गुजरातनो गरबो!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "होमपीच' असल्याने गुजरातच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष राहणार आहे. राज्यातील प्रश्‍नांबरोबरच नोटाबंदी आणि जीएसटी या केंद्राच्या महत्त्वाच्या निर्णयांविषयीची सर्वसामान्यांची प्रतिक्रियाही या मतदानातून उमटेल

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अखेर 13 दिवसांनी निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता दसऱ्याच्या गरब्यापासून घुमू लागलेले गुजरातचे राजकारण आता अधिकच जोमाने फेर धरू लागणार आहे! गुजरातच्या "होमपीच'वर होऊ घातलेल्या या निवडणुका केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्यासाठीच महत्त्वाच्या आहेत, असे नव्हे तर या निवडणुकांत संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची बीजे आहेत. त्यामुळेच या निवडणुकांकडे केवळ गुजराती समाजाचा कौल या एकाच दृष्टिकोनातून बघून चालणार नाही. एका अर्थाने हा मोदी यांच्या तीन-सव्वातीन वर्षांचा कारभारच या निवडणुकांत पणाला लागणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे गुजराती अस्मिता तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत अवतरलेले "विकासपर्व' आणि त्यास शह देण्यासाठी कॉंग्रेसने पणाला लावलेली आपली सारी ताकद असा हा संघर्ष असला, तरी त्यास आणखी अनेक पदर आहेत. त्यामुळे गेल्या 22 वर्षांच्या अखंडित राजवटीनंतर भारतीय जनता पक्षापुढे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागले आहे. त्याची कारणे अनेक आहेत आणि त्यास प्रामुख्याने या व्यापार-उदीमात कायम गुंतून राहणाऱ्या गुजराती समाजापुढे नोटाबंदी व वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) उभ्या राहिलेल्या अनंत अडचणी आहेत. शिवाय, पाटीदार समाजातील तरुण पिढीने आरक्षणाच्या मागणीवरून सुरू केलेले आंदोलन, उना येथे झालेल्या मारहाणीनंतर दलितांनी तेथील भाजप सरकारच्या विरोधात उचललेले पाऊल आणि "ओबीसी' समाजाने कॉंग्रेसच्या बरोबर जाण्याची दाखवलेली तयारी यामुळे या निवडणुका कमालीच्या रंगतदार होणार आहेत. अर्थात या निवडणुकीतील हुकमाचा एक्‍का हा अर्थातच मतदारांच्या यादीत 20 टक्‍के जागा व्यापणाऱ्या पाटीदार म्हणजेच पटेल समाजाच्या हाती आहे. त्यामुळेच एकीकडे या समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेलचे काही सहकारी भाजपच्या गोटात दाखल होत असतानाच, तो स्वत: कोणाच्या पारड्यात वजन टाकतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हाच गुजरातचीही मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते; मात्र त्यानंतर गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यास आयोगाने घेतलेल्या 13 दिवसांचा फायदा मग मोदी यांच्यासारखा धूर्त नेता न उठवणार तरच नवल! गेल्या 15 दिवसांत मोदी यांनी गुजरातचे तीन दौरे केले आणि त्यात कॉंग्रेसवर तिखट टीका करतानाच नानाविध प्रकल्पांची आपल्या या परमप्रिय राज्यावर उधळणही केली. त्यात भर पडली ती या तारखा जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी "जीएसटी' संबंधात काही सवलतीही जाहीर केल्या. त्यामुळेच या अशा प्रकारच्या सुविधा तसेच सवलती देता याव्यात म्हणून तर हा 13 दिवसांचा कालापव्यय केला गेला नाही ना, या विरोधकांच्या टीकेत तथ्य असल्याचे दिसते. कॉंग्रेस आणि विशेषत: या प्रचारात हिरिरीने उतरलेले राहुल गांधी याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. कॉंग्रेससाठी या निवडणुका केवळ एका राज्यातील विजयापुरत्या महत्त्वाच्या नाहीत; कारण गेल्या वेळी 182 सदस्यांच्या विधानसभेत साठीही गाठू न शकलेल्या आणि केंद्रातील सत्ता गमावल्यानंतर पुरत्या गारठून गेलेल्या पक्षाला त्या नवसंजीवनी देणाऱ्या ठरू शकतात.

भाजपच्या पारड्यात गुजराती समाजाने गेल्या वेळी 116 जागा टाकल्या होत्या. त्यामुळेच अमित शहा यांनी आता 150 जागांचे "लक्ष्य' जाहीर केले आहे. तर गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या 15-20 जागा कमी झाल्या आणि सत्ता आली, तरी त्यामुळे मोदी यांच्या "लार्जर दॅन लाइफ' प्रतिमेला देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्‍का बसू शकतो. शिवाय या निवडणुकांपाठोपाठ आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यावर या निकालांची छाया असणारच. त्यामुळेच आपल्या "होमपीच'वर भाजप सर्वशक्‍तिनिशी उतरला आहे.

गुजरातमध्ये ओबीसींची संख्या 30 टक्‍क्‍यांच्या घरात आहे आणि त्यांचा प्रभावशाली नेता अल्पेश ठाकूर दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये सामील झाला आहे. त्याच्याबरोबरच दलितांचा नेता जिग्नेश मेवानी आणि तरुण पाटीदारांच्या गळ्यातील ताईत हार्दिक पटेल या त्रिमूर्तींच्या हातातच खऱ्या अर्थाने गुजरातच्या निवडणुकांची कळ आहे, असे आज दिसत आहे. या तिघांपैकी अल्पेश तसेच जिग्नेश हे सरळ सरळ कॉंग्रेसच्या बाजूने उभे ठाकले आहेत; मात्र हार्दिक हा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून भाजपविरोधात उभा ठाकला असला, तरी मतदानाच्या संदर्भात त्याने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्याचवेळी हे नेते तसेच त्यांचे सहकारी यांना फोडण्यासाठी भाजपने आपल्या थैल्या मोकळ्या सोडल्या असल्याच्या आरोपांनीही गुजरातेत फेर धरला आहे. या निवडणुकीत आणखी दोन महत्त्वाचे घटक आहेत आणि ते म्हणजे सोशल मीडिया तसेच "व्हीव्हीपीटी' पद्धतीने होणारे मतदान. त्यामुळेच गुजरातच्या या गरब्यात विजयमाला कोणाच्या गळ्यात पडते, ही कमालीच्या कुतूहलाची बाब बनली आहे.

Web Title: editorial