स्वाभिमानाची ऐशी तैशी....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

नारायण राणे यांचा वापर शिवसेनेच्या विरोधापुरताच करून घेण्याचा भाजपचा मनसुबा असणार, यात शंका नाही. तेव्हा नव्या पक्षाची घोषणा करताना राणे यांनी "स्वाभिमाना'चा पुकार केला असला, तरी त्यांची अगतिकता लपून राहिलेली नाही

घटस्थापनेच्या मुहूर्तावर कॉंग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतःला "ना घर का, ना घाट का' अवस्थेप्रत नेऊन ठेवणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर विजयादशमी उलटल्यावर पक्षस्थापना केली आहे! अर्थात, त्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय भारतीय जनता पक्षाने शिल्लक ठेवला नव्हता. राणे यांच्या पक्षामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील "दंगलीं'च्या निकालांवर फार मोठे परिणाम होण्याची शक्‍यता नाही, त्यामुळेच त्यांच्या पक्षस्थापनेची फारशी दखलही कोणी घेतलेली नाही. राणे यांच्या नव्या पक्षाचे नाव "महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' आहे. त्यामुळेच आता जेव्हा केव्हा त्यांचा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये सामील होईल तेव्हा, वा मंत्रिपद स्वीकारताना, वा पुढे मिळेल ते खाते पदरात पाडून घेताना आणि त्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधान परिषदेवर निवडून येताना, राणे आपला स्वाभिमान गहाण टाकणार नाहीत, अशी आशा आहे. राणे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली; मात्र त्याआधी या पत्रकार परिषदेचा बहुतांश वेळ त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यात घालवला! त्यामुळे "रालोआ'मध्ये सामील व्हायचे असेल तर त्यासाठी भाजपने राणे यांना नेमकी काय अट घातली असणार, यावरच शिक्‍कामोर्तब झाले. दसरा मेळाव्यात उद्धव यांनी "बुलेट ट्रेन'ची संभावना "फुकटचा नागोबा!' अशा शब्दांत केली होती. प्रत्यक्षात सरकारात सामील झालेली शिवसेना हाच "नागोबा' असल्याचे भाजपला जाणवू लागल्यामुळेच राणे नावाच्या या नव्या पाहुण्याच्या हातून शिवसेनेच्या विरोधातील कार्यभाग भाजप साधून घेणार, असे दिसते. कॉंग्रेसचा राजीनामा देतानाच राणे यांनी आपण हप्त्याहप्त्याने "ब्रेकिंग न्यूज' देऊ असे आश्‍वासन पत्रकारांना दिले होते, ते उद्धव हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचे जाहीर करून, त्यांनी पूर्णही केले.

राणे यांनी "बुलेट ट्रेन'चे जोरदार समर्थन केले आणि त्यास पार्श्‍वभूमी ही अर्थातच उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "बुलेट ट्रेन'ला केलेल्या कडाडून विरोधाचीच होती, ही बाब लपून राहिली नाही. सर्वच पक्षांमध्ये आपले मित्र आहेत; मात्र कॉंग्रेसमधील अशोक चव्हाण आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा त्यांनी अपवाद केला आहे. त्यामुळेच त्यांचे नेमके दुखणे काय आहे, हेही उघड झाले. मुख्यमंत्रिपदाची मनीषा राणे यांनी कधीच लपवून ठेवलेली नाही आणि पत्रकार परिषदेतही त्यांना ती लपवून ठेवता आली नाही. मात्र, आता स्वतःचा पक्ष काढल्यावर त्यांची ही मनीषा कशी पूर्ण होणार, ते आंगणेवाडीची देवीच जाणे! तूर्तास तरी राणे यांना मंत्रिपद हवे आहे आणि भाजप ते त्यांना द्यावयास तयार आहे, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी "राणे एनडीएमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करू!' हे तत्परतेने केलेले विधान साक्ष आहे. शिवाय, राणे यांनी पक्षस्थापनेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांना "रालोआ'मध्ये येण्याचे आमंत्रण मिळाल्याचेही सांगितले जाते. याचा अर्थ, ही सर्व भाजपच्या मुख्यालयातून लिहिली गेलेली पटकथा होती आणि राणे यांनी त्याबरहुकूम आपली भूमिका वठवली, एवढेच! तेव्हा, हा सारा घाट भाजपनेच घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे जे काही घडले वा घडवण्यात आले, त्याच्या श्रेयाचे मानकरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे सांगण्याचीही गरज नाही.

मात्र राणे यांना, त्यांच्या नव्या पक्षाला "रालोआ'मध्ये सामील करून घेतल्यामुळे सारे प्रश्‍न सुटले आणि आता राणे यांची तुफानी घोडदौड सुरू होईल, असे समजण्याचे कारण नाही. मंत्रिपदानंतरच्या पुढच्या सहा महिन्यांत राणे यांना विधान परिषदेवर निवडून यावे लागेल. सध्या विधान परिषदेची एकमेव जागा रिकामी आहे आणि ती राणे यांनी स्वतः राजीनामा दिल्यामुळे रिक्‍त झालेली. त्यासाठी होणारी निवडणूक म्हणजेच विधानसभेतील पक्षीय बलाबलाची परीक्षाच असेल! त्या वेळी शिवसेना, कॉंग्रेस, तसेच "राष्ट्रवादी' एकत्र आले, तर राणे यांना निवडून आणणे भाजपला जवळपास अशक्‍य असल्याचे विधानसभेतील समीकरणावरून दिसते. शिवाय, राणे "रालोआ'मध्ये सामील झाले, तर शिवसेना नेमके काय करेल, हेही बघावे लागेल. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राणे यांचा हा सारा खटाटोप मंत्रिपद मिळवण्यापुरताच मर्यादित असल्याचे उघड झाले आहे. कोकणातील पराभवानंतर राणे यांना वांद्रे येथील पोटनिवडणूकही जिंकता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या ताकदीचे झालेले खच्चीकरण दिसून आले होतेच. तेव्हा भाजपही त्यांचा वापर शिवसेनेच्या विरोधापुरताच करून घेणार, यात शंका नाही. एकंदरीतच स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागला असतानाच पक्षाच्या नावात "स्वाभिमान' या शब्दाचा अंतर्भाव करण्याची वेळ राणे यांच्यावर आली.

Web Title: editorial