महागठबंधनाचा नवा खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नितीशकुमार यांच्या खेळीमुळे लालूप्रसादांना कशी जिव्हारी जखम झाली आहे, याचा प्रत्यय विरोधी पक्षांच्या मेळाव्यात आला; परंतु या आघाडीला खरोखर आकार द्यायचा असेल, तर ठोस कार्यक्रम आणि समावेशकता या बाबी महत्त्वाच्या ठरतील

पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी "राष्ट्रीय जनता दला'चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याने भारतीय राजकारणात पुनश्‍च एकवार "महागठबंधना'चा नवा फड उभा राहिला आहे! या फडातील पात्रे तीच होती; मात्र नितीशकुमार यांनी अलीकडेच विरोधी पक्षांशी काडीमोड घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा एकवार घरोबा केल्यामुळे विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्‍का मात्र त्यांना गमवावा लागला आहे. या मेळाव्यास लालूप्रसादांनी खास बिहारी शैलीत "भाजपा भगाओ; देश बचाओ!' असे मार्मिक शीर्षक दिले होते खरे; पण व्यासपीठावर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित असलेल्या लालू परिवारामुळे या मेळाव्याला त्याच वेळी "नितीशकुमार भगाओ!' असेच रूपडे प्राप्त झाले होते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांच्याविरोधात एकजूट केली, तेव्हाही त्या लढाईचे रणशिंग याच गांधी मैदानावरून फुंकले गेले होते. आता नितीशकुमार यांच्या नव्या खेळीमुळे सत्ता गमवावी लागलेल्या लालूंच्या पुढाकाराने याच मैदानावरून भाजपविरोधातील लढाईचे ढोल-ताशे तारस्वरात पिटले गेले आहेत. मात्र, सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे या मेळाव्यास उपस्थित राहू शकल्या नाहीत आणि राहुल गांधी यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत दांडी मारली! त्याच वेळी मुलायमसिंह यादव, शरद पवार आणि मुख्य म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या "सुप्रीमो' मायावती आदी बड्या विरोधी नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे हा मेळावा लालूप्रसादांच्या घरचे कार्य असल्यासारखेच दिसत होते. मात्र, सोनिया तसेच पवार यांनी आपले प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहतील, याची जातीने काळजी घेतली असली, तरी कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद काय किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारिक अन्वर काय, या बिलकूल जनाधार नसलेल्या नेत्यांचा त्यांच्याच पक्षकार्यकर्त्यांवर काही प्रभाव पडण्याची शक्‍यता दिसत नाही. नाही म्हणायला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; तसेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमुळे मेळाव्याला थोडे फार वजन आले, एवढेच!

मेळाव्यात भाजप आणि विशेषत: मोदी यांच्या विरोधात घणाघाती भाषणे झाली आणि ते अपेक्षितही होते. मात्र, मेळाव्याचे प्रमुख सूत्रधार लालूप्रसाद यांनी आपल्या भाषणाचा बराच वेळ हा नितीशकुमार यांच्यावर आगपाखड करण्यात खर्ची घातला. नितीशकुमार यांच्या खेळीमुळे लालूप्रसादांना कशी जिव्हारी जखम झाली आहे, याचेच दर्शन घडले! लालूंसमवेत त्यांच्या पत्नी राबडीदेवी, पुत्र तेजस्वी आणि कन्या मिसादेवी असा सध्या विविध आरोपांखाली असलेला परिवार होता. त्यामुळे या मेळाव्याचे आणखी एक उद्दिष्ट या आरोपांच्या चौकशीविरोधात एक दबावगट तयार करण्याचे तर नव्हते ना, अशीही शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे. तरीही मेळाव्यास लहान-मोठ्या अठरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि मुख्य म्हणजे ममतादीदींसमवेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव डी. राजा यांनीही हजेरी लावल्यामुळे भाजपला जागे करण्याचे काम या मेळाव्याने निश्‍चितच काही प्रमाणात तरी पार पाडले आहे. हा मेळावा झाल्यानंतरच्या 24 तासांत दिल्लीतील बावना मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूक "आम आदमी पार्टी'ने मोठ्या बहुमतामुळे जिंकल्यामुळे भाजपविरोधात जनमत तयार होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी पाटण्यात उभ्या केलेल्या या नव्या "महागठबंधना'त "आप'लाही सामील करून घ्यायचे काय, हाही विचार लालूप्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करावा लागेल.

मात्र, पाटण्यातील या मेळाव्याकडे मायावतींनी पाठ फिरवली आणि ही बाब विरोधकांना महागात पडणारी आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मायावतींचा "बसपा' केवळ 19 जागा जिंकू शकला असला, तरी त्या पक्षाला 22 टक्‍के मते मिळाली होती, याकडे विरोधी आघाडीला दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे 2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात "बडी आघाडी' उभी राहिलीच, तर त्यात मायावती असणे गरजेचे ठरणार आहे.

त्याशिवाय दक्षिणेकडील एकही पक्ष या नव्या "महागठबंधना'त का नाही, याचाही विचार व्हायला हवा. दुसरे म्हणजे प्रस्थापितविरोधाच्या जोडीने बदलत्या काळाचा वेध घेईल आणि सर्वसामान्य जनतेला आकर्षित करेल, असा किमान कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जायला हवे, हाही धडा विरोधकांनी शिकण्याची गरज आहे. केवळ सरकार चुकेल, त्यामुळे त्याच्याविषयी लोकांचा भ्रमनिरास होईल आणि लोक आपल्याकडेच वळतील, असे मानणे हे मात्र पोकळ स्वप्नरंजन ठरेल, हीदेखील बाब लक्षात घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रशासकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. तथाकथित भोंदूबाबा राम रहीम प्रकरणामुळे तर ते जास्तच गडद झाले. त्यामुळे मायावतींपासून सर्वांना बरोबर घेऊन ही नवी आघाडी 2019 पर्यंत ठामपणे उभी राहिली आणि आघाडीतील नेत्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवले, तर भारतीय राजकारणातील हा नवा फड "बॉक्‍स ऑफिस'वर बऱ्यापैकी हिट जाऊ शकतो.

Web Title: editorial