची पारंपरिक नाळच तुटून गेली आणि यावर कळस झाला तो गतवर्षीच्या भीषण पाणीटंचाईमुळे! तेव्हा लातूरला रेल्वेगाडीने पाणी पुरवण्याचा अभूतपूर्व निर्णय अमलात आणून फडणवीसांनी लातूरकरांची मने जिंकली होती. खरे तर अलीकडेच लातूर जिल्हा परिषदही भाजपने कॉंग्रेसकडून खेचून घेतल्यामुळे देशमुख कुटुंबीयांना जाग यायला हरकत नव्हती; पण ते झाले नाही आणि त्यामुळेच भाजप शून्यातून कमळ फुलवू शकले! अर्थात, कॉंग्रेसही 33 जागा जिंकून भाजपच्या 36 या काठावरील बहुमतापाठोपाठ आहे. कॉंग्रेसने आपल्या 16 जागा गमावल्या; पण भाजपचे यश संस्मरणीय यासाठी आहे, की या वेळी राष्ट्रवादीला 13 पैकी 12, तर शिवसेनेला सहाच्या सहा जागा गमवाव्या लागल्या. याचा अर्थ या सर्वच पक्षांची मते खेचून घेत भाजपने हे यश केवळ संभाजीराव निलंगेकर यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवले आहे. 

विलासराव असताना ते आणि गोपीनाथ मुंडे यांची लुटूपुटूची लढाई चालत असे. पुढे सत्तांतरानंतर पालकमंत्रिपद पंकजा मुंडे यांच्याकडे आले, तेव्हाही लढाई तशीच खेळीमेळीच्या वातावरणात होती. मात्र, संभाजीरावांकडे लातूरचे पालकमंत्रिपद आले आणि पंचायत समित्यांपासून थेट लोकसभेपर्यंत दणदणीत यश मिळवत, त्यांनी लातूरची राजकीय केमिस्ट्रीच बदलून टाकली. त्यात कॉंग्रेसकडे प्रचारासाठी नेतेमंडळींची वानवाच होती. तेथे आले कोण, तर सोलापूर महापालिका गमावणारे सुशीलकुमार शिंदे. शेवटी रितेश देशमुख यांचा "रोड शो' लावण्यात आला; पण त्यास गर्दी करणाऱ्या लातूरकरांचे मन तोपावेतो कमळाकडे आकृष्ट झाले होते! 

परभणीतील विजय मात्र कॉंग्रेसला दिलासा देणारा आहे. शिवसेनेचे मूळ तेथे बऱ्यापैकी रुजले होते. तुकाराम रेंगे-पाटील यांसारखे नेतेही त्यांच्याकडे होते. त्यामुळेच बहुधा भाजपने परभणीकडे दुर्लक्ष केले आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिका आता कॉंग्रेसच्या हाती आली आहे. आता यानंतर तरी कॉंग्रेस आणि विशेषतः देशमुख कुटुंबीय काही धडा घेणार की नाही, हा खरा प्रश्‍न आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू असूनही भाजपप्रवेश करून काही वर्षांपूर्वी संभाजीराव निलंगेकरांनी आपल्या आजोबांना पराभूत केले होते. त्यानंतर घेतलेल्या मेहनतीमुळे ते विलासरावांच्या बाभूळगावच्या गढीला सुरुंग लावू शकले. त्यामुळे आता लातूरमध्ये कॉंग्रेसला नव्याने संजीवनी देण्यासाठी अमित यांना जातीने लातूरमध्ये ठाण मांडून बसावे लागेल आणि मुख्य म्हणजे गढीतून बाहेर पडून रस्त्यावर यावे लागेल. अन्यथा, पुढच्या निवडणुकीनंतर तेथे कॉंग्रेसचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही! कॉंग्रेस केवळ परभणीतील यशामुळे स्वस्थचित्त बसून राहिली, तर किमान मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या चार जिल्ह्यांच्या परिसरात तरी "शतप्रतिशत भाजप'चे त्या पक्षाच्या नेत्यांचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही.  

Web Title: Editorial