खेळपट्टीचे "कलंक'नाट्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

क्रिकेट खेळपट्टीबाबत करण्यात आलेला गौप्यस्फोट हा सनसनाटी निर्माण करणारा आहे. वस्तुतः खेळपट्टीत काहीही बदल झाला नव्हता. सामनाही सुरळीत पार पडला; तरीही हे जे नाट्य घडले, त्यातून निर्माण झालेल्या मूलभूत प्रश्‍नांना सामोरे जायला हवे

मॅच फिक्‍सिंग झाले, स्पॉट फिक्‍सिंग झाले. खेळपट्टीच राहिली होती, तिचेही फिक्‍सिंग झाल्याचा आरोप होत आहे. थोडक्‍यात आता खऱ्या अर्थाने फिक्‍सिंग "अष्टपैलू' झाले. आपल्या देशात कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्रिकेटचा सामना असो, सर्वांत जास्त चर्चा खेळपट्टीची असते. खेळपट्टी हा घटक क्रिकेटच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा घटक असतोच. त्याचे एक तंत्र नि शास्त्र आहे; प्रत्येक देशात आपल्या खेळाडूंना अनुकूल अशी खेळपट्टी तयार करण्याचा सर्वच देश प्रयत्न करत असतात; पण त्याला कोणी फिक्‍सिंग असे म्हणत नाही. पुण्यातील खेळपट्टीच्या संदर्भात घडलेल्या प्रकारात मात्र तसा आरोप झाला. पण त्याला "बागुलबुवा' हाच शब्दप्रयोग येथे चपखल बसतो. हेच पहा ना न्यूझीलंडविरुद्धचा पुण्यातील सामना भारतीयांसाठी मालिकेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी अस्तित्वाचा होता; पण चर्चा कोणाची अधिक झाली तर खेळपट्टीच्या फिक्‍सिंगची आणि कुंपणच शेत खाते की काय, अशी सार्वत्रिक भावना उमटली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले. वस्तुतः खेळपट्टीत काहीही बदल झाला नव्हता. भारताने सहज विजय मिळवला, सर्व काही व्यवस्थित घडले. "खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना' अशा हिंदीतील एका उक्तीप्रमाणे धुरळा उडाला. साळगावकर यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. आदल्या दिवसापर्यंत खेळपट्टीजवळ ऐटीत चालणारे साळगावकर सामन्याच्या दिवशी स्टेडियमच्या जवळही फिरकू शकले नाहीत. हे बुधवारी घडलेले नाट्य. पण जे पाहिले आणि स्टिंग ऑपरेशनमधून दिसले तेवढ्यापुरतेच या प्रकरणाचे गाभीर्य आहे असे वाटत नाही. 2000 मधील दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचे भारत दौऱ्यातील फिक्‍सिंग आणि 2013च्या आयपीएलमधील श्रीशांत आणि अन्य दोघांचे स्पॉट फिक्‍सिंग यामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रामुख्याने प्रशासनात उलथापालथ झाली आहे. लोढा समितीचे लोढणे स्वीकारण्याची वेळ त्यामुळेच आली आहे. बीसीसीआयच्या प्रशासनाबाबतीत चार दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयाचा सर्वांत मोठा निकाल अपेक्षित आहे, असे सर्व घडत असताना जे जे क्रिकेटशी संबंधित आहेत, त्या सर्वांनी खरे तर सावध राहणे आवश्‍यक आहे; पण पुण्यातील घडामोडी पाहता तसे जाणवत नाही.

एरवी तिकिटाशिवाय स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याचा कोणी विचारही कोणी करू शकत नाही. पत्रकारांना सामना अधिस्वीकृती ओळखपत्र मिळते. त्यावरही ठराविकच ठिकाणाच्या प्रवेशाचा उल्लेख असतो. खेळपट्टीजवळ केवळ कर्णधार-प्रशिक्षक यांनाच प्रवेश असतो. यजमान संघटनेचा अध्यक्षही तेथे जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी बुकी असल्याचे दर्शवणारे पत्रकार जाऊच कसे शकले? शिवाय त्यांनी जे स्टिंग ऑपरेशन केले ते दोन दिवस अगोदरचे होते आणि सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदर ते "ऑन एअर' झाले. याचाच अर्थ हे सगळे योजनाबद्ध असल्याचे स्पष्ट होते. असा प्रयत्न त्या पत्रकारांनी इतर ठिकाणीही केलेला असू शकतो; पण तेथे त्यांची डाळ कदाचित शिजली नसावी. पुण्यातील याच स्टेडियममध्ये काही महिन्यांपूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील "आखाडा' खेळपट्टीची तर पार्श्‍वभूमी नसावी? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात. "बीसीसीआय'च्या चौकशीत साळगावकरांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. भले त्यांनी खेळपट्टीशी कोणतीही प्रतारणा केली नाही; परंतु स्टिंग ऑपरेशनमधील त्यांची काही वक्तव्ये त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकतात. शिवाय स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या चमूपैकी एक पत्रकार पायाने खेळपट्टी खराब करताना दिसत आहे. हे सर्व प्रथमदर्शनी आक्षेपार्ह म्हणावे लागेल. एकूणच या प्रकरणाशी संबंधित सर्वांचीच चौकशी व्हायला हवी.

या प्रकरणाच्या निमित्ताने बीसीसीआयचे विद्यमान प्रशासन आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांनी एकमेकांना लक्ष्य केले आहे. बीसीसीआयने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीयू) लक्ष नसल्याचे आरोप केले, तर तीन जणांची एसीयू समिती सर्व ठिकाणी कसे लक्ष ठेवणार, असे प्रत्युत्तर प्रशासकीय समितीचे विनोद राय यांनी दिले. एकूणच काय, आरोप-प्रत्यारोपांचे चेंडू इकडून तिकडे मारण्याचा प्रकार झाला. क्‍युरेटरना पुरेसे मानधन मिळत नसल्याचाही सूर काहींना लावला. खेळपट्टी जर एवढी महत्त्वाची असेल, ज्याची चर्चा सर्वाधिक होत असेल तर श्रीमंत "बीसीसीआय'ने हा घटकही दुर्लक्षित करता नये. हीच खेळपट्टी अनेकांसाठी त्यांची कर्तृत्वभूमी असते. सचिन तेंडुलकर निवृत्तीच्या कसोटीत अखेरच्या क्षणी सीमारेषेवर परतत असताना परत फिरला आणि वानखेडेच्या त्या खेळपट्टीला त्याने वाकून नमस्कार केला तो क्षण सर्वांना हेलावणारा होता. अशा मातृसमान खेळपट्टीबाबत काही विपरीत घडणे योग्य नाही. गुरुवारी सकाळी पुण्याच्या खेळपट्टीबाबतचे नाट्य चॅनेलवरून दाखवले जात असताना सामना मात्र वेळेवर सुरू होतो. सामन्यात कोणतीही वाच्यता होत नाही, तिकीट असलेले सर्व प्रेक्षक कोणताही किंतू न ठेवता स्टेडियममध्ये येतात, सामना पाहतात आणि भारताच्या विजयाचा आनंदही घेतात. श्रीशांतसह तिघांच्या स्पॉट फिक्‍सिंगनंतरही आयपीएल आणि क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली नव्हतीच. म्हणूनच आयपीएल असो की भारतीय क्रिकेट असो; कोटींचे प्रायोजकत्व त्यांना मिळते, पण याचा अर्थ कोणालाही गृहीत धरणे असा होत नाही. भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या सर्व घटकांनी अगदी क्‍युरेटर यांनीही कोणाशी काय काय बोलावे, याचे भान ठेवणे हा या "कलंक'नाट्याचा धडा.

Web Title: editorial