ठेवणीतल्या आठवणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

येणाऱ्या काळात त्यांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असणार आहे. विश्वास असा कुणावरच उरणार नाही, कारण सर्वांशीच स्पर्धात्मक नातं असणार आहे. त्यावेळी एक प्रेमळ आठवणींच्या पेटाऱ्याची त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरज भासणार आहे. तो पेटारा तुम्ही त्यांना देऊ शकता

लहानपणी दुपारी आई झोपलेली असताना हळूच जाऊन माजघरात ठेवलेलं लिंबाचं जुनं काळं झालेलं लोणचं चोरून खाल्लेलं आठवतं तुम्हाला? आणि पायात चपलाही न घालता उन्हाळ्याच्या सुटीत विहिरीवर पोहायला किंवा पोहणाऱ्यांना पाहायला गेला होता ते? मला तर पेरूच्या झाडावरून घरापासून लांब एका कोपऱ्यात असलेल्या शौचालयाच्या छतावर चार भावंडांसोबत चोरून आणलेलं सीताफळ आणि पेरू खाल्लेलेही आठवतात आणि जमा केलेल्या "चांदोबा', फॅंटम आणि मॅंड्रेकच्या "कॉमिक्‍स'चे लहानसे पुस्तकालय चालवल्याचेही आठवते.

आता जाग्या झालेल्या तुमच्या त्या आठवणी मनाला कशा भासतात? मला विचारलंत तर जगातल्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये चार रात्री राहायला मिळणार असेल तरी त्याच्या मोबदल्यात मी यांपैकी कुठल्याही आठवणी देणार नाही हे मला ठामपणे माहीत आहे. तुमच्या ठेवणीतल्या आठवणी कुठल्या? रात्री सडा घातलेल्या अंगणात गप्पांना उधाण आलं होतं ती रात्र? अनवाणी हिंडताना पायात रुतलेला काटा आईला कळायच्या आधी काढण्यासाठी केलेला आटापिटा? की गल्लीबोळातून हिंडून जमा केलेल्या ट्यूबलाइट आणि बल्ब कुटून तयार केलेला पतंगासाठीचा मांजा?

कसला तरी खजिन्याचा पेटारा उघडल्यासारखा रोमांच जाणवलाना आत्ता तुम्हाला? थोडा वेळ का होईना, परंतु सध्याच्या सर्व समस्यांचा विसर पडला ना? आणि मुख्य म्हणजे लहानपणीच्या त्या छोट्या घरात अनेक भावंडं आणि चुलत्यांसोबत अनुभवलेला तो साधेपणा, ती जवळीक काही क्षण का होईना, पण ऊब देऊन गेली ना?

तुमच्या मुलांकडे, नातवंडांकडे अशा आठवणी असतील? त्यांचं आयुष्य अगदी धकाधकीचं. कुठेतरी आपल्याला उगाचच वाटायला लागलेय की आयुष्यात प्रगती करायची असेल तर आनंद आणि मोकळेपणा यांचा त्याग करावाच लागतो. तीच भीती आपण त्यांना दिली आणि त्यांचा आठवणींचा पेटारा भरण्याअगोदरच पुरून टाकला.

येणाऱ्या काळात त्यांचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असणार आहे. विश्वास असा कुणावरच उरणार नाही, कारण सर्वांशीच स्पर्धात्मक नातं असणार आहे. त्यावेळी एक प्रेमळ आठवणींच्या पेटाऱ्याची त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरज भासणार आहे. तो पेटारा तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यांना शिकवा, पण थोडा वेळ खोडकरपणा करायला उत्तेजन द्या. वळण लावा, पण त्यांना आपल्यासोबत घेऊन खोड्याही काढा. वेळेचं बंधन ठेवा, पण कधीतरी त्यांची पुस्तकं बाजूला सारून मनसोक्त गप्पा मारा. गलोल, विटीदांडू , भोवरा यांसारखे वेळ वाया घालवणारे खेळ खेळा.

काहीही करा, पण जाणतेपणी आपल्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी ठेवणीतल्या आठवणींचा खजिना तयार करा. त्यामुळे ते तुमचे सदैव ऋणी राहतील.

Web Title: editorial

टॅग्स