शहांना शह!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017


अग्रलेख

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या अभूतपूर्व नाट्यामुळे सत्तेचा दंभ चढलेले बडे राजकारणी कोणत्या थराला जाऊ शकतात, हेच दिसून आले.

अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्रिवर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेसने त्यांना अनुपम "भेट' दिली आहे! ही "भेट' अर्थातच त्यांच्या जिव्हारी लागणारी आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाचा सारा सोहळाच बेचव होऊन गेला असणार. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे शहा यांनी या तीन वर्षांच्या काळात निवडणुका जिंकण्यासाठी ज्या नव्या रणनीतीचा धडा घालून दिला होता, त्याच मार्गाने जाऊन कॉंग्रेसने त्यांना ही "भेट' दिली आहे.

या काळात शहा यांनी निवडणुका जिंकण्याचे एक नवेच तंत्र आजवर "चाल, चलन और चारित्र्य' असा बडेजाव मिरवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिकवले होते. हे तंत्र होते "साम, दाम, दंड भेद' यांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे आणि त्याचीच शिकवण शहा गेली तीन वर्षे पक्षनेते व कार्यकर्त्यांना देत होते. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नेमक्‍या याच तंत्राचा वापर केला आणि कॉंग्रेसचे "चाणक्‍य' म्हणून ख्यातकीर्त असलेले अहमद पटेल यांना पराभूत करण्याचे शहा यांचे मनसुबे सरदार सरोवरात बुडवले! शहा यांनी पटेल यांना पराभूत करण्यासाठी आखलेल्या विविध डावपेचांना कॉंग्रेसने तितक्‍याच ताकदीने उत्तर दिले आणि अखेर पटेल निवडून आले.

2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण हतबल झालेल्या कॉंग्रेसला या विजयामुळे मोठाच दिलासा मिळाला असणार. अर्थात, शहा असोत की पटेल त्यांनी या अटीतटीच्या लढाईत जे काही मार्ग अनुसरले, ते नैतिक होते की अनैतिक याची चर्चा प्रदीर्घ काळ सुरू राहील. मात्र, अखेरीस यश हे यशच असते, त्यामुळे पटेल यांनी शहा यांना शह दिला यात शंकाच नाही. मात्र, त्यात कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी "क्रॉस व्होटिंग' करून भाजपला दिलेली मते रद्दबातल ठरवणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्‍तांचाही वाटा सिंहाचा होता, हे मान्य करावेच लागेल. कॉंग्रेसचे हे डावपेच निष्फळ ठरवण्यासाठी शहा यांनी त्यांच्यापुढे पाच केंद्रीय मंत्र्यांना उभे करूनही आयुक्‍त दबावाखाली आले नाहीत आणि त्यामुळेच देशातील किमान काही संस्था तरी रामशास्त्री बाण्याने काम करत आहेत, हीच बाब अधोरेखित झाली.

अर्थात, मंगळवारच्या संध्याकाळनंतर कॉंग्रेसने जी काही मुत्सद्देगिरी दाखवली त्यास त्या पक्षाचा अहमद पटेल यांच्यासारखा मोहरा इरेस घालण्यात आला होता, हेच आहे. यापूर्वी गोवा आणि मणिपूर विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावर सरकारस्थापनेचा दावा करण्यात कॉंग्रेसने अक्षम्य विलंब लावला आणि त्यापायी ती दोन्ही राज्ये अलगद भाजपच्या हातात आली होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने या वेळी डावपेचांच्या जोरावर शहा यांना मोठा शह दिला. त्यामुळे पटेल यांचा विजय सुस्तावलेल्या कॉंग्रेसमध्ये चैतन्य आणतो काय ते बघावे लागेल. मात्र, शहा यांनी पटेल यांना पराभूत करण्यासाठी जी रणनीती आखली होती, त्यामागे गुजरातचेच माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी दिलेली साथही महत्त्वाची होती. वाघेला हे खरे तर मूळचे "स्वयंसेवक'; पण भाजपमधील अंतर्गत वितुष्टानंतर दोन दशकांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेसचा गंडा बांधला होता. त्या बदल्यात कॉंग्रेसने त्यांना भरभरून राजकीय पदे दिली. मात्र, आपल्या अमृतमहोत्सवी वर्षांत त्यांना कॉंग्रेस नकोशी वाटू लागली आणि त्यांनी शहा यांचे शिष्यत्व स्वीकारले! आपण पटेल यांना पराभूत करू शकतो, या आशेचा अंकुर त्यानंतरच शहा यांच्या मनात रुजला आणि त्यांनी थेट वाघेला यांच्या नातेसंबंधातील कॉंग्रेस आमदार बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले. गुजरातमधून राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे दोन आणि कॉंग्रेसचा एक असे उमेदवार सहज निवडून येणार होते. त्यामुळे स्वत: शहा व वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचा विजय निश्‍चित होता. मात्र, आपल्या गुजरातच्या "होम पीच'वर पटेल यांचा पराभव घडवून आणण्यासाठी शहा यांनी चंग बांधला आणि त्यामुळे भाजप व कॉंग्रेस यांनी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. आमदारांची पळवापळव, तसेच कॉंग्रेस आमदारांना कर्नाटकात ठाणबंद करून ठेवल्यावर, त्यांची बडदास्त ठेवणाऱ्या मंत्र्यांवर अचानक छापेही पडले. यावरून शहा आणि त्यांच्या शब्दानुसार चालणाऱ्या सरकारी यंत्रणा कशा कामास लागल्या होत्या, तेही दिसून आले.

मात्र, एवढ्या साऱ्या अपरंपार कष्टानंतरही पटेलच विजयी झाले! त्यामुळे आता भाजपच्या छावणीत दाखल होण्यास उतावीळ झालेल्या काही कॉंग्रेस आमदारांचे मतपरिवर्तन होणार काय, या प्रश्‍नाबरोबरच या जबर फटक्‍यामुळे शहा या पुढे तरी आपल्या कूटनीतीचा काही फेरविचार करतील काय, असे अनेक प्रश्‍न समोर आले आहेत. मात्र, मध्यरात्र उलटून गेल्यावरही सुरू राहिलेल्या या अभूतपूर्व नाट्यामुळे सत्तेचा दंभ चढलेले बडे राजकारणी कोणत्या विकृत थराला जाऊ शकतात त्याचेच दर्शन घडले. भारतीय लोकशाहीला हे बिलकूलच भूषणावह नाही. मात्र, शहा यांना हे सांगणार कोण, हाच लाखमोलाचा प्रश्‍न आहे.

Web Title: editorial