धर्मयुद्ध नव्हे; क्रिकेटच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

भारताविरुद्धच्या लढतीत सरशी झाली ती पाकिस्तानची; कारण त्यांचा खेळ अप्रतिम होता. विजयासाठी कसे जिद्दीने खेळायचे असते, ते पाकिस्तानी खेळाडूंनी दाखवून दिले हेच खरे!

विलायतेत लंडनमध्ये ओव्हल मैदानावर पाकिस्तानचा क्रिकेट संघ दिमाखदार खेळ करून, स्वत:ला "अजिंक्‍य' समजणाऱ्या भारतीय संघाचा बोजवारा उडवत असतानाच, लंडनच्या दूरवरच्या कोपऱ्यात भारतीय हॉकी संघ पाकिस्तानला धूळ चारत होता! क्रीडा क्षेत्रातील हा दुर्मिळ योगायोग. पण हॉकीतील त्या विजयाच्या आनंदापेक्षा क्रिकेटमधील पराभवाने "सव्वासो करोड' भारतीयांना झालेली जखम प्रदीर्घ काळ भळभळत राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांत भारताला पाकिस्तानकडून इतक्‍या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले नव्हते; मात्र तो पराभव पदरी येत असतानाच, पाकिस्तानवर गेल्या अनेक वर्षांत केली नव्हती, अशी 7-1 मात भारतीय हॉकीपटू करत होते. शिवाय, यश-अपयशाचा हा खेळ सुरू होण्यापूर्वीच इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या किदाम्बी श्रीकांतने अजिंक्‍यपद पटकावत भारताची मान उंचावली होती. मात्र, हॉकीपटू आणि श्रीकांत यांच्या यशावर क्रिकेटमधल्या ऐतिहासिक पराभवाने मात केली.

खरा प्रश्‍न गेल्या चॅंपियन्स स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी मायदेशीच राखण्याचे भारताचे स्वप्न का भंगले, हा नसून ती ट्रॉफी पाकिस्तानने कशी जिंकली, हा आहे! -आणि त्याचे उत्तर "अप्रमित खेळ करून!' असे साधे-सोपे आणि सरळ आहे. कोट्यवधी भारतीयांचे डोळे मायदेशी "आयपीएल'ची सर्कस सुरू असतानाच, इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चषकावर लागलेले होते. त्यातच पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तडाखेबंद पद्धतीने धूळ चारल्यामुळे भारतीयांच्या बाहूंत भलतेच स्फुरण चढले होते. त्यामुळे अंतिम सामन्यातही पाकिस्तानच प्रतिस्पर्धी म्हटल्यावर तर आपण चषक जिंकलाच, असा ज्वर समस्त भारतीयांना चढला होता. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यावरही गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाक फलंदाजी बहरत गेली, तरी आपल्याला त्याची तमा नव्हती.

भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याची पहिली चूक केली आणि पुढे फखर झमनला धावचीत करण्याची संधी गमावली आणि लगोलग त्याचा झेलही सोडला. त्याचे त्याने सोने केले. त्याला अन्य फलंदाजांनी साथ दिली आणि पाकिस्तानने त्रिशतकी मजल मारली. अश्‍विन आणि जडेजा यांची जबरदस्त पिटाई होत असतानाही कर्णधार विराट हमखास बळी घेणाऱ्या युवराजसिंगच्या हाती चेंडू द्यायला तयारच नव्हता! तरीही आपली विजयाची नशा कमी झाली नव्हती. गोलंदाजीची शिस्त काय असते ती खरे तर बांगलादेशाने दाखवून दिली होती. त्यांनी उपांत्य फेरीत पराभव झाला तेव्हा एकही अवांतर धाव दिली नव्हती. इथे आपण अंतिम सामन्यात थोड्या थोडक्‍या नाही, तर 25 अवांतर धावा दिल्या. यातही तेरा वाईड आणि तीन नोबॉल होते. म्हणजे आपण सोळा चेंडू अधिक टाकले. या पार्श्‍वभूमीवर महंमद आमिर आणि सहकाऱ्यांनी दाखवलेली शिस्त कौतुकास्पद होती.

रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन यांच्या आमीरने मिळविलेल्या विकेट त्याचे उत्तम उदाहरण. हे तिघे बाद झाल्यावर मोठ्या धावसंख्येचा वेगाने पाठलाग करणारे भरवशाचे फलंदाजच उरले नव्हते. विराटबद्दल तर काय बोलणार? फखर झमनने जीवदानांचा फायदा उठवला, तर विराट मात्र त्याचा एक झेल सुटल्यावरही पुढच्याच चेंडूवर झेल देऊन तंबूत परतला. युवराज, महेंद्रसिंह धोनी हे फॉर्ममध्ये नव्हतेच. धावफलकावर पाच बाद 54 अशी अवमानित धावसंख्या बघून ओव्हलवर जमलेल्या हजारो भारतीयांच्या माना खाली गेल्या होत्या. पावसाची प्रार्थना करूनही काही फायदा नव्हता. डकवर्थ-लुईसचे भूत मानगुटीवर राहणार होते. आकाशात काळे ढग दाटण्याऐवजी भारताचा पराभव दाटून आला होता. हार्दिक पंड्याची फटकेबाजी काहीशी वेदनाशामक ठरत असतानाच चुकीच्या समन्वयाने त्याची खेळी संपुष्टात आली. त्यामुळेच पाकिस्तानच्या विजयाला आपल्या चुकांपेक्षाही पाकिस्तानी खेळाडूंची अप्रतिम कामगिरी कारणीभूत होती, असे म्हणणेच सयुक्तिक ठरेल.

आता या पराभवाचे चर्वितचर्वण प्रदीर्घ काळ सुरू राहील; मात्र ते करतानाही क्रीडाप्रेमींना हरमनप्रीत, आकाशदीप आणि तलविंदर हे हॉकीपटू, तसेच किदाम्बी श्रीकांत यांच्या गौरवास्पद कामगिरीचा विसर पडता कामा नये. क्रिकेटचे अवास्तव स्तोम आपणच कसे माजवले आहे, यावरही या निमित्ताने लख्ख प्रकाश पडला. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यास मैदानावरील नव्हे, तर सीमेवरील युद्धाचे रंग देणे तातडीने थांबवून अन्य खेळांवरही असेच प्रेम करायला हवे. आता हा विजय पाकिस्तानचा नव्हे, तर सट्टेबाजांचा आहे, असाही एक पदर त्यास जोडण्यात येत आहे. तर काही क्रिकेटप्रेमी "पाकिस्तान नव्हे, तर क्रिकेट जिंकले!' असे म्हणून स्वत:चे समाधान करून घेत आहेत. या दोन्हीत तथ्य नाही. जिंकला तो पाकिस्तानी संघच. याचे कारण त्यांचा खेळ चांगला होता. विजयासाठी कसे जिद्दीने खेळायचे असते, ते त्यांनी दाखवून दिले. हे मोकळेपणाने मान्य करायला काय हरकत आहे?

Web Title: editorial