गिर्यारोहणातील "सचिन' (नाममुद्रा)

नामदेव गवारे
सोमवार, 22 मे 2017

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "मॉर्निंग वॉक'मुळे पहाटेपासून गजबजणारा परिसर. बऱ्याचदा तेथे व्यायामासाठी येणारा किशोर धनकुडे धावताना दिसला, की चालणाऱ्यांचे पायही धावण्यासाठी आतुर होतात, तर धावणाऱ्यांची पावले किशोरसारखी लय पकडण्यासाठी आतुर झालेली असतात. नंतर मग पाच-दहा किलोमीटर धावून आलेली मंडळी आपसूकच किशोरभोवती गोळा होतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "मॉर्निंग वॉक'मुळे पहाटेपासून गजबजणारा परिसर. बऱ्याचदा तेथे व्यायामासाठी येणारा किशोर धनकुडे धावताना दिसला, की चालणाऱ्यांचे पायही धावण्यासाठी आतुर होतात, तर धावणाऱ्यांची पावले किशोरसारखी लय पकडण्यासाठी आतुर झालेली असतात. नंतर मग पाच-दहा किलोमीटर धावून आलेली मंडळी आपसूकच किशोरभोवती गोळा होतात.

त्याच्याबरोबर स्ट्रेचिंग करू लागतात. पळणाऱ्यांसाठी स्ट्रेचिंगचे महत्त्व किती आहे, हे ऐकावे तर त्याच्याकडूनच. त्याचा स्वतःचा कधीच न चुकणाऱ्या व्यायामाचे स्वरूप आणि शिस्त-सातत्य ऐकून इतरांनाही स्फुरण चढते. वीस मे 2017 ला त्याने केलेल्या पराक्रमाचे त्यामुळेच त्याला ओळखणाऱ्यांना आश्‍चर्य वाटले नाही; पण आनंद मात्र खूप झाला. या दिवशी त्याने "माऊंट एव्हरेस्ट' नेपाळच्याही बाजूने सर केला. यापूर्वी त्याने चीनच्या बाजूकडून म्हणजे उत्तरेकडूनही हे शिखर पादाक्रांत केले होते. असे दुहेरी यश मिळविणारा तो राज्यातील पहिलाच. सायकलिंग, गिर्यारोहण, धावणे अशा विविध प्रकारांनी स्वतःला फिट ठेवणाऱ्या किशोरला तुझा चेहेरा सचिन तेंडुलकरसारखाच आहे, असे रोज कोणी ना कोणी सांगतेच. तो फक्त हसतो. आता गिर्यारोहणात पराक्रम गाजवून त्याने कृतीनेच माझा फक्त चेहरा सचिनसारखा नाही, हे दाखवून दिले.

एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, की ती पूर्ण करायचीच, असा त्याचा जिद्दी स्वभाव. स्थापत्त्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात असलेल्या किशोरला काही मित्रांमुळे गिर्यारोहणाचे क्षेत्र खुणावू लागले. मग त्याने स्वतःला यात अक्षरशः झोकून दिले. सह्याद्रीच्या रांगातील दीडशेहून अधिक किल्ले सर केले. पण त्याचे लक्ष लागून राहिले होते, ते हिमालयाकडे. पूर्वतयारी, नियोजन यासाठी दोन वर्षे अथक परिश्रम केल्यानंतर 2014 मध्ये हे माऊंट एव्हरेस्ट त्याने उत्तरेकडून म्हणजे चीनच्या बाजूने सर केले. त्याचा आत्मविश्‍वास वाढला. पुढच्याच वर्षी दक्षिणेकडच्या बाजूनेही एव्हरेस्ट गाठायचे, असा त्यांचा विचार होता. पण दुर्दैवाने त्या वेळी हिमकडे कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे प्रशासनाने सर्व मोहिमा स्थगित केल्या होत्या. पण स्वस्थ बसेल तो किशोर कसला? त्याने धावण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढच्या काळात पुणे आंतरराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन त्याने एक तास तीस मिनिटांत पूर्ण केली, मुंबई-पुणे मेरेथॉन साडेतीन तासांत, तर आफ्रिकेतील "कॉम्रेड मॅरेथॉन' (89 कि.मी.) साडेनऊ तासात पूर्ण करून या क्षेत्रातील प्रभुत्वही सिद्ध केले. अर्थातच "माऊंट एव्हरेस्ट' डोक्‍यातून गेले नव्हतेच. 20 मे 2017 ला सकाळीच किशोरने दक्षिणेकडून म्हणजे नेपाळच्या बाजूकडून हे शिखर गाठल्याची वार्ता आली आणि किशोर धनकुडे आणि यश हे समीकरण किती पक्के आहे, याची पुन्हा जाणीव झाली.

Web Title: Editorial