जागेच्या लालसेचे निष्पाप बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

अनधिकृत बांधकामांच्या माफियांना चाप लावला जात नाही आणि लोकही अतिरिक्त जागेच्या मोहातून बाहेर येत नाहीत, तोपावेतो इमारत कोसळण्यासारख्या दुर्घटना घडतच राहतील.

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात घाटकोपर येथे "साई दर्शन' नावाची इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान 17 जणांचे बळी गेल्यामुळे आज राज्यभरातील घर अन्‌ घर हळहळत आहे. तरीही ही इमारत कोसळली की कोण्या एकाच्या जागेच्या अतीव लालसेपोटी ती पाडली गेली, हाच प्रश्‍न यानिमित्ताने अजेंड्यावर आला आहे. "कुठलीही नियमांची चौकट ही आपल्यासाठी नाही, आपण त्या बाहेर आहोत', असे मानण्याची काहींची प्रवृत्ती वाढत असून ती फोफावणे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. भ्रष्टाचाराने भुसभुशीत बनलेल्या संस्थांकडून या वृत्तीच्या लोकांना कसलाच अडसर निर्माण होत नाही आणि मग त्यांच्या बेताल वर्तनाचा फटका सर्वसामान्यांना बसतो. कुठले तरी राजकीय लेबल स्वतःला चिकटवून घेतली, की त्यांच्याविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही शक्‍यतो आवाज उठविण्यास कचरतो. हे प्रकार सगळीकडेच वाढत असून, त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

हा प्रश्‍न या एकाच इमारतीपुरता मर्यादित नाही. मुंबापुरीत दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासन जाहीर करत असते. "साई दर्शन' या वास्तूचा अशा धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश नव्हता, तरीही ती कोसळली. याचा अर्थ मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा ही इमारत कोसळण्याशी कवडीइतकाही संबंध नाही. ती पावसाळ्यात कोसळली, हा निव्वळ योगायोग. मंगळवारी पावसाचा जोरही फारसा नव्हता. त्या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या कोण्या एका शिवसेनेशी लागेबांधे असलेल्या इसमाची जागेची अतीव लालसा कारणीभूत ठरल्याचे उपलब्ध माहितीवरून तरी दिसते. हा इसम त्या इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम चालवत असे आणि चार महिन्यांपूर्वी ते बंद करून त्याने आपल्या ताब्यातील तीन फ्लॅट्‌सचे एकत्रीकरण करताना त्याने या वास्तूचे आधारखांब (पिलर) हलवले. त्यातून "भिंत खचली; कलथून खांब गेला...' अशी गत होऊन इमारत जमीनदोस्त झाली.

मुंबईतील जागेची भीषण टंचाई बघता आपल्या हाताशी आलेले चटईक्षेत्र येन केन प्रकारेण वाढवण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. त्यातूनच अनेक दुर्घटना घडल्या आहेत. बोरिवली येथे 2007 मध्ये "लक्ष्मीछाया' ही इमारत असेच तळमजल्यावरील खांब पाडण्यात आल्याने कोसळून 30 जण मृत्युमुखी पडले होते, तर माझगाव येथे 61 आणि माहीम येथे 10 जणांचा बळी अशाच कारणांनी झालेल्या दुर्घटनेत 2013 गेला होता. त्यामुळे खरे तर घाटकोपरची दुर्घटना हा अपघात नसून मानवी लालसेने घेतलेले हे बळी आहेत, असेच म्हणावे लागते.
आता या दुर्घटनेनंतर सुनील शीतप यास अटक करण्यात आली असून, या दुर्घटनेची 15 दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या अपघातास या कोण्या शीतप नावाच्या इसमाबरोबरच महापालिका प्रशासनही तितकेच जबाबदार आहे आणि त्या इमारतीतील रहिवाशांनीही आपली जबाबदारी पूर्णपणे पाळली नाही, असेच नाइलाजाने म्हणावे लागते.

तळमजल्यावरील या तीन फ्लॅट्‌सचे नूतनीकरण सुरू आहे, हे महापालिका प्रशासनास ठाऊक नव्हते काय? - आणि मुख्य म्हणजे हा इसम काही बेकायदा तोडफोड करत आहे, हे तेथील रहिवाशांनी पोलिस अथवा महापालिकेस का कळवले नाही, असे काही प्रश्‍न आता या दुर्घटनेमुळे सामोरे आले आहेत. त्या इसमाचे राजकीय लागेबांधे लक्षात घेतल्याने रहिवाशी तक्रार करण्यास कचरले असतील, हे सहज मान्य करता येते. मात्र, सोमवारी शीतपने तळमजल्यावरील खांब हलवल्यावर इमारतीस मोठे हादरे बसले होते, असे सांगण्यात येते. तरीही मग इमारत खाली करण्याचे रहिवाशांनी ठरवूनही त्यास उशीर का झाला? मुंबापुरीतच नव्हे तर सभोवतालच्या ठाणे-कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, बेलापूर-पनवेल परिसरासह राज्याच्या इतरही भागांत कसलेच निर्बंध न पाळणाऱ्या प्रवृत्ती मोकाट सुटल्या आहेत.

इमारतींचे नियमित "स्ट्रक्‍चरल ऑडिट' व्हायला हवे; पण ते होत नाही. अनेक जण "वन बीएचके' फ्लॅट ताब्यात येताच, स्वयंपाकघर गॅलरीत नेऊन, आपल्या फ्लॅटचे रूपांतर दोन बेडरूमध्ये करण्याचा प्रयत्न अनेकदा करत असतो. मात्र, तसे करताना इमारतीच्या गाभ्याला जराही धक्‍का लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. आपले चटईक्षेत्र कसे वाढेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष असते. त्याचे परिणाम किती भीषण होतात, हे घाटकोपरच्या दुर्घटनेत दिसले. आता या घटनेपासून तरी काही धडा घेऊन महापालिका प्रशासन आणि सुजाण नागरिक या राजकीय लागेबांधे असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या "दादां'ना सणसणीत चाप लावण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा करायची काय? पूर्वेतिहास बघता असे होणे केवळ अशक्‍य आहे; अन्यथा बोरिवली, माझगाव वा माहीम येथील दुर्घटनेनंतरच तसे झाले असते. त्यापलीकडचा प्रश्‍न हा राज्यभरातील आणि मुंबई महानगर परिसरातील धोकादायक इमारतींचा आहे. त्यांना वारंवार इशारे देऊन तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यावरही लोक आपले वर्षानुवर्षांचे घर खाली करावयास तयार नसतात, हा अनुभव आहे. आता या दुर्घटनेनंतर राज्य सरकार अनेक नवनव्या योजना जाहीर करत आहे. मात्र, जोपावेतो अनधिकृत बांधकामांच्या माफियांना चाप लावला जात नाही आणि लोकही तसूभर जादा जागेच्या मोहातून बाहेर येत नाहीत, तोपावेतो या दुर्घटना अशाच घडत राहणार, असेच नाइलाजाने म्हणावे लागते.

Web Title: editorial