आकांक्षापुढती गगन ठेंगणे....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

"जीएसएलव्ही एमके-3' या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण करून, आकांक्षापुढती गगनही ठेंगणे असल्याचे भारतीय अवकाशशास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे...

रशियाच्या युरी गागारीनने अंतराळात पहिले पाऊल टाकले ती तारीख होती 12 एप्रिल 1962! मानवाची ही आगळीवेगळी आणि मोठी झेप होती. त्यानंतर वर्षभराने भारताने गगनाला गवसणी घालण्याच्या ईर्षेने ख्यातकीर्त अवकाशशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली "इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च'ची स्थापना केली. त्यानंतर ही वसुंधरा आणि गगनातील चंद्रमा यांच्यातील अंतर झपाट्याने कमी होत गेले आणि 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग या अमेरिकन अंतराळवीराने चंद्रावर पहिले पाऊल टाकले, त्याच वर्षी "इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' (इस्रो)ची स्थापना झाली. त्यानंतरच्या पाच-सहा दशकांच्या काळात भारतीय अवकाशशास्त्रज्ञांच्या आकांक्षा वाढत गेल्या आणि त्यांना गगनही ठेंगणे वाटू लागले. मात्र, अवकाशशास्त्राच्या परिघातील भारताची वाटचाल कठीण होती आणि भारत या क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीबद्दल पाश्‍चात्य जगताला आणि विशेषत: अमेरिकेला असूया वाटू लागली होती. त्यामुळेच 1992 मध्ये अमेरिकेने रशियावर मोठा दबाव आणला आणि भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारण्यास भाग पाडले.

भारताच्या दृष्टीने ही मोठीच इष्टापत्ती ठरली; कारण भारतीय अवकाशशास्त्रज्ञांची प्रतिभा आणि ऊर्मी यांना त्यामुळेच फुलोरा फुटला. त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी या तंत्रात देश स्वयंपूर्ण करण्याचा विडा उचलला आणि त्यातूनच "जीएसएलव्ही एमके-3' या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण करून, आकांक्षापुढती गगनही ठेंगणे असल्याचे दाखवून दिले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रक्षेपक अंतराळात झेपावला, तेव्हा सव्वाशे कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येणे स्वाभाविक होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अंतराळातील या गगनभेदी झेपेमुळे आता भारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा दरवाजा खुला झाला आहे.

या गौरवास्पद कामगिरीमागे अनेक शास्त्रज्ञांच्या शेकडो हातांनी गेली काही वर्षे अथकपणे केलेले परिश्रम होते. यापूर्वी अवजड उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी भारताला फ्रान्सच्या प्रक्षेपकांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र, आता या प्रक्षेपकाने वाहून नेलेले 640 टन वजन लक्षात घेता, भारत अवकाश शास्त्राच्या परिघात "बाहुबली' झाला असल्याच्या वास्तवावर शिक्‍कामोर्तब झाले आहे! अमेरिकेच्या नाकाला त्यामुळे मिरच्या झोंबल्या असल्या तर त्यात नवल नाही. भारताने इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत 1974 मध्ये पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली, तेव्हापासून अमेरिका विविध मार्गाने अवकाशशास्त्रातील आधुनिक तंत्र-विज्ञान भारतापर्यंत पोचू नये म्हणून जंग जंग पछाडत होती. त्यासाठी भारतावर अनेक निर्बंध घालण्यासही अमेरिकेने मागेपुढे पाहिले नव्हते. मात्र, नियतीने फासेच असे टाकले की एकेकाळी अवकाशक्षेत्रातील प्रगती रोखण्यासाठी भारतावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेला पुढे आपले उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचाच वापर करणे भाग पडू लागले. चारच महिन्यांपूर्वी "इस्रो'ने एकाच वेळी अंतराळात उपग्रह सोडण्याची शतकी मजल गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यापाठोपाठ आता ही "वजनदार' भरारी घेऊन "इस्रो'ने भारतीय अवकाशशास्त्राच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिले आहे. स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या तंत्रज्ञानावर "इस्रो'चे प्रभुत्व त्यामुळे ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

आजवरच्या या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकास थट्टेने "फॅट बॉय' असे या उपग्रह केंद्रावर संबोधिले जात होते! या "लठ्ठ बाळा'ने निर्विघ्नपणे अवकाशात झेप घेतली, तेव्हा तेथील सर्वच अवकाशशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक तंत्रज्ञांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला; कारण यापूर्वी अशी झेप घेताना अनेक विघ्ने आली होती. 1979 मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी यासंबंधात पावले उचलायला सुरवात केली होती आणि या अनवट वाटेने पुढे जाताना अनेक धक्‍केही खाल्ले. त्या सर्व परिश्रमांची पूर्ती या "लठ्ठ बाळा'ने अवकाशात यशस्वी झेप घेतल्यावर झाली आणि त्यानंतरच्या अवघ्या 16 मिनिटांत म्हणजे पूर्वनियोजित कालावधीपेक्षा काहीशा कमी वेळात 3.13 टन वजनाचा अत्याधुनिक "जीसॅट -19' हा दळणवळण उपग्रहही अवकाशात "सेट' केला. त्यामुळे दळणवळणाच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या क्रांतीबरोबरच किमान चार टन वजनाचा उपग्रह अंतराळात पाठविण्याच्या जागतिक बाजारपेठेतही भारताने प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळेच सर्व तंत्रज्ञांचे अभिनंदन करताना, या क्षेत्रातील नव्या पिढीशी आता आपले नाते जुळले आहे, असे सार्थ उद्‌गार काढले आहेत. खरे तर ही "वजनदार' झेप अवकाशशास्त्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने भारताने घेतलेली झेप आहे. त्यामुळे केवळ क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताचे प्रभुत्व दिसून आले असे नसून, त्यामुळे "वजनदार' उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी अन्य देशांवर अवलंबून राहण्याचे जोखडही आपण झुगारून दिले आहे. त्याबद्दल भारतीय अवकाशशास्त्रज्ञ आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन!
......................

Web Title: editorial