नितीशकुमारांची "घरवापसी'! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या शपथेनंतर "विरोधी पक्षांचे ऐक्‍य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या नितीशकुमार यांनी आता तेवढ्याच ठामपणे घुमजाव करताना "अंतरात्म्याच्या आवाजा'चा दाखला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्‍यात धुळीस मिळवले आहेत.

विरोधी पक्षांच्या "महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी पक्षांनाही "स्वयंचित' होण्यास भाग पाडले! नितीशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा ते भाजपबरोबर जाणार नाहीत आणि बहुधा निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करतील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाले असते त्या मार्गाने बिहारचे राज्य पुनश्‍च एकवार त्यांच्या हाती आले असते, तर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीशकुमार हाच एकमेव चेहरा असता! मात्र अशी चाल खेळण्यात अनेक धोकेही होते. ते न पत्करता नितीशकुमार यांनी पाटण्यातील गादी कायम राखण्यात धन्यता मानली!

दोन वर्षांपूर्वी बिहारमधील आपले जुनेपुराणे हाडवैरी लालूप्रसाद यादव यांना सोबत घेऊन, त्यांनी कॉंग्रेससह "महागठबंधन' उभे केले, तेव्हाही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट बिहारचे राज्य आपल्या हातात ठेवणे, हेच होते. आताही त्यांनी तेच केले आहे; मात्र ते करताना त्यांनी स्वत:च देशाला दाखविलेले "संघमुक्‍त भारता'चे स्वप्न उद्‌ध्वस्त करून टाकले आहे.

"महागठबंधना'चे मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर "विरोधी पक्षांचे ऐक्‍य हीच देशाची गरज', असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले होते. आता स्वत:चेच हे शब्द कानाआड करून त्यांनी केलेली भाजपबरोबरची हातमिळवणी याला संधिसाधूपणा म्हणायचे की मुत्सद्देगिरी? मात्र आपल्या स्वच्छ प्रतिमेवर एकही शिंतोडा उडू नये, यासाठी धडपड करताना हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात सुरू असलेल्या लढ्याला त्यांनी मोठा धक्का दिला आहे. त्यांनी राजकारणात पदार्पण केले तेव्हापासूनच त्यांची नाळ डॉ. राममनोहर लोहिया यांच्या बिगर-कॉंग्रेसवादाच्या राजकारणाशी जोडली गेलेली होती. त्यामुळेच आता "रालोआ'मधील घरवापसीमुळे त्यांची चार वर्षांची अस्वस्थता संपुष्टात आली असावी, असे मानता येते.

भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली, तेव्हा "सेक्‍युलर' नितीशकुमार यांनी भाजपबरोबरचा 17 वर्षांचा संसार मोडला. शिवाय "मिस्टर क्‍लीन' ही प्रतिमा होतीच. त्या जोरावर विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्‍का बनले होते. आता ते सारे संपले आहे. खरे तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला, तेव्हाच वारे वेगळ्या दिशेने वाहत असल्याची चुणूक दिसली होती. गेल्या मे महिन्यात लालूप्रसादांवरील पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणाचा खटला तातडीने चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले, तेव्हापासूनच नितीशकुमार अस्वस्थ होते. पुढे उपमुख्यमंत्री तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी छापे टाकले. या घडामोडींनंतर "सेक्‍युलर'पेक्षा "मिस्टर क्‍लिन' प्रतिमा जपणे जास्त निकडीचे आहे, असे त्यांना वाटू लागले. भाजपच्या गोटात मात्र त्यामुळे आनंदीआनंद झाला. गुरुवारी सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. आता नितीशकुमार यांनी विरोधी ऐक्‍याला दगाफटका करून सुरुंग लावल्याचा राग लालूप्रसाद आणि कॉंग्रेसजन आळवत आहेत. ते खरेही असले तरी हिंदुत्ववादाची लढाई इतकी महत्त्वाची होती, तर आपले चिरंजीव तेजस्वी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात लालूप्रसादांना काय अडचण होती?

लालूंना बिहारमधील सत्तेचे एक केंद्र आपल्या घरातच हवे होते आणि नेमके तेच नितीश यांना अडचणीचे होते. अखेर नितीश हे आपल्या मार्गाने गेले आणि जाताना त्यांनी मनातले पंतप्रधानपदाचे स्वप्नही उधळून लावले. 2019 मध्ये भाजपच पुन्हा सत्तेवर येणार, अशी खात्री पटल्यामुळेच त्यांनी बहुधा केंद्राच्या मदतीने बिहारच्या विकासाचे कंकण हाती घेतलेले दिसते.

मात्र या नव्या खेळीनंतर नितीशकुमार यांचे राजकारणच अडचणीत येऊ शकते. या आधी त्यांनी भाजपबरोबर डाव मांडला होता, तेव्हा भाजप हा दुय्यम भूमिकेत असायचा. आता केंद्रातील बहुमतानंतर भाजपचे वेगळे डावपेच सुरू झाले आहेत. प्रादेशिक पक्षांच्या साह्याने राज्ये जिंकायची आणि नंतर त्याच प्रादेशिक मित्रांचा गळा घोटायचा, हे भाजपचे राजकारण नितीशकुमार यांच्या लक्षात आले नसेल, असे कसे म्हणणार? शिवाय, नितीशकुमार हे संधिसाधू आहेत, हे लालूप्रसाद यांना आज उमगले काय? 1990च्या दशकात समता पक्ष स्थापन करून नितीश यांनी दिलेला दगा लालूप्रसाद विसरले कसे? त्यापलीकडची बाब म्हणजे आता लालूप्रसाद "नितीश यांच्यामागे एक खुनाचे प्रकरण आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते भाजपबरोबर गेल्याचे' सांगत आहेत. ही पश्‍चातबुद्धी आहे. तसे होते तर मग लालूप्रसादांनी नितीश यांच्याबरोबर "महागठबंधना'त सामीलच व्हायला नको होते. अखेर राहुल गांधी म्हणाले तेच खरे. "भारतीय राजकारण हे असेच असते,' या राहुल यांच्या उद्‌गारातच सारे काही आले आहे आणि याच संधिसाधू, तसेच बेरक्‍या राजकारणाची प्रचिती यानिमित्ताने नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा दिली आहे. मात्र त्यामुळे विरोधी ऐक्‍याचे तारू पाण्यात जाण्यापूर्वीच फुटले, हेही खरेच. आता भाजपला खऱ्या अर्थाने रान मोकळे झाले आहे.

Web Title: editorial